१९८८/८९ सालची गोष्ट आहे , त्या वेळी मी पुण्यात इमानेइतबारे नोकरी करत होतो, तेव्हा आम्हाला गुरूवारी साप्ताहिक सुट्टी असायची (इंडस्ट्रियल हॉली डे), असाच एक आळसावलेला गुरुवार, खरे तर त्या गुरुवारी मी माझ्या मित्रां समवेत ‘बसणार’ होतो! आठवडा भर आधी प्लॅनिंग झाले होते सगळे पण वाट लागली ! पक्याला अचानक त्याच्या बॉस ने बिझनेस टूर वर जायला सांगीतले , त्याचा पत्ता कट झाला, मन्या चे आईवडील नेमके आदल्याच दिवशी उपस्थित झाले , झाले मन्याचे भिजलेले मांजर बनले, आणि ‘खंबा सम्राट’ विज्या दाढदुखीने त्रस्त! आता कसले ‘बसणार’ आणि कसले काय ! यकट्यानेच ‘बसण्या’त’ कसली मज्जा ? त्यात आज ‘बसायचे’ म्हणून दुसरे काहीच ठरवले नव्हते, आता वांधा झाला की नाही, आता करायचे काय? जाम बोअर झाले तेव्हा विचार केला टाईमपास करायचा तर एखाद्या नाटकाला जाऊन बसू , नाही तरी बर्याच दिवसात नाटकाला गेलेलो नव्हतो.
तेव्हा मी पुणे स्टेशन परिसरात रहात होतो, लगीच ‘४’ नंबरची बस पकडून मी बालगंधर्व चौकात उतरलो, दुपारचे बारा वाजले होते, बालगंधर्व बाहेरचे नाटकाचे बोर्ड पाहीले, दुपारी साडेबारा वाजता वसंत सबनीस लिखीत , धमाल विनोदी असे ‘सौजन्याची ऐशी तैशी’ नावाचं नाटक होते, ‘बर्याच कालावधी नंतर जुळून आलेला ओरीजनल संचातला दुर्मिळ प्रयोग’ अशी जाहिरात केली होती . आणि खरेच होते ते, नाना बेरकेच्या भूमिकेत प्रख्यात अभिनेता विनोदमुर्ती ‘राजा गोसावी’ , ‘नानी’ च्या भूमिकेत खमक्या ‘लता थत्ते’, प्रकाश इनामदार आणि जयमाला इनामदार, अविनाश खर्शीकर (अव्या!), मंदा देसाई आणि जयंत सावरकर! बघायलाच नको , एकदम तगडी स्टार कास्ट, पण आज गुरुवार, त्यात अगदी ऐनवेळी थिएटर वर पोहोचलो होतो, तिकिट भेटते का नाही ही शंकाच होतो, पण सुदैवाने बॉक्स ऑफिस वर ‘हाऊसफुल्ल’ चा बोर्ड अजून लागला नव्हता, त्यामुळे जरा हायसं वाटलं. बुकिंग विंडो पाशी कोणीच नव्हते , मीच एकटा ! प्लॅन बघितला, शो हाउसफुल व्हायला सात- आठ शिटां शिल्लक होत्या आणि त्या देखील शेवटच्या रांगेतल्या! ‘बालगंधर्व’असले म्हणून काय, शेवटच्या लाईनीतून कसले नाटक बघायचे? त्यात काही मजा नाय, नुसते डॉयलॉग ऐकायचे काय , चेहेरे तर नीट दिसायला पाहीजेत ना? जरा मागची रांग समजू शकतो पण चक्क शेवटची रांग म्हणजे कै च्या कै. मनात विचार केला, असे नाटक बघण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा पुन्हा केव्हा तरी ट्राय करु नाही तरी हे नाटक पुण्यात नेहमी चालू असतं, पुढच्या एखाद्या शो च्या वेळी जरा लवकर येऊन तिकीट काढू , त्यात काय, आज नाही तर नाही, असे म्हणत परत जाण्याचे विचार केला .
बुकिंग विंडोवर एक साधारण ६० च्या पुढचा , तुळतुळीत टक्कल असलेला, गोरापान , गोल चष्मा , स्वच्छ पांढरा सदरा, हसतमुख चेहर्याची व्यक्ती होती , हे एक आश्चर्यच होते नाही तर तिकीटबारीवर नेहमीच त्रासीक, चिडलेली , खेकसणारी, दाढ्या वाढलेली , अंघोळ न केलेली , पिवळ्या दातांची, पिंजारलेल्या केसांची , तांबड्या डोळ्यांची, अगदी आत्ताच कोणाच्या मर्तिकाला जाऊन आलेत असा चेहेरा करुन बसलेली लोक्स मी बघत आलो होतो.
प्लॅन बघून मी थोडावेळ घुटमळत उलटा माघारी जायला वळलो तोच अगदी घरचे कार्य असावे अशा लाघवी , आर्जवी स्वरात त्या बुकिंग क्लर्क ने विचारले …
“का हो, घेत नाही तिकिट?”
“शेवटच्या लाईन मधले आहे , मला नक्को”
“असे काय करताय, स्टार कास्ट बघा जरा , या सगळ्यांच्या च्या डेट्स मिळून शो होण्याचा योग सहसा जुळून येत नाही, शेवटची लाईन तर शेवटची लाईन घेऊन टाका तिकिट, सात – आठ तर राहीली आहेत , हाऊसफुल्ल चा बोर्ड लागतोच आहे”
“ते ठीक आहे पण इतक्या मागे बसुन कसले नाटक बघायचे? आज नाही योग, बघू पुन्हा केव्हातरी शो होईलच ना”
“तुमचेही खरे आहे म्हणा . पण तुम्ही एकटेच का बरोबर आणखी कोणी आहे?”
“का हो?”
“त्याचे काय आहे, माझ्या कडे पहिल्या लाईन मधली सेंटरची दोन तिकिटें शिल्लक आहेत अजून”
“अरे वा, पण प्लॅन मध्ये दिसली नाहीत ती”
“एका बड्या असामी साठी राखून ठेवली होती ती तिकिटें, दहा मिनिटांपूर्वी त्यांनी फोन करुन सांगीतले, त्यांचे कॅन्सल झाले, देऊ त्यातले एक?”
हे एक आश्चर्यच होते नाही का? बालगंधर्व ला केव्हाही जा, अगदी अॅडव्हान्स बुकिंगला खिडकी उघडायच्या आधी पासुन लायनीत पहील्या क्रमांकावर उभे असलात तरीही बुकिंग उघडते तेच मुळी पहील्या पाच-सहा लायनींवर फुल्या मारलेल्या स्थितीत! ! आता हे असे का ते आता सांगायला पाहीजे का? इतक्या वेळा प्रयत्न केला पण माझ्या नशिबी कायमच दहावी रांग आणि मागे! पहिल्या लायनीत बसून नाटक बघायचा योग कधी आलाच नाही !
“देऊ तिकीट , रुपये एकशे वीस फक्त !”
“एकशे वीस?
मी जवळजवळ किंचाळलोच! स्वाभाविकच होते ते, नेहमी मागच्या लायनीतली तीस –चाळिसची तिकीटीं घेण्याची सवय माझी, नाटकाच्या तिकिटाला चक्क एकशे वीस रुपये मोजायचे?
“अहो असे काय करता, पहिल्या लाईन मधले तिकिट आहे, दर जास्तच असतो ना”
“ते खरे आहे पण..”
मी एक आंवढा गिळला.
त्या बुकिंग क्लर्क ने माझ्या चेहेर्यावरचे हावभाव ओळखले.
“मी तिकिट तुमच्या गळ्यात मारतोय असे समजू नका, हे तिकिट काय कसेही विकले जाईल हो आणि समजा नाही विकले गेले तरी काही फरक पडत नाही, नाही तरी प्रत्येक शो ला अशी काहीशेवटच्या क्षणी कॅन्सल झालेली तिकिटे अंगावर पडतातच त्याचे काय. पण माझे ऐकाल तर घ्या हे तिकिट, अहो, चांगली स्टार कास्ट आहे. राजाभाऊंची तब्बेत आजकाल बरी नसते, लताबाईंनीही हल्ली काम कमी केले आहे, खर्शीकर, सावरकर सिनेमात बिझी असतात. या सगळ्यांचा अस एकत्रित योग पुन्हा कधी जमेल कोणास ठाऊक, राहवले नाही म्हणून आपले सुचवले, माझा आग्रह नाही’
“मला ही पटते पण..”
“मान्य आहे १२० रुपये जरा जास्तच आहेत, पण बघा जरा बजेट ताणता आले तर”
“त्याचाच विचार करतोय”
“राग मानू नका पण एक विचारु?”
“काय?”
“चित्पावन का तुम्ही?”
“हो मी चित्पावन, गोखले “
“वाटलेच मला. तुमचा लख्ख गोरा चेहेरा, ठसठशीत , धारदार, स्वच्छ वाणीच सांगतीय तुमची, मी ही चित्पावनच त्यामुळे आपलेपणा वाटतो”
“धन्यवाद”
“गोखले, मग घ्याच हे तिकिट, मागे पुढे बघू नका. गो फस्ट क्लास ! अहो प्रत्येक वेळी असा बजेटचा हिशेब करत आपण असे चांगले मौके हातचे गमावून बसतो. नाही तरी तुम्ही दहाव्या लाईन मधले साठ चे तिकीट उपलब्ध असते तर घेतलेच असते की नाही? मग त्यापेक्षा जरा जास्त मोजा. असा काही शेकडो रुपयांचा फरक तर पडत नाही ना? आज जादा खर्च वाटेल खरा पण कधीतरी एकदा पहील्या लाईन मध्ये बसून अशा तगड्या स्टार कास्ट चा शो बघण्याचा आनंद लूटा ना. बालगंधर्व ला असे पहील्या लाईन मधले तिकिट मिळणे किती अवघड आहे हे तुम्हाला माहिती असेलच. आज सुदैवाने मिळतेय तिकिट तर घ्या. आणि नाटक काय आपण थोडेच दर आठवड्याला एक असे पाहतो? खर्चाचा विचार करायला आख्खे आयुष्य पडले आहे समोर, तुम्ही तरूण आहात, भरपूर पैसे मिळवाल पुढे जाऊन, आणि पैशाचे काय घेऊन बसलात ते काय येतील जातील पण असा दुर्मिळ योग सारखा सारखा थोडाच येणार? नंतर हळहळाल, फार विचार करत बसू नका, ‘गो फर्स्ट क्लास’ , सायबां ! कधी तरी , एकदा तरी..”
गो फर्स्ट क्लास ! साला काय वाक्य होते ते ! मी क्षणभर त्या क्लर्क कडे रोखून पाहिले , मला त्याचे विचार पटले, खरेच की , दर वेळेला आपण ‘काट कसर’ मोड मध्येच का वावरतो? ‘सस्ते वाला दिखाव’ असे दुकानदराला का सांगतो? कधी तरी , एकदा तरी , स्वत:ला ट्रीट म्हणून का होईना, जरा सढळहस्ते खर्च करुन काहीतरी चांगल्याचा अनुभव का घेऊ नये ? मी लक्षाधीश नसलो तरी ६० च्या जागी १२० नक्कीच खर्च करु शकत होतो! जादाचा खर्च कसाही भरुन निघेल त्यात काय एव्हढे मोठे असे , पण असे दर्जेदार नाटक तितक्याच दर्जेदार संचात , पहील्या लाईन मधल्या सेंटरच्या खुर्चीत बसून बघण्यातला आनंद वारंवार थोडाच मिळणार आहे?
मी खिशातून शंभराची आणि वीसाची नोट काढून कौटर वर ठेवली आणि रुबाबात सांगीतले…
“द्या एक तिकीट. गो फर्स्ट क्लास !
त्यावर अतिशय प्रसन्न हसत त्या क्लर्क ने तिकिट एखादा नाजूक कलाकुसरीचा सोन्याचा दागीना हातात ठेवावा तसे अगदी नजाकतीने ठेवले, नाही नाही पेश केले!
“ये हुई ना बात , ये ले तिकिट , तू भी क्या याद करेगा!”
एका शहेनशहाच्या दिमाखात मी थिएटर मध्ये शिरलो.
“रंग शारदेला नमन करून आणि पुण्याच्या नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करुन , सादर करीत आहोत, वसंत सबनीस लिखीत , तीन अंकी धमाल नाटक… सौजन्याची ऐसी तैसी … नाना बेरकेच्या भूमीकेत तितकेच जातीवंत इरसाल एक आणि एकमेव राजा गोसावी… “
तिसरी घंटा झाली आणि पडदा उघडला..
एखादे नाटक अगदी पहील्या लाईन मध्ये , ते ही सेंटरच्या खुर्चीत बसून बघण्याचा हा माझा पहीलाच अनुभव होता. काय सांगू त्या बद्दल ? असा अनुभव ऐकायचा नसतो तर प्रत्यक्ष घ्यायचाच असतो महाराजा! माझ्यात आणि राजा गोसावीं मध्ये अवघ्या काही फुटांचे अंतर होते, त्यांच्या चेहेर्यावरची बारीक सारीक रेष न रेष , नस न नस मला दिसत होती, पांढर्या शुभ्र सदर्यावर त्यांनी शिंपडलेल्या अत्तराचा वास माझ्या पर्यंत पोहोचत होता, अभिनयाचे अनेक बारकावे जे दहाव्या लाईन मध्ये बसून कधीच दिसले नसते , कळले नसते ते आज आरशात बघितल्या सारखे लख्ख दिसत होते. दहाव्या लाईन मधून नाटक बघताना आपण थिएटर च्या स्पिकर्स मधला आवाज ऐकत असतो , पहिल्या लाईन मध्ये बसून मी आज राजा गोसावींचा मूळ आवाज ऐकत होतो. लताबाईंनी मारलेली लहानशी मुरकी दहाव्या लाईन मधून कळणे अशक्यच पण आज ती मला जाणवली.
एक जिवंत , रसरशीत अनुभव मी घेत असतो, नाटक हे काय ताकदीचे माध्यम आहे हे आज पर्यंत फक्त वाचत आलो होतो आज मी ते चक्क अनुभवत होतो, धारोष्ण दूध आणि पावडर चे दूध इतका मोठा फरक होता हा.
मी नाटकात गुंगून गेलो , मी आणि समोर राजा गोसावी, बाकी काही नाही, फक्त आणि फक्त माझ्या साठीच हा शो चालू आहे अशी सुखद अनुभूती होती ती.
मध्येच राजा भाऊंनी एक फक्त चेहर्यावरच्या फक्त हावभावांतून एक जागा घेतली, दहाव्या लाईन मध्ये बसलेल्यांना ती दिसली सुद्धा नसेल पण पहील्या लाईन मध्ये मंत्रमुग्ध होऊन बघणार्या मला ती दिसली, त्या क्षणी मी उत्स्फुर्त पणे हात उंचावून चक्क एक दाद दिली , अगदी अभावित पणे , पण राजाभाऊंनी ते पाहीले , हाडाचा कलावंत तो, अशी रसिक दाद मिळण्या साठी आसुसलेला असते, त्यांनी त्या नाना बेरकेच्या बेअरिंग मध्येच माझ्याकडे पहात ‘थॅक्स’ ची खूण केली ! १२० रुपये खर्च केल्याचे सार्थक झाले !
शो संपला , धमाल आली , अक्षरश: तृप्तीची ढेकर देतच मी घरी परतलो. या जादाच्या खर्चाने माझे आर्थिक गणित काही दिवस कोलमडले खरे पण ते सावरायला फार वेळ लागला नाही, तेव्हा माझे मलाच आश्चर्य वाटले. अरेच्च्या , इतके दिवस आपण उगाचच (खामखाँ ! हा तेव्हाचा माझा शब्द!) बजेट बजेट , खर्च खर्च म्हणत आयुष्यातल्या या अशा अनेक आनंदांच्या प्रसंगांना मुकत आलो आहोत याची गणतीच नाही! हे आधीच का सुचले नाही?
हा माझा पहीलाच ‘गो फस्ट क्लास’ चा अनुभव ! माझे भावविश्व समृद्ध करुन गेला आणि तेव्हा पासून माझी विचार सरणीच बदलली ! ‘गो फस्ट क्लास’ च्या नादात वहावत जाऊन ‘ऋण काढून सण साजरा’ असेही होऊ नये हे मान्य पण कधीतरी अगदी कधीतरी का होईना जरा खर्चाचा विचार बाजूला ठेऊन असे आनंदाचे , सुखाचे क्षण पदरात का पडून घेऊ नये? कायमच ‘सस्तेवाला दिखाव’ , ‘कामचलावू’ .’ इकॉनॉमी ‘ ‘बजेट ओरिएंटेड’ असेच का असावे? का म्हणून आपण सतत ‘मध्यमवर्गिय ‘ विचार करत बसायचे ? कधीतरी का होईना . एकदा का होईना ‘गो फस्ट क्लास ‘ असे का म्हणू नये?
वीस वर्षां पूर्वी घडलेला हा प्रसंग! पण माझ्यात आमूलाग्र बदल घडवून गेला. आयुष्य जास्त रसरशीत पणे कसे जगावे हे सांगून गेला. त्यानंतर मी कधी मागे वळून पाहीलेच नाही. चांगल्या गोष्टींचा मनमुराद आनंद घेत गेलो काही वेळा तर अगदी ठरवून असे मौके मिळवत राहीलो. जगण्याच्या ह्या धडपडीत सुखाची हिरवळ फार कमी वेळा लाभते आपल्याला, पण मोठ्या सुखाच्या , घबाडाच्या मृगजळाच्या मागे धावताना ह्या अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणार्या आनंदाकडे बघायला आपल्याला वेळच नसतो. आयुष्याच्या शेवटी लक्सात येते , ते ‘मोठे सुख’ ‘घबाड’ का काय म्हणतात ते कधी दिसलेच नाही आणि त्या नादात आयुष्याच्या प्रत्येक वळणांवर खुणावणारे हे सहज शक्य असलेले आनंदाचे लहान सहान क्षण कण पण वेचता आले नाही!
त्या नंतरच्या आज पर्यंतच्या वीस वर्षात मी असे अनेक ‘गो फस्ट क्लास’ क्षण वेचले आणि जीवन समृद्ध केले आहे, सांगण्या सारखे बरेच आहेत…त्या बद्दल असेच कधीतरी लिहीन सवड मिळाली की.
शुभं भवतु
अगदी फर्स्ट क्लास लेख आहे हा सर….☺️👌