जेनीचा किस्सा ! भाग – ३

मन्याला वाटले जेनी वापस आला पण नाही मन्याचा मित्र पक्या होता.

“काय राव, आज मूड नाय का , असा का बसलायस”

“असा बसु नको तर काय”

“का रे , संगी शी बिनसल ? का तिच्या ‘बा’ ने तिचे लगिन  दुसरीकडे ठरवले का काय?”

“तसे काय नाय रे , हिथे वेगळाच डेंजर लोचा झालाय”

“काय सांगीशाला की नाय”

“काय सांगू मर्दा …”

मन्याने सगळी स्टोरी सांगीतली.

 

न्याची स्टुरी ऐकून पक्या पण हादरला…

“बा भौ.. भारीच दिसतोय हा जेनी .. तू त्याला कामाला लावायचा ऐवजी त्यानेच तुला कामाला लावलय म्हणायचे!”

“तर रे, सगळी कामे सांगून झाली त्या बेण्याला, काम सांगायचा अवकाश, लगीच करतयं, असं जातयं आणि आसं येतयं, लगिच नविन काम मागतयं.. साला.. आता याला काय काम सांगायचे रं, वीतभर xxx की माझी, आता त्ये काय मला सोडत नाय, जिमीनीत जित्ता गाडणार बघ मला”

मन्याचे बोलणे ऐकत असलेल्या पक्याच्या चेहेर्‍यावर एकदम चमक आली..

“मन्या काळजी सोड, तसे काय होणार नाय, त्यो काय जित्ता गाडणार तुला, त्याच्या आधी आपणच त्याला संपवूया”

“ओ राजं, तुला म्हाईती नाय , त्ये असं सादंसुदं नाय, लई xxचे हाय त्ये, तेला काय संपवणार तू! माझ्या संगट तुला पण गाडंल धा फूट जिमिनित, त्या पेक्षा त्याला काम काय सांगायचे त्याचा विचार कर, समिंदराच्या लाटा मोजाया पाठवलय पण काय तरी जुगाड करुन येतयं बघ आता लगेच”

“यु दे त्याला, ते कामाचे माझ्यावर सोड, मी बघून घ्येतो त्याला”

“म्हणजे? तू काय करणार आता? तू कशापायी मध्ये पडतोय, माझ्या बरोबर उगाच अडचणीत येशील”

“तसे काही होणार नाही, आपल्या कडे एक जंक्शन आयडिया आहे..”

“कोणती?”

“सांगतो, पयल्यांदा येऊ दे त्याला, मी बघतो त्याच्या कडे”

“पक्या, सांभाळ लई डेंजर आहे त्ये! आता माझे काही खरे नाही, आणि तुझे पण. त्या पेक्षा शाना असशीला तर पळ कुटं तरी गायब हो . मी माती खाल्ली तेव्हढी बास आहे”

“ह्यॅ साला काय घाबरतो रे, मी आहे ना, मी आयडिया करुन त्या जेनी चा कसा बंदोबस्त करतो ते बघच “

“नाय रे पक्या, कशाला जीव घोक्यात घालतो रे..”

असे बोलणे होते तेव्हढ्यात तो जेनी दाणदाण पावले टाकत समोर आला..

“मेरे आका, दरिया में पुरे दिन में नौ सो लहरें आती है “

मन्या पक्या कडे पहायला लागला आणि जेनी पक्या कडे मारक्या नजरेने पाहायला लागला..

“बोल मेरे आका, अभी क्या हुक्म है?”

“मी…मी.. “

मन्याच्या तोंडाला कोरड पडली, त्याचा तोंडातून शब्द फुटेना, थरथर कापत त्याने पक्या कडे बघितले. पक्या पुढे आला..

“ये देख जेनी..”

त्या क्षणी जेनी ने पक्याच्या तोंडावर हात ठेवला.

“मुआफी मेहेमान, मै आपको जानता तक नहीं  और वैसे ही मैं सिर्फ मेरे मालिक मनोज हुजुर की ही बात सुनता हूँ”

“ठीक हय , तो तेरे मन्या हुज्जुर की  सुन, आन खा माती, माझ काय जातयं”

पक्या मन्याच्या कानात काही कुजबुजला!

मन्याने तोंड वाकडे केले ..

“अरे, हे कस्ले काम रे, यकदम शिंपल, ह्ये बेणं ते शून्य मिनिटात करेल”

“अरे हॅट, साध काम नै हे, जेनीला काय त्याच्या बा ला पण जमणार नाही, तू सांग बिनधास्त”

“आरं पण..”

“घाबरु नकोस, काही होणार नाही, सांग काम त्याला..”

“जे…. जे…जेनी .. येक बघ एक छोटेसे काम आहे”

मन्याच्या तोंडा तून कसेबसे शब्द बाहेर पडले..

“बोल मेरे आका”

जेनी प्रेम चोपडा सारखे छद्मी हसत म्हणाला..

मन्या उठला, तरातरा खोलीच्या कोपर्‍यात गेला. तिथे बटाट्याची १०० किलोची गोणी भिंतीला उभी करुन ठेवलेली होती. मन्याने गोणी खोलली आणि सारे बटाटे जमिनीवर पसरवले, सगळी खोली बटाट्यांनी भरुन गेली, लहान , मोठे , मध्यम, अनेक आकारांचे , वजनाचे , बटाटेच बटाटे !

“हे बघ जेनी, इथे जमिनीवर जे बटाटे पसरलेत ना, त्यांचे तीन गट करायचे, डाव्या हाताच्या भिंती जवळ ‘लहान’ बटाट्यांचा ढीग लावायचा, ‘मोठे’ बटाटे उजव्या हाताच्या भिंती जवळ आणि मध्यम बटाटे सेंटरला ढीग करुन ठेवायचे , कळले?”

“जी मेरे आका, जैसा आपका हुक्म!”

जेनी कामाला लागला…

पक्या मन्याला म्हणाला..

“तुझे काम झाले दोस्ता, या जेनी ला बापजन्मात जमणार नाही हे काम.. चल आपण कटू इथून, त्या जेनीला बसु दे बटाटे बटाटे खेळत”

“अरे पण..”

“काळजी करु नको,, सांगीतले ना , हा जेनी कितीही पावरबाज असला तरी त्याला हे काम सुधरणार नाही, तू बिनघोर रहा.. जा तुझी ‘संगी’ तिकडे वाट बघत असेल.. मला पण दुसरी कामे आहेत..

मन्या आणि पक्या तिथुन निघून गेले…

त्या घटनेला आज ‘दोन’ वर्षे झाली असतील, तो ‘जेनी’ अजुनही ‘बटाट्यांचे वर्गीकरण’ करत बसलाय!

एका पेक्षा एक अशी अशक्यप्राय कामे चुटकी सरशी करुन टाकणार्‍या त्या ‘जेनी’ ला बटाट्यांचे ‘लहान’ . ‘मध्यम’ आणि मोठे’ असे वर्गीकरण का करता आले नाही!

असे कसे झाले?

……

“भाऊ , स्टोरी एकदम झॅक , पण मी म्हंतो, येव्हढा भारी गडी म्हणायचा तो जेनी, पण इतके साधे काम कसे काय जमलं नाही म्हणतासा.. आणि भाऊ याचे  ज्योतिषाशी काय कनेक्शन जोडतासा? “

“सद्या , तुला सगळ्याची गडबड बघ, जरा दम खा, सांगतो , सगळे सांगतो .. अगदी बैजवार सांगतो पण आत्ता नाय.. पुढच्या भागात…”

“झालं , भाऊ , तुमचे पुन्यांदा सुरु झाले, स्टुरी अर्धवट सोडून सगळ्यांस्नी टांगून ठिवायचे!”

“सद्या , लेका तेच्यातच गंमट असते.. जरा गाय छाप ची पुडी सरकीव. बोलून बोलून तोंड दुखायला लागले, येक कड्ड्क बार भरतो वाईच..”

…..

…..

…..

क्रमश:

शुभं भवतु

Similar Posts

4 Comments

  1. कालच एका कोल्हापूर च्या मित्रा सोबत बोलो… पक्या ऐवजी तोच समोर आल्याचा भास झाला.. गोष्ट एकदम चाबुक….

Leave a Reply to Rahul Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *