पत्रिकेतले ग्रहयोग भाग – १

जन्मपत्रिका तयार झाली की प्रथम ग्रहांची स्थानगत , राशीगत फळें विचारात घेतली जातात आणि त्यानंतर बघितले जातात ते ग्रहां मधले होणारे ग्रहयोग !

ही पायरी अत्यंत महत्वाची आहे कारण ग्रहांची स्थानगत , राशीगत फळें स्थूल मानाने असतात एव्हढेच नव्हे या सगळ्या फळांसाठी ‘Conditions apply’ अशी सावधगिरीची सुचना ही असतेच असते. ह्या Conditions म्हणजेच ग्रहयोग. आणि गंमत म्हणजे ग्रहयोगांची फळे देताना पण ‘Conditions apply’ अशी सावधगिरीची सुचना असते. ह्या Conditions म्हणजेच योगांतील ग्रहांना लाभलेले स्थानबल आणि राशीबल !

म्हणजेच स्थानगत , राशीगत फळें आणि ग्रहयोग यांचा एकत्रितच विचार करावयाचा असतो. पृथक पृथक (Isolated) विचार चुकीचा किंवा फसगत करणारा ठरु शकतो.

ग्रहयोग दोन प्रकारे असू शकतात, जन्मवेळे नुसार बनवलेल्या पत्रिकेतल्या ग्रहांचे आपापसातले ग्रह योग (Natal Planetary Aspects) आणि आत्ताच्या आकाशातल्या ग्रहस्थितींशी जन्मपत्रिकेतल्या ग्रहांशी होणारे ग्रहयोग – गोचरीने होणारे ग्रहयोग (Transits) .

जन्मपत्रिकेतल्या ग्रहांचे आपापसातले ग्रहयोग त्या व्यक्तीचा स्वभाव, जडणघडण, मानसिकता, विवाह, संतती, पैसा, आरोग्य, मागचा जन्म, पुढचा जन्म, कार्मिक ताळेबंद अशा असंख्य बाबीं बद्दल भाष्य करतात ह्याला Natal Promise म्हणतात. पण ही फळें जातकाला केव्हा व कशी मिळणार ते गोचरीने होणारे ग्रहयोग (Transits) दाखवतात. साडेसाती  हे शनीचे गोचर भ्रमणच आहे ,  आणि  ‘गुरु पाचवा झाला की होईल लग्न’ अशी भाषा ज्योतिषी बोलताना आपण ऐकले असेलच!

इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा तो म्हणजे गोचरीचे ग्रहयोग (Trasits)  कोणती घटना घडणार ते ठरवू शकत नाहीत त्यांना तो अधिकार नसतो, गोचरीचे ग्रह फक्त घटना कधी घडू शकेल ते सुचित करतात. म्हणजे गोचरीच्या ग्रहयोगांनी विवाहाचे संकेत दिले तरी मूळ पत्रिकेत विवाहाचा योग नसेलच तर जातकाचा विवाह होणार नाही. त्या अर्थाने गोचरीला (किंवा Transits) ट्रीगर – Trigger म्हणावे लागेल. म्हणूनच ‘हा काय, पुढच्या वर्षी गुरु पाचवा होतोय, लग्न झालेच म्हणून समजा’ असे ठासून सांगीतलेले असताना गुरु पाचवा होऊन ही विवाह का झाला नाही याचे कारण आता आपल्या लक्षात आले असेल. बंदुकीत काडतूसच नसेल तर कितीही वेळा ट्रीगर दाबून काही उपयोग होणार आहे का?

या ग्रहयोगांचा अत्यंत सखोल अभ्यास करावा लागतो, बरेच ज्योतिषी स्थानगत , राशीगत फळांची घोकंपट्टी करतात दिसतात पण त्या तुलनेत ग्रहयोगांच्या फळांना अगदी फाट्यावर मारतात आणि मोठी चूक करुन बसतात. बरेचसे (सगळे नाही!)  के.पी. वाले ही चूक रोजच करत असतात!  सबलॉर्ड बघायचा, कार्येश काढले की डायरेक्ट दशा – अंतर्दशा – विदशांचाच पदर धरायचा! ते तरी काय करणार म्हणा त्यांच्या ‘के.पी. रिडर्स’ मध्येच  ग्रहयोगाच्या तोंडाला अक्षरश: पाने पसली आहेत. ग्रहांची कारकत्वे बघायला नको, राशींच्या गुणधर्माचा विचार नको, इलेमेंट्स, मोडॅलिटी कशाला लागतात,  ग्रहयोग – ‘के.पी. रिडर्स’ मध्ये तरी कुठे वापरलेत ? आपल्याला  त्याचे देणे घेणे नाही,  सबलॉर्ड आहे ना अनुकूल झाले तर मग !

एकंदरच भारतात या ग्रहयोगांचा अभ्यासाकडे इतके दुर्लक्ष झाले आहे की ह्या विषयावरती पुस्तके सुद्धा अगदी मोजकीच लिहीली गेली आहेत ! मराठी भाषेतल्या पुस्तकांचा विचार करावयाचा झाला तर गुरुवर्य श्री वसंतराव भटांचा ‘फलज्योतिषातले समग्र ग्रहयोग’ या एकमेव ग्रंथाचा अपवाद सोडला तर दुसरे कोणतेही पुस्तक आजतागायत लिहले गेले नाही (निदान माझ्या माहीतीत तरी नाही !) इंग्रजी भाषेत मात्र बरेच उत्तमोत्तम ग्रंथ उपलब्ध आहेत , याचे कारण म्हणजे पाश्चात्य ज्योतिषशास्त्राचा पायाच ग्रहयोग Aspects आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास प्रत्येक पाश्चात्य ज्योतिषाला अगदी घोटून घोटून करावा लागतो.

मी पूर्वी या ब्लॉग़ वर ग्रहयोगां वर उपलब्ध असलेल्या भारतीय / विदेशी पुस्तकांच्या याद्या दिलेल्या आहेत तसेच James Braha यांनी लिहलेल्या ग्रहयोगांवरच्या एका अप्रतिम ग्रंथाचे परिक्षण ही केले आहे , ते वाचकांनी एकदा डोळ्याखालुन घालावे ही विनंती.

या लेखाच्या पुढच्या काही भागां मधून मी ह्या ग्रहयोगां बद्दल जरा जास्त विस्ताराने लिहणार आहे, तेव्हा पुढचे भाग वाचायला विसरु नका.

शुभं भवतु

Similar Posts

10 Comments

  1. नमस्कार सुहासजी,

    माझ्या आवडीचा विषय दिसल्यामुळे प्रतिसाद दिल्यावचुन राहवल नाही.

    कृपया नविन अभ्यसकाना उपयोगी पडेल ह्या दृष्टीने विस्तारित लेख लिहावे ही विनंती.

    आपले लेख वाचनीय आणि अभ्यासपूर्ण असतात त्यामुळे हे ग्रहयोगा वरील लेख अभ्यसकना उपयोगी होतील.

    संतोष सुसवीरकर

    1. श्री. संतोषजी,

      अभिप्राया बद्दल घन्यवाद.
      मी ही मोठी लेखमाला या दृष्टीने विचार केला आहे. हाच विषय निवडायचे कारण म्हणजे या विषयावर अगदी मराठीत इतरत्र अगदी कमी लेखन झालेले आहे आणि बर्‍याच ज्योतिषांचा हा विषय काहीसा कच्चा आहे ! आपण ही लेख माला वाचा , आपले अभिप्राय , सुचना असेच कळवत राहा, त्यामुळे काय होते मी लिहलेले वाचले जाते आहे हे कळले की उत्साह वाढतो , नविन काही लिहायचा हुरुप येतो.

      आपला
      सुहास गोखले

  2. Cant’t wait for the next articles. Thank you. While looking at conjunctions do you use Lagna chart or Bhav Chalit? Sorry I maybe wrong but in the article you said Jupiter fifth for marriage. Should it be seventh?
    Thanks.

    1. श्री. हिमांशु जी,

      अभिप्रया बद्दल धन्यवाद.

      ग्रहयोग हे दोन ग्रहांमधले अंशात्मक अंतर असल्याने भावचलित अथवा लग्न कुडली किंवा राशी कुंडली यांचा त्या अंशात्मक अंतराशी काही एक संबध नाही. भावचलित अथवा लग्न कुडली किंवा राशी कुंडली हे सारे एकाच ग्रहस्थितीचा नकाशा दाखवायचे वेगवेगळे प्रकार आहेत , इंग्रजीत याला Abstraction म्हणॅतात.

      मी ‘गुरु पाचवा.. लग्न..’ असे लिहले आहे ते केवळ एक उदाहरण म्हणून गुरु बर्‍याच स्थानात शुभ असतो, गुरु दुसरा असताना (कुटुंबात वाढ) सुद्धा विवाह योग असतो, गुरु सप्तमात असताना सुद्धा विवाहाची शक्यता असते. गुरु काही स्थानातुन भ्रमण करताना किंवा काही स्थानांवर दृष्टी असताना चांगली फळे देतो असा अनुभव आहे पण हा नियम होऊ शकत नाही.

      आपला
      सुहास गोखले

  3. नमस्कार सुहासजी
    आपले लेख उत्तम आहेतच आणी जे ज्योतिष शिकले आहेत आणी ज्योतिष मार्गदर्शन करत आहेत त्याना अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन आपल्या लेखातून मिळत आहे.आपण हे लेख असेच चालू ठेवावे.
    आपण जे ज्योतिषाचे dnyan आपणापुरते न ठेवता ते ज्योतिषवाचका पर्यत पोहचवून एेक अभ्यासू पिढी निर्माण करत आहात. असेच आपण लेखन चालू ठेवावे.
    आपल्या लेखाची प्रतिषा करणारा चातक
    आणी वाचक

  4. सप्तम स्थानी गुरु असता जातक अत्यंत उंच का असतो.

Leave a Reply to संतोष Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *