ज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली

ज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली

 

अलिकडे पुण्याच्या एका डॉक्टरची नियमावली सांगणारी पोष्ट व्हायरल झाली आहे त्या वरून प्रेरणा घेऊन ज्योतिषी स.दा.चुके यांनीही आपल्यी एक नियमावली तयार करुन ती ‘व्हायरल’ करा अशी गळ मला घातली ..आलिया भोगासी असावे सादर म्हणत मी यथाशक्ती ही नियमावली व्हायरल करत आहे.

पोष्ट मध्ये व्यक्त झालेल्या मतांशी मी सहमत असेलच असे नाही याची कृपया नोंद घ्यावी.

( हे ज्योतिषी स दा चुके , अर्थातच पुण्यात  , सदाशीव पेठेत राहतात हे काय वेगळे सांगायला हवे का?)

१)  उधारी अजिबात नको ! माझ्याकडे जातक कमी आले तरी चालतील !

२)  दुपारी १ ते ४  या वेळात माझा दरवाजा ठोठावू नये, ती माझी विश्रांतीची वेळ असते, या वेळात केलेल्या फोन कॉल्स , मेसेज ला त्यावेळी उत्तर मिळणार नाही.

३)  आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मला देता येईल असा काही नियम/ नवस नाही, मी ज्योतिर्विद आहे , ब्रह्मदेव नाही !

४)  जातकाने लुंगी / बनियन/बर्म्युडा घालून माझ्याकडे येऊ नये , आपण चैन्नै मध्ये राहात नाही!

५)  एका जातका सोबत एकाच जबाबदार व्यक्तीने यावे ! इष्टमित्र सहपरिवार यायला इथे मी लग्नाची पंगत बसविलेली नाही ! तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःचे प्रश्न विचारू नये !
आपणास प्रत्येक व्यक्ती साठी वेगवेगळे मानधन द्यावे लागेल ! (एका जातकाच्या मानधनात त्याच्या अख्ख्या घरादारातल्या व्यक्तींचे भविष्य मोफत अशी योजना माझ्या कडे चालू नाही)

६)  आपल्या भविष्यात काय घडू शकतो याचा फक्त एक अंदाज मी  देऊ शकतो पण घटना घडवून आणणारा ब्रह्मदेव मी नाही.

७)  मी विचारत असलेली जन्मवेळ , जन्मदिनांक, जन्मस्थळ , आयुष्यात घडलेले प्रसंग आदी माहिती शक्य तितकी अचूक द्यावी, चुकीची माहिती दिल्यास चुकीची उत्तरें मिळतील.

८)  आपली पत्रिका  मला जे सांगते तेच मी तुम्हाला सांगतो , अशुभ भाकित ऐकायची मनाची तयारी करून या. कायम शुभ आणि चांगलेच सांगायला हा तुमचा हॅप्पी बर्थ डे नाही.

९)  कोणत्या तरी अर्धवट ज्योतिषाने केलेल्या पत्रिका आणि भाकिते मला दाखवायला आणुन त्याच्याशी  मी केलेली पत्रिका व सांगत असलेली भाकिते यांची तुलना करण्यात माझा वेळ वाया घालवू नका.

१०) तुमची जन्मवेळ जी जन्माच्या वेळी नोंदवली आहे तीच मला सांगा कोणा नवशिक्या , अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या नक्षत्र शिरोमणी ज्योतिषाने शुद्धीकरण केलेली तथाकथित सुधारीत जन्मवेळ सांगू नका.

११) मी  केलेली पत्रिका आणि भाकिते दुसर्‍या ज्योतिषाला दाखवून त्याने त्यावर मारलेल्या पिचकार्‍या परत येऊन मला सांगू नका.

१२) आपला स्वत:च्या ज्योतिषाचा अभ्यास असलाच तर तो स्वत:पाशीच ठेवा, ते ज्ञान माझ्या समोर पाजळू नका.

१३) मी भाकिते कशी केली , कशाच्या आधारावर केली असे प्रश्न विचारू नका,  हे सांगायला हा ज्योतिषाचा क्लास नाही.

१४) ज्योतिषांना पण बायको-मुलं आहेत, त्यांनाही वैयक्तिक आयुष्य असतं, ते कुठेही सुट्टीवर जाऊ शकतात , आजारी पडू शकतात आणि ते वैयक्तिक आयुष्यात काहीही करू शकतात, त्याच्याशी तुम्हाला काही देणे-घेणे नाही !
(तुमच्या  वैयक्तिक आयुष्याबद्दल मी कधीही गॉसिपिंग करत नाही)

१५) कुठल्यातरी ज्योतिषा कडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर ज्योतिषांवर किंवा ज्योतिषशास्त्रावर  काढू नये ! (इतर जातकां कडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग ज्योतिषांनी तुमच्यावर आपल्यावर काढला तर?)

१६) तुम्ही ग्राहक बनला, तर ज्योतिषी  दुकानदार बनेल !
तुम्ही आधी ‘माणूस’ बना, मग ज्योतिषी अवश्य ‘देवमाणूस’ बनेल !

(मार्गदर्शना पुरताच) आपला ज्योतिषी स.दा.चुके  !

शुभं भवतु

 

Similar Posts

One Comment

Leave a Reply to Gorakshnath Kale Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *