प्रश्न शास्त्राचा पायाच मुळी ‘दैवी मदत’ हा असल्याने जातक जेव्हा पहिल्यांदा प्रश्न विचारतो त्यावेळी त्याला त्या प्रश्ना संदर्भात जी काही दैवी मदत मिळायची होती ती मिळलेलीच आहे,‘प्रतिकूल उत्तर’ हा जसा ईश्वरी संकेत आहे असे समजावे. आपल्याला हवे असलेलेच उत्तर मिळावे या हेतूने तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणे (त्याच वा दुसर्या ज्योतिर्विदाला) म्हणजे एक प्रकारे त्या आकाशस्थ दैवी शक्तींवर अविश्वास दाखवणे किंबहुना त्यांचा अनादर करत आहे. दर वेळेला जातलाला प्रश्न पडला रे पडला, त्या दैवी शक्तींनी त्याचे उत्तर द्यायला तत्परतेने धाऊन यायलाच पाहीजे असे थोडेच आहे ? जसे ATM ( असत्याल तर मिळत्याल) मधुन पैसे मिळण्यासाठी आधी तुमच्या खात्यात पैसे असायला लागतात , आधी दुनियाभरची पापें करायची, आणि आता अडचणीला ‘देवा मला पाव’ असा मतलबी व्यवहार इथे चालणार नाही.
या लेखमालेतले आधीचे लेख इथे वाचा:
प्रश्न शास्त्र का आणि कसे – ७
हा श्रद्धेचा , विश्वासाचा मामला आहे, एरवी ज्योतिषाची टिंगल टवाळी करायची आणि मग आणिबाणीची वेळ आली की चोरुन मारुन ज्योतिषाचे उंबरठे झिजवायचे असे चालणार नाही
“हमको जो ताने देते है हम खोये हैं इन रंगरलियों में
हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियों में “
“नाही , म्हणजे आपला यावर अजिबात विश्वास नाही , थोतांड आहे हे सगळे, पण काय आहे माझ्या वडीलांचा फारच आग्रह पडला, त्यांचे मन दुखावता येणार नाही ….” असे म्हणत ‘अंनिस’चे फार मोठे कार्यकर्ते म्हणवणारे एकजण माझ्याकडे प्रश्न विचारायला येऊन गेले आहेत.
उत्तरें मिळतात म्हणून सतत आलतु फालतु कारणांसाठि या दैवी शक्तींना वेठीस धरल्यास,‘लांडगा आला रे आला’ या इसापच्या गोष्टी सारखी गत होते आणि मग जेव्हा जातकाला अत्यंत निकडीची गरज असते त्यावेळी या दैवी शक्तीं जातकाकडे पाठ फिरवतात.
एका वेळेला फक्त एकच प्रश्न विचारा, दुसरा प्रश्न काही कालावधी नंतर विचारा.
दिवसातल्या पहिला प्रश्नाचे उत्तर देताना ‘रुलींग प्लॅनेटस’ ची मदत चांगली मिळते असा माझा स्वत:चा तसेच अनेक नामवंत ज्योतिर्विदांचा अनुभव आहे त्यामुळे जोखमीचे प्रश्न सकाळची पहिली ‘अपॉइंट्मेंट’घेऊन विचारावे.
कोणते प्रश्न विचारु नये
काही प्रश्न विचारु नये आणि जरी विचारले तरी ज्योतिर्विदांनी त्याचे उत्तर देण्याचे टाळावे.
न्यायप्रविष्ट प्रकरणाचा निकाल काय लागेल अशा प्रश्नांना उत्तरे देऊ नयेत, यात न्यायालयाचा अवमान होऊ शकतो आणि तो दंडनिय अपराध आहे.
‘स्त्री का पुरुष संतती ‘ या प्रश्नाला उत्तर देऊ नये, एकतर ज्योतिषशास्त्रा द्वारे याचे उत्तर ठरवता येत नाही, आणि असे उत्तर हे ‘गर्भलिंग निदान’ या सदरात मोडू शकते आणि तो दंडनिय अपराध आहे.
गंभिर शारिरिक आजार, मनोरुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया या संदर्भातल्या प्रश्नांना उत्तर देऊ नये, ज्योतिषशास्त्राच्या आधारे रोगनिदान करु नये, काहीबाही उपाय वा तोडगे सूचवून रुग्णाचा जीवाशी खेळू नये, असे प्रश्न तज्ञ वैद्यकिय व्यावसायिकांकडे सोपवलेलेच बरे.
मृत्यू बद्दल बोलू नये, मृत्यू चे भाकित करु नये . (मी आत्तापर्यंत तिन वेळा असे भाकित केले आहे , दुर्दैवाने ही तिनही भाकितें बरोबर आली आहे , पण ईथे मी स्पष्ट्पणे नमूद करतो की ही तीन्ही भाकीते मी शास्त्राचा अभ्यास या हेतूने केली होती आणि ती स्वत: पाशीच ठेवली होती, दुसर्या कोणालाही सांगीतली नव्हती)
भावी वैवाहिक जोडिदारचे वर्णन , नोकरीवाला असेल का बिझनेस असेल, सेंटृल लाईन वरचा का वेस्टर्न लाईन वरचा ( हसू नका, पण मुंबई स्थित एका कन्येने हा प्रश्न विचारला होता!) अशा तर्हेच्या अति सुक्ष्म तपशीलाची अपेक्षा असलेले प्रश्न.
कोणते प्रश्न योग्य?
- हरवलेली / चोरीस गेलेली वस्तू सापडेल / परत मिळेल का
- हरवलेली /घर सोडून निघून गेलेली व्यक्ती परत येईल का
- जागा खरेदि विक्री
- नोकरी मिळणे
- नोकरी जाणे
- नोकरीत बदल
- बदली होणे/ बदली झालेली रद्द होणे,पगारवाढ , पदोन्नती
- व्हॉलंटरी रिटायमेंट घेणे लाभदायक ठरेल का
- परदेश गमन
- विवाह योग
- घटस्फोट
- परीक्षेतले यश
- दोन वा अधिक पर्यायांतुन एकाची निवड करणे
- नोकरी का व्यवसाय
- शिक्षण क्षेत्राची निवड
- जागा खरेदी विक्री
- जागा भाड्याने देणे घेणे
- कर्ज मिळेल का
- कर्ज वसुली होईल का
- येणे ,थकबाकी वसूल होईल का
- नोकरी व्यवसायाचे क्षेत्र कोणते
- ऐकलेली वार्ता (अफवा) खरी का खोटी
- कोर्टात दावा दाखल करावा का
- ‘क्ष’व्यक्तीशी सौदा / भागीदारी करावी का
- व्यवसायातले भागीदार मला फसवत तर नाहीत ना
- अपेक्षित पत्र , निरोप, पार्सल कधी मिळेल
- वाट पहात असलेली व्यक्ती / रेल्वे /बस कधी येईल/पोहोचेल
- फंड, विम्याचे पैसे केव्हा हातात येतील
- ‘क्ष’या व्यक्तीशी केलेला विवाह लाभदायक ठरेल का
- संतती योग
कोणत्या प्रश्नांची उत्तरें हमखास चुकतात? आत्ता पर्यतच्या माझ्या अनुभवानुसार :
- सहज सुचले म्हणून, केवळ उत्सुकता म्हणून विचारलेले प्रश्न
- फुकट भविष्य सांगताहेत तर घ्या विचारुन (गाजराची पुंगी..) म्हणून विचारलेले प्रश्न
- आडवळणाने , मूळ हेतू व महत्वाची माहीती दडवुन ठेवून विचारलेले प्रश्न
- ज्या प्रश्नात जातकाची कोणतीही आर्थीक, शारीरीक, मानसीक, भावनिक गुंतवणूक नाही असे प्रश्न
- ज्योतिषशास्त्राची टिंगल टवाळी करण्याच्या हेतुने वा ज्योतिर्विदची परीक्षा घेण्याच्या हेतुने विचारलेले प्रश्न
- एकच प्रश्न त्याच अथवा दुस-या ज्योतिर्विदांना पुन्हा पुन्हा विचारला असता
- ज्या प्रश्नाची उकल कशाही त-हेने झाली तरी जातकावर त्याचा काहीहि आघात / परिणाम होणार नसतो असे प्रश्न.
- स्वत:चा प्रश्न दुस-याचा आहे किंवा दुस-याचा प्रश्न स्वत:चा आहे असे भासवून विचारलेला प्रश्न
- ‘भविष्य चुकले तर पैसे परत’ अशी वसुलीची भावना मनात ठेऊन विचारलेले प्रश्न.
उत्तरें मिळतात म्हणून एका जातकाने प्रश्नांचा भडिमार कसा केला त्याचा एक मनोरंजक किस्सा पुढच्या भागात सांगतो.
शुभं भवतु