माझी व्यावसायीक नीती मुल्यें
- जातकाच्या सामाजीक प्रतिष्ठेचा, आत्म सन्मानाचा, भाव भावनांचा,धार्मीक समजुतींचा , श्रध्दास्थानांचा, विचारसरणीचा, चालीरितींचा, आर्थीक परिस्थितीचा, शैक्षणिक पातळीचा सर्वातोपरी आदर राखुन, आत्मियतेने, जातकाच्या हिताचाच विचार करुन, सर्वात्तम अशीच सेवा पुरवेन.
- जातकाने पुरवलेली सर्व माहीती, जातकाशी झालेला संवाद, जातकाला दिलेले ज्योतिष विषयक मार्गदर्शन अत्यंत गोपनिय राखेन, कोणत्याही परिस्थितीत अशी माहिती कोणा तिर्हाईताला पुरवली जाणार नाही.
जातकाने दिलेल्या माहितीचा वापर जातकाने मागीतलेली सेवा पुरवण्यापुरताच केला जाईल. - जातकाची कोणत्याही पध्दतीने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लुबाडणूक करणार नाही.
- ज्योतिषशास्त्राच्या व ज्योतिषाच्या स्वत:च्या मर्यादांची पूर्ण जाणिव जातकाला करुन देईन तसेच जातकाची दिशाभूल होईल , जातकाच्या मनात भिती निर्माण होईल, जातकाच्या मनात खोटी, भ्रामक आशा निर्माण होईल, अशा तर्हेचे कोणतेही विधान, भाकित किंवा दावे माझ्या कडून केले जाणार नाही.
- जातकाला सेवा पुरवताना, मी सदैव माझ्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या मर्यादेत राहीन,ज्या बाबीं माझ्या कौशल्याच्या कक्षेत नाहीत त्या बाबतीत मी कोणतीही सेवा पुरवण्याचा प्रयत्न करणार नाही, ज्या मध्ये आरोग्य, कायदा, मानसशास्त्र, आर्थिक गुंतवणूक या व इतर अनेक विषयांचा समावेश आहे. अशी परिस्थीती निर्माण झाल्यास मी जातकाला संबंधित क्षेत्रांतील तज्ञांचा सल्ला घेण्यास सांगेन.
- माझी कार्यपध्दती ,सेवेचे स्वरुप व मर्यादा, सेवेसाठी आकारले जाणारे शुल्क, जातकाला दिला जाणारा वेळ या सर्वांची पूर्व कल्पना जातकाला दिली जाईल.
- सेवेचा दर्जा, अचुकता व तत्परता सर्वात्कृष्ट राहतील यासाठी माझे सदैव प्रयत्न राहतील.
- मी ज्योतिषशास्त्राशी प्रामाणिक राहीन, आर्थीक लाभासाठी किंवा केवळ जातकाला बरे वाटावे यासाठी हेतुत: खोटी विधाने वा दावे करणार नाही.
- इतर ज्योतिषी वापरत असलेल्या पध्दती व त्यांची सेवा पुरवण्याची पध्दती , त्यांनी दिलेला सल्ला अथवा मत यांचा उचित आदर राखेन, त्यांच्या विषयी जातकाचे मत कलुषित होइल असे कोणतेही मतप्रदर्शन वा टिका टिप्पणी करणार नाही.
- मला माहिती आहे की ज्योतिषशास्त्र हे दैवी आहे, या शास्त्राचा वापर मी लोकांना मदत करण्या करताच करेन, या शास्त्राचा कोणत्याही प्रकाराचा गैरवापर म्हणजे साक्षात परमेश्वराशी प्रतारणा ठरेल असे मी मानतो.
- मी माझे स्वत:चे आचरण शुध्द व प्रामाणिक राखेन जेणे करुन माझ्या कडुन जातकाला चांगलेच मार्गदर्शन मिळेल.
शुभं भवतु