जातकांचे प्रश्न !

नुकतेच काही जातकांंनी विचारलेल्या काही शंकांना उत्तरें दिली , तेव्हा लक्षात आले की अरे हा तर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.  तेव्हा त्या  दिलेल्या उत्तरांंतच थोडी भर घालून लेख तयार केला आहे.

आपण विचारलेल्या प्रश्ना संदर्भात:

काही प्रश्नांची उत्तरें ज्योतिषशास्त्राच्या आधारे देता येत नाहीत, ज्योतिषशास्त्र हे फक्त कल (टेंडन्सी) सांगते , शक्याशक्यता (प्रोब्यॅबिलिटीज)  सांगते , पण अमुक एक(च) घडेल हे सांगणे सगळ्याच प्रश्नांच्या बाबतीत शक्य नसते.

आपल्या आयुष्यात घडणार्‍या सर्व घटनांचे स्थूलमानाने वर्गीकरण करायचे झाल्यास ते

  1. दैवाधीन
  2. प्रयत्नाधिन

अशा दोन प्रकारात करता येईल.

दैवाधीन घटनांच्या बाबतीत आपल्याला करण्यासारखे फारसे काही नसते, जे जे होईल ते पाहाणे एव्हढेच आपल्या हातात असते. अशा घटनांचा वेध ज्योतिषशास्त्र जास्त चांगल्या प्रकाराने घेऊ शकते.

प्रयत्नाधीन घटनांच्या बाबतीत , आपल्याला निवडीला वाव असतो, प्रयत्नांनी, चांगल्या कर्माने आपण घटनांचे आघात सौम्य करु शकतो, काही बाबतीत घटना घडण्याचा कालावधी मागे-पुढे करु शकतो, काही वेळा घटनांचे स्वरुप , एका मर्यादेत का होईना बदलू शकतो, काही तुरळक बाबतीत घटना पुढच्या जन्मासाठी कॅरी फॉरवर्ड करून शकतो

प्रयत्नाधीन घटना घडणे / न घडणे आणि घटना घडणार असेल तर त्याचे स्वरुप आणि त्यांचे आपल्यावर होणारे साधक बाधक परिणाम हे बहुंताश आपल्या स्वत:च्या प्रयत्नांवर किंवा आपल्याला जी शैक्षणिक, सामाजीक पार्श्वभुमी लाभली आहे त्यावर अवलंबुन असतात त्यामुळे अशा घटनांचा अगदी अचूक (अ‍ॅक्युरेट) किंवा तपशीलवार (डीटेल्ड) अंदाज हे शास्त्र घेऊ शकत नाही,  अजून हे शास्त्र तितके प्रगत झालेले नाही. 

काही प्रश्न हे सापेक्ष (सबजेक्टीव्ह) असतात ज्यांच्या व्याख्या व परिणाम व्यक्ती, स्थल , काल, परिस्थिती सापेक्ष असतात. “मी सुखी होईन का?” , ‘स्टेबल जॉब’ , ‘रिसपॉनसिबल पोझीशन’  या सारखे प्रश्न याच गटात मोडतात, सुख म्हणजे नेमके काय किंवा काय मिळाले म्हणजे मी सुखी होईन याची व्याख्या व्यक्ती गणिक बदलत जाते , कालची व्याख्या आज बदलते आजची उद्या राहाणार नाही असे काहीसे याचे स्वरुप असते. जन्मपत्रिकेतुन याचा बोध घेणे कदापीही शक्य नाही आणि कोणी असा दावा करत असेल तर ती  व्यक्ती एकतर साक्षात ब्रम्हदेव असेल किंवा लोकांना फसवत असेल !

आपण येत्या दहा वर्षात आरोग्य कसे राहील असाही एक प्रश्न विचारला आहे , मुळात अशा प्रकाराचे प्रश्न विचारु नयेत , ज्योतिषशास्त्र आरोग्य विषयावर भाष्य करण्याच्या बाबतित कमालीचे तोकडे आहे. आधुनिक वैद्यक शास्त्र त्याच्या तुलनेत हजारों पटींने अधिक सक्षम आणि अचुक आहे , त्याच्या साह्यानेच आपल्या या आरोग्य विषयक प्रश्नाचे उत्तर अधिक चांगले मिळेल असे वाटते , अर्थात जगातला कोणताच डॉक्टर किंवा पॅथॉलॉजी लॅब ‘येत्या दहा वर्षात कोणते आजार होतील” या प्रश्नाचे अचूक, खात्रीने आणि छातीठोक पणे उत्तर देऊ शकणार नाही किंवा असे विचारले तर तो एक कमालीचा हास्यास्पद प्रकार समजला जाईल.

मुळात ज्योतिषशास्त्र हे एक प्रकारचे ओव्हरव्ह्यु घेणारे , मार्गदर्शक शास्त्र आहे ते अतिसुक्ष्म / तपशील वार (finer details)  दाखवणारा मायक्रोस्कोप ही नाही की फार लांब वरची वस्तू मोठी , स्पष्ट करुन दाखवणारा बायनॉक्युलर! पत्रिक बघून एखाद्याचा संपूर्ण जीवनपट डिव्हीडी फास्ट फॉरवर्ड केल्या सारखा आधीच दिसतो आणि ज्योतिषाला तो खटाखट सांगता येतो हा एक अतिशय मोठा  भ्रम आहे.

ज्योतिषांकडून या अवाजवी अपेक्षा कशा काय ठेवता येतील ? अत्याधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रज्ञांची फौज, सुपर कॉम्प्युटर्स , सॅटेलाईटॅची माळ, सरकारी पैसा असे सगळे अनुकूल असताना सुद्धा या सिझनला पाऊस किती, कसा व केव्हा हे हवामान खात्याला अचूकतेने सांगता येते का ? मग तुट्पुंज्या साधनसामुग्रीवर, अपुर्‍या (आणि बर्‍याच वेळा चुकीच्या !) माहीतीच्या आधारावर , आमनेसामने , पंधरा मिनीटात ज्योतीषाने सगळे खटाखट आणि तेही अचूक भविष्य सांगावे आणि भविष्य चुकल्यास पैसे परत करावे अशी अपेक्षा कशी काय धरली जाते ?  

डॉक्टर अशी हमी देतो?
वकील केस जिकली नाही तर  पैसे परत देतो?
१० लाख डोनेशन घेऊन अ‍ॅडमिशन देताना तो शिक्षण सम्राट चांगल्या शिक्षणाची, कोर्स पूर्ण केल्यावर नोकरीची कोणती हमी देतो , सांगा ?

अहो ३००- ४०० रुपयात साधा डोमीनोज चा मिडीयम साईजचा पिझ्झा मिळत नाही आणि इकडे ज्योतीषाने मात्र तेवढ्याच पैशात (शक्यतो फुकटच!) खटाखट , अगदी अचुक आणि डिट्टेलवार भविष्य सांगावे ही अपेक्षाच मुळात चुकीची / अव्यवहार्य आहे !!

तिसरी गोष्ट , आपल्या आयुष्यात काय काय घडणार आहे, केव्हा घडणार आहे , कसे घडणार आहे ही सगळी बित्तंबातमी आधीच कळली तर जीवन जगण्यातली मजाच निघुन जाईल,  एखाद्या सस्पेंस सिनेमातलाली मजा जर तो सस्पेंस काय आहे  हे आधीच कळले तर येईल का?

शेवटचा मुद्दा, कोणाला केव्हा , किती आणि कितपत भविष्य कळावे ही देखिल नियतीची एक योजनाच असते!

त्या साठी ही काही दैवी योगच लागतात हे ही तितकेच खरे आहे.

केवळ समोर ज्योतिषी आहे, त्याचे मानधन देण्याइतकी ऐपत आहे असे आणि एव्हढ्या पुरतेच ते समीकरण मर्यादित नाही, आपल्या डोळ्याला दिसते , कानाल ऐकू येते त्याच्याही पलीकडे जाऊन बर्‍याच काही अज्ञात , अगम्य गोष्टी आहेत त्याचा खुलासा अद्यापही लागलेला नाही! 

असो.

शुभं भवतु  

Similar Posts

2 Comments

  1. “सुख म्हणजे नेमके काय किंवा काय मिळाले म्हणजे मी सुखी होईन याची व्याख्या व्यक्ती गणिक बदलत जाते , कालची व्याख्या आज बदलते आजची उद्या राहाणार नाही असे काहीसे याचे स्वरुप असते.” Ekdam correct aahe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *