“वस्तू हरवली असेल”
“अरे नाय , समदा ओफ्फीस छान मारा , डब्बी नाय, कोनी तरी चोरला हाये “
“भंडारी शिवाय आणखी बरेच लोक आले असतील ना त्या वेळेत”
“नाय , तसा बाहेरचा कोन नाय आला. जे आला तो समदा घरचाच लोक नायतर फ्रेंड लोग थे, त्ये नाय चोरणार”
“म्हणून तुम्हाला भंडारीनेच चोरी केली असे म्हणायचे आहे”
“ते भंडारीच साला चोर हाये, आन ते रामशरण पण बोलते ना, ते झूट कसा काय?”
“ठीक आह, बघू या आपण नक्की काय झाले आहे ते..”
‘हरवले – सापडले’ प्रकाराच्या प्रश्नां साठी पारंपरीक आणि के.पी. पेक्षा वेस्टर्न होरारी पद्धती मला जास्त सोयिस्कार वाटते, प्रश्नाचे उत्तर अचूक मिळतेच शिवाय प्रश्ना संदर्भातले अनेक बारीक-सारीक तपशील सुद्धा उत्तम दिसतात.
या प्रश्नासाठी मांडलेली प्रश्न कुंडली अशी आहे:

चार्टचा तपशील:
दिनांक: ३१ जानेवारी २०१६ , वेळ: १०:४०:४६
स्थळ: देवळाली कँप (नाशिक) ७३ पूर्व ५०; १९ उत्तर ५७
Geocentric, Tropical, Placidus, Mean Node
वरकरणी जातकाने ‘भंडारीने चोरी केली का?’ असा प्रश्न जरी विचारला गेला असला तरी यात एकाच वेळी अनेक प्रश्न समाविष्ट झालेले आहेत.
- भंडारी बद्दल जे ऐकले ते खरे आहे का?
- वस्तु भंडारीने चोरली आहे का?
- वस्तु खरेच चोरीस गेली का हरवली?
- हरवलेली / चोरीस गेलेली वस्तू परत मिळेल का?
चला तर मग, आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे एक एक फॅक्टर तपासायला सुरवात करु या.
जन्मलग्न:
जन्मलग्न १४ मेष ४० असे आहे त्यामुळे ‘अर्ली असेंडंट ‘ किंवा ‘लेट असेंडंट ‘ हे दोन्ही फॅक्टर्स निकालात निघाले.
(ज्यांना या ‘अर्ली असेंडंट ‘ किंवा ‘लेट असेंडंट ‘ बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरुर वाचावी
चंद्र व्हॉईड ऑफ कोर्स:
चंद्र, ०० वृश्चिक ३९ वर आहे, वृश्चिकेत अगदी नुकताच दाखल झालेला हा चंद्र तो वृश्चिकेत असे पर्यंत मंगळ, रवी, शुक्र, बुध, नेपच्युन अशा ग्रहांशी योग करणार असल्याने चंद्र ‘व्हाईड ऑफ कोर्स’ नाही , काळजी नको!
(ज्यांना चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरुर वाचावी ज्युवेल थीफ !
शनी:
शनी अष्टमात आहे, म्हणजे तो लग्नात नाही, सप्तमात नाही आणि हरवलेल्या वस्तुचे म्हणून जे स्थान असते त्या द्वितिय स्थानात नाही. त्यामुळे ही पण काळजी मिटली.
(ज्यांना सप्तमातल्या शनी बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरुर वाचावी ) )
सर्व प्रथम या केस मध्ये सक्रिय असलेल्या / असू शकणार्या सर्व पात्रांची यादी बनवूया.
अशी कोण कोण पात्रें आहेत?
- बिपीन भाई (प्रश्नकर्ता)
- चांदीची डब्बी (हरवलेली वस्तु)
- भंडारी (चोरीचा आळ असलेला कॉलनीचा वॉचमन)
- चोर किंवा अनोळखी व्यक्ती (वस्तु चोरी झाली असेल तर)
- अफवा (रामशरण दूधवाला , भंडारी बद्दल जे काही सांगत आहे ते)
धीरजभाई , रामशरण यांचा उल्लेख असला तरी त्यांची भूमीका नगण्य आहे (पाहुणे कलाकार) त्यामुळे त्यांचा विचार करण्याची गरज नाही.
चला आता ही पात्रें आणि त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे ग्रह कोण आहेत ते तपासुया.
बिपीनभाई:
प्रश्नकर्ता लग्नभावा वरुन बघतात, या चार्ट मध्ये मेष लग्न आहे म्हणजे ‘मंगळ’ प्रश्नकर्त्याचे म्हणजेच बिपीन भाईंचे प्रतिनिधीत्व करणार, लग्नस्थानात ‘युरेनस’ आहे म्हणजे मंगळा बरोबर युरेनस ही जातकाचा सह-प्रतिनिधी आहे.
‘चंद्र’ एरव्ही प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधित्व करतो पण ‘हरवले / सापडले’ विषयक प्रश्न असल्यास, चंद्र प्रश्नकर्त्या ऐवजी हरवलेल्या वस्तुचे प्रतिनिधीत्व करतो, म्हणून इथे जातकाचा प्रतिनिधी म्हणून चंद्राचा विचार करायला नको.
हरवलेली वस्तु:
वैयक्तीक मालकीची , जंगम मालमत्ता (मुव्हेबल) , मौल्यवान वस्तु द्वितिय (२) स्थानावरुन पाहतात. द्वितियेश आणि द्वितिय स्थानातले ग्रह हरवलेल्या वस्तुचे प्रतिनिधित्व करणार. द्वितिय स्थानाची सुरवात १८ वृषभ १० वर आहे , म्हणजे शुक्र द्वितियेश म्हणून हरवलेल्या वस्तुचे प्रतिनिधित्व करेल. आहे, द्वितिय स्थानात कोणताही ग्रह नाही. म्हणजे द्वितियेश शुक्र आणि हरवलेल्या वस्तू चा निसर्गदत्त प्रतिनिधी म्हणून ‘चंद्र’ असे दोघेही हरवलेल्या वस्तुचे प्रतिनिधीत्व करणार.
भंडारी:
भंडारी (चौकीदार) हा हौसिंग सोसायटीचा पगारी नोकर तशा अर्थाने तो प्रश्नकर्त्याचा (बिपीन भाई ) अगदी वैयक्तीक नोकर नसला तरी दोघांच्यातले संबंध मित्र , परिचित, शेजारी , नातेवाईक किंवा अगदी एखादा तिर्हाईत असे नव्हते तर ते काहीसे मालक – नोकर अशाच स्वरुपाचे आहेत किंबहुना बिपिनभाई तरी तसे मानत होते. त्या अर्थाने भंडारी हा प्रश्नकर्त्याचा नोकर असे समजून , षष्ठमस्थाना (६) वरुन पाहिला पाहीजे, षष्ठम स्थान ०७ कन्या ३४ वर चालू होते म्हणजे षष्ठमेश ‘बुध’ भंडारीचे प्रतिनिधित्व करेल. षष्ठम स्थानात गुरु पण आहे त्यामुळे तोही ‘भंडारी’ चे प्रतिनिधित्व करणार.
चोर/ परकी व्यक्ती:
‘चोर / परकी व्यक्ती’ सप्तम भावा (७) वरुन बघतात. सप्तमेशा बरोबरच सप्तमातले ग्रह पण ‘चोर/परकी व्यक्ती’ यांचे प्रतिनिधित्व करतात. सप्तमभाव १४ तुळ ४० वर चालू होते, म्हणजे सप्तमेश शुक्र आहे, चंद्र आणि मंगळ सप्तमात आहेत. शुक्र, मंगळ आणि चंद्र हे तिघेही ‘चोर/ परकी व्यक्ती’ चे प्रतिनिधित्व करणार.
आता आली का पंचाईत! कारण शुक्र आधीच हरवलेल्या व्यक्तीचे प्रतिनिधीत्व करत आहे, तर मंगळ जातकाचे (बिपीनभाई) प्रतिनिधीत्व करत आहे , चंद्र पण हरवलेल्या वस्तू चे प्रतिनिधीत्व करतो! अशा तर्हेने हे तीनही ग्रह ’ विवादग्रस्त – डिस्प्युटेड प्लॅनेटस’ झाले! अशा परिस्थितीत आपल्या कडे एकच मार्ग आहे तो म्हणजे ज्या ग्रहा कडे दुय्यम दर्जाचे प्रतिनिधीत्व आहे ते काढून घ्यायचे.
शुक्र हरवलेल्या वस्तुचे प्रतिनिधित्व करत आहे, शुक्राचे कारकत्व हरवलेल्या वस्तू साठी (चांदीची डब्बी) साठी अत्यंत समर्पक आहे. मंगळाच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. मंगळ हा अधिकारी , वरिष्ठ म्हणून बिपीन भाईंचे प्रतिनिधीत्व अधिक समर्पकपणे करेल. एकटा चंद्र , हरवलेल्या वस्तुचा निसर्गदत्त प्रतिनिधी म्हणुन दुय्यम दर्जाचा प्रतिनिधि आहे, हरवलेल्या वस्तु साठी शुक्रा सारखा अत्यंत समर्पक ग्रह प्रतिनिधि असल्याने चंद्राची आवश्यकता नाही म्हणून आपण चंद्राचे ‘हरवलेल्या वस्तू’ चे प्रतिनिधीत्व काढून घेऊन त्याला ‘चोर / तिर्हाईत’ व्यक्तीचे प्रतिनिधीत्व बहाल करुया!
बातमी / अफवा:
‘बातमी / माहीती’ हे त्रितियस्थानाच्या अखत्यारीत येते, त्रितिय स्थान १५ मिथुन ३२ वर चालू होते म्हणजे त्रितियेश बुध असल्याने बातमीचे प्रतिनिधित्व करेल. बुध हा ग्रह तसाही ‘बातमी / माहीती / अफवा’ यांचा नैसर्गिक कारक आहेच. त्रितीय स्थानात इतर कोणी ग्रह नाही त्यामुळे ‘बातमी / अफवा’ साठी बुध हा एकमेव कारक आहे.
प्रमुख पात्रे आणि त्यांच्या भूमिका करणारे अभिनेते निश्चीत झाले!
आता पुढच्या टप्प्यावर हे अभिनेते किती ताकदीचे आहेत हे पाहून घेऊया. त्यासाठी प्रत्येक ग्रहाच्या स्थिती नुसार ज्याला ‘इसेन्शीयल डिग्नीटी’ म्हणतात त्याचा एक तक्ता तयार केला जातो तो असा:

आता या ‘इसेन्शीयल डिग्नीटी’ च्या तक्त्याच्या आधारे आपण या सर्व अभिनेते कय ताकदीचे आहे हे तपासूयात.
मंगळ (बिपीन भाई): स्वत:च्याच राशीत आहे, स्वत:च्याच ट्रीप्लिसीटीत आहे मजबूत स्थितीत आहे. पण मंगळ शुक्र (डब्बी) च्या टर्म आणि डीट्रीमेंट मध्ये आहे आणि चंद्राच्या (चोर) ‘फॉल’ मध्ये आहे , हे असे असणे स्वाभाविकच आहे. मंगळ या पत्रिकेत सगळ्यात बलशाली ग्रह आहे.
शुक्र (डब्बी): मंगळाच्या ‘एक्सालटेशन’ मध्ये आहे , स्वत:च्याच ट्रिप्लीसीटीत आहे, चंद्राच्या (चोर) ‘डीट्रीमेंट’ मध्ये आहे आणि गुरु (भंडारी) च्या ‘फॉल’ मध्ये आहे, याचा अर्थ डब्बी चोरीस गेल्याची किंवा भंडारी कडे असण्याची शक्यता खूप कमी आहे, शुक्र ही बलवान आहे (दुसर्या क्रमांकावर) , शुक्र असा सुस्थितीत असल्याने हरवलेली वस्तु सुखरुप आहे आणि ती जातकाला परत मिळणार असा संकेत मिळत आहे.
बुध (भंडारी) : बुध मंगळाच्या ‘एक्सालटेशन’ आणि ‘फेस’ मध्ये आहे. महत्वाचे म्हणजे बुधाला कोणतीच डिग्निटी नसल्याने तो चक्क ‘पेरेग्राईन’ आहे , काही करायची ताकदच नाही त्याच्याकडे त्यामुळे ही वस्तु भंडारीने चोरली नसल्याचा हा एक संकेतच आहे!!
चंद्र (परकी व्यक्ती / चोर): चंद्र मंगळाच्या राशीत आहे, मंगळाच्या ‘ट्रीप्लिसिटी’ , ‘फेस’ आणि ‘टर्म’ मध्ये आहे! तसेच चंद्र शुक्राच्या ‘डीट्रीमेंट’ मध्ये आहे आणि स्वत:च्याच ‘फॉल’ मध्ये आहे, म्हणजे परकी व्यक्ती/ चोर मंगळाला म्हणजेच ‘बिपीन भाईंना’ अनुकूल तर आहेच शिवाय ‘ड्ब्बी’ च्या डिट्रीमेंट आणि स्वत:च्याच फॉल मध्ये असल्याने , वस्तू चोरायची कोणतीही ताकद या चोरा कडे नाही. इतके सारे असताना ‘डब्बी’ चोरीस जाणे अशक्यच आहे!
‘चंद्र १५ तुळ ते १५ वृश्चिक या विभागात असल्याने, ‘विया कंब्युस्टा’ आहे पण या आपण याची फिकीर करायची गरज नाही , कारण चंद्र जातकाचा प्रतिनिधी म्हणुन विचारात घेतला तरच ‘विया कंबुस्टा’ ची काळजी , पण आपण चंद्र थर्ड पार्टी / चोर यांना बहाल केला आहे म्हणजे चोर ‘विया कंबुष्टा’ असणे हे चोरासाठी घातक आहे , आपल्याला तर ते लाभदायकच आहे! त्याहुन ही महत्वाचे म्हणजे चंद्राला कोणतीच डिग्निटी नसल्याने तो चक्क ‘पेरेग्राईन’ आहे , काही करायची ताकदच नाही त्याच्याकडे त्यामुळे ही वस्तु चोरीस गेली नसल्याचा एक संकेतच आहे!!
आता आपण मूळ प्रश्न आणि उपप्रश्न यांची उकल करायला घेऊ….
क्रमश:
शुभं भवतु
