ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला तेव्हा पहिली अडचण आली ती हे सर्व कोण शिकवणार? तसे ज्योतिष शिकवणारे अभ्यासवर्ग (क्लास) बरेच आहेत पण चौकशीअंती लक्षात आले की त्यातले फार थोडे काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करताहेत, बाकींच्या बद्दल न बोललेलेच बरे. त्यातही अभ्यासवर्गाच्या (कलास) वेळा पाळणे, नियमित हजेरी लावणे जरा अवघडच वाटले.
शेवटी एकलव्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि ‘ग्रंथ हेच गुरू’ मानले आणि एक एक करत पुस्तके गोळा व्हायला लागली. खरंतर काय वाचायला पाहिजे, कुठून सुरवात करायला हवी, काय क्रमाने वाचले पाहिजे, कोणता ग्रंथ चांगला, काही काही माहीत नव्हते. पण ग्रंथ विकत घेत राहिलो आणि आजमितीला ४०० पेक्षा जास्त ग्रंथांचे एक छोटेखानी ग्रंथालयच बनले.
या ग्रंथसंग्रहात पारंपरिक भारतीय ज्योतिषशास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती, अष्टकवर्ग, नक्षत्रशास्त्र, नाडी ज्योतिष, ज्योतिषशास्त्र व अध्यात्मावर आधारित उपाय व तोडगे, योग, मानसशास्त्र, ध्यान धारणा, इंटयूइशन, सायकिक पॉवर, हस्तरेषा शास्त्र, रमल विद्या. खगोल शास्त्र, फेस रीडिंग, हस्ताक्षर विश्लेषण, पाश्चात्त्य ज्योतिषशास्त्र, होरारी, कॉस्मोबायोलॉजी, युरेनियन अॅस्ट्रोलॉजी अशा अनेकानेक विषयांचा समावेश आहे.
जसा वेळ होईल तसे यातील काही निवडक ग्रंथांचे परीक्षण पण लिहिण्याचा मानस आहे. कारण प्रत्येक ग्रंथ हा ग्रंथ असतोच असे नाही, काही चक्क चोपडी या दर्जात मोडतात.
तेव्हा काय वाचावे आणि काय नाही ते सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. जेणे करून , नवीन शिकणार्याचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचेल,
धन्यवाद,
शुभं भवतु
अष्टकवर्ग साठी मराठीत कोणती पुस्तके आहेत…?
श्री. राहुलजी,
अष्टकवर्गा साठी माझ्या माहीतीत तरी एकही मराठी पुस्तक नाही. इंग्रजीत काही चांगली पुस्तके आहेत. त्यात आपण श्री. विनय आदित्य यांची :
1> Dots of Destiny
2> Practical Ashtakvargas
ही दोन पुस्तके सगळ्यात चांगली आहेत.
C S Patel यांचे ही एक चांगले पुस्तक इंग्रजीत उपलब्ध आहे.
सुहास गोखले
राहुलजी,
अष्टकवर्गावर मराठीत एक पुस्तक उपलब्ध आहे असे नुकतेच कळले
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5639106378351681177?BookName=Ashtakvarg-Padhati
सुहास गोखले