सिर्फ सुंघ के बताते है – १

हा किस्सा माझा मित्र प्रकाश याने खूप वर्षापूर्वी सांगितला होता, तो आठवला की आजही धमाल हसायला येते. त्याचे झाले असे…

प्रकाश त्यावेळी ‘फिलिप्स’ च्या इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट्स च्या वॉरंटी सर्व्हिस विभागात सुपरवायझर म्हणून काम करत होता होता. एकदा ‘मंदार’, हा प्रकाशच्या हाताखाली काम करणारा एक शिकाऊ (ट्रेनी) इंजिनियर, त्याच्याकडे आला…

“सर, ह्या इंस्ट्रूमेंट मध्ये काय फॉल्ट आहे तेच समजत नाही, सगळ्या टेस्ट्स केल्या, आख्खा दिवस गेला त्यात, सॉरी सर, पण फॉल्ट सापडला नाही..”

“बघू , जरा तो सर्किट बोर्ड..”

खरेतर प्रकाशचा त्या प्रकारची इंस्ट्रूमेंट दुरुस्त करण्यात इतका हातखंडा होता की सर्किट बोर्ड न बघताच केवळ सांगितलेली समस्या व लक्षणे (सिम्प्टोम्स) ऐकूनच फॉल्ट कोठे आहे, काय आहे , त्यावर उपाय काय, हे त्याला सांगता आले असते, तरी पण एकदा खात्री करून घेण्याच्या हेतूने त्याने तो सर्किट बोर्ड हातात घेऊन नीट बघितला, बोर्ड कोणत्या बॅचचा आहे हे वाचले, हा बॅच नंबर अगदी बारीक अक्षरात लिहिलेला असल्यामुळे बोर्ड अगदी डोळ्या जवळ नेऊन वाचावा लागायचा.

“अरे काही नाही, Q9 क्रमांकाचा ट्रान्सीस्टर जळला आहे, तो बदल, होईल बोर्ड चालू”

मंदार ला मोठे नवल वाटले, अरे मी दिवसभर झगडलो पण फॉल्ट कोठे आहे ते कळले नाही आणि ह्यानी बोर्ड नुसता हातात घेऊन क्षणात फॉल्ट काय आहे ते सांगितले, मानले बुवा..

दुसऱ्या दिवशी मंदार पुन्हा प्रकाश समोर उभा!

“मंदार, काय रे, सुटला ना प्रॉब्लेम?”

“येस सर, केव्हाच, आपले डायग्नोसिस अचूक होते, तुम्ही सांगितलेला तेव्हढा एकच बदल केला, बस्स, झाले चालू इंस्ट्रूमेंट. थॅंक्यू सर.”

“गुड जॉब, दुसरे काही काम आहे का?”

“सर, एक विचारायचे होते..”

“बोल”

“त्या कालच्या प्रॉब्लेम बद्दल , मी दिवसभर झगडलो पण फॉल्ट कोठे आहे ते कळले नाही आणि आपल्याला बोर्ड हातात घेताच एका क्षणात कसे काय समजले ते कळले नाही ..”

प्रकाशला मंदारच्या भाबडेपणाची मजा वाटली तेव्हा त्याची जरा फिरकी घेण्याच्या हेतूने तो म्हणाला ..

“असे बघ, काल मी नेमके काय काय केले होते ते आठवतेय?”

“हो सर, आपण तो बोर्ड हातात घेऊन फक्त न्याहाळला एकदा आणि लगेच फॉल्ट काय ते सांगितले. बाकी काहीच केले नाही…”

“इथेच तर चुकते ना तुम्हा नव्या लोकांचे.. निरीक्षण कमी पडते तुमचे.”

“मी समजलो नाही सर”

“मी तो बोर्ड अगदी डोळ्याजवळ नेला होता ते तू बघितले होतेस ना?”

“हो सर”

“खरेतर मी त्यावेळी बोर्डाचा ‘वास’ घेतला होता !”

“वास म्हणजे ‘स्मेल’ ?”

“येस, अरे मै वो बला हू जो बोर्ड को सुंघ के फॉल्ट बताती है ”

(इथे प्रकाशने प्रेम चोपडा च्या त्या सुप्रसिद्ध आवाजाची नक्कल केली असणार , मला खात्री आहे, प्रकाशला काही आज ओळखत नै !)

“फक्त वास घेऊन फॉल्ट कळतो?”

“अलबत् ! तू बघितले नाहीस का? प्रत्येक फॉल्टचा एक विशिष्ट असा ‘वास’ असतो. हा, आता ही गोष्ट वायली की तो ओळखायला ‘तजुर्बा’ लागतो..”

“यस सर ..”

“नुसती मुंडी हालवू नकोस, काय लागतो ?”

“तजुर्बा लागतो, समजले सर..”

मंदार आपल्या जागेवर गेला आणि प्रकाशला हसू आवरले नाही. पण प्रकरण येवढ्यावरच थांबले नाही!

मंदारला आपली फिरकी घेतली गेलीय हे लक्षातच आले नाही, त्याने ही टीप इतकी मनावर घेतली की, आता तो समोर येणाऱ्या प्रत्येक फॉल्टी बोर्डाचा वास घेत सुटला ! अर्थातच असा वास घेऊन फॉल्ट काय ते त्याला कधीच कळले नाही (आणि कळणार ही नव्हते म्हणा!). काही दिवस ही ‘हूंगेगिरी’ करून काहीच सुधरत नाही हे लक्षात येताच एके दिवशी मंदार पुन्हा प्रकाश च्या समोर..

“मंदार, काय रे, आता काय?”

“सर, सॉरी पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आता प्रत्येक फॉल्टी बोर्ड चा वास घेतोय , व्यवस्थित नोट्स ठेवतोय, पण मला कळत नाही, ह्या सगळ्या बोर्डस ना एकाच प्रकारचा प्लॅस्टिकचा वास का येतोय, फॉल्ट तर दरवेळी वेगवेगळे असतात मग वास वेगवेगळे यायला हवे ना? माझे काही चुकतेय का ?”

“बरेच..”

“माझ्या लक्षात नाही आले सर..”

“अरे वरवर जरी वास सारखेच वाटले तरी त्यात सूक्ष्म असा फरक असतोच, तो लक्षात आला पाहिजे ना, खरे स्किल तर तिथेच आहे , बाकी वास काय कोणीही घेईल?”

“हो सर, पण सर, हा सूक्ष्म फरक कसा ओळखायचा?

“नाका चे ‘कंडिशनिंग’ !”

“म्हणजे?”

“हे बघ, आपण ‘वास’ कशाने घेतो?”

“नाकाने , सर..”

“म्हणजे घेतलेल्या वासाचे इंटरप्रिटेशन करायला आपल्या नाकात एक प्रकारचा ‘सेन्सर’ असणार ना? मग फॉल्टी इलेक्ट्रोनिक्स पार्ट्स चे खास सूक्ष्म वास ओळखायला त्या सेन्सर चे ‘कंडिशनिंग’ आणि ‘कॅलिब्रेशन’ करायला नको का?”

“लक्षात आले सर, पण हे कंडीशनींग आय मीन कॅलिब्रेशन करायचे कसे?”

“सरसूचे तेल !”

“सरसूचे तेल?”

“बाजारात मिळते..”

“म्हणजे नक्की काय करायचे सर?”

“सोपे आहे, तू असे कर, नीट बघून चांगल्या ब्रॅन्ड्चे एक लीटर भर सरसूचे तेल आण, रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर हे तेल डोक्याला थाप, अगदी भरपूर लावायचे, हयगय करायची नाही, पार गालापर्यंत ओघळ वाहिले पाहिजेत, असे तेल लावूनच कामावर ये म्हणजे आपल्याला फाईन ट्यूनिंग पण करता येईल. समजलं”

“येस सर .. लगेचच सर..पण हे किती दिवस चालू ठेवायचे?”

“बाटली संपे पर्यंत”

“नंतर?”

“तुला आपोआपच सगळे वास यायला लागतील”

“पण सर, डोक्याला तेल लावून नाकाचा सेन्सर कसा काय कॅलीब्रेट होत असेल?”

“ते विचारू नकोस बेटा, हा आयुर्वेदिक नुस्का आहे, एकदम जालीम… जा आता..”
“येस सर”

आणि मंदार ने तो ‘नुस्का’ (?) लगेचच अमलात आणला ! आता पुढे काय झाले असेल ते मी सांगायला हवे का? मंदार ची ती तेलाची बाटली संपे पर्यंत त्या डिपार्टमेंट ची काय अवस्था झाली असेल त्याची तर कल्पनाच करवत नाही.

आता ही मंदारची स्टोरी याने की “हम तो सिर्फ सुंघ के बताते है ।” ची आताच का आठवण झाली ? याचा ज्योतिषाशास्त्राशी काय संबंध ?

सांगतू, समदे बैजवार सांगतू, पाव्हनं जरा बगू ती गाय छाप ची पुडी… आरे ये xxxच्या, ह्यो चुना वाळ्ळा की रं बेन्या , पानी कुनी घालून ठिवायचे रे ऑ.. येक काम धड करायला नको xxx ना, नुस्तं खायाचं, प्यायाचं, उंडारायचे आन वरतुन xxवर करून पडायचं मुड्द्यावानी..!

तर म्या  काय म्हनून रायलो होतो.. हा त्ये आपलं मंदार ची स्टुरी आन ह्ये ज्योतिष चा काय संबंध येऊन रायला ..बराबर ना?

आता त्ये वाचायचं आसल तर या इस्टुरीचा दुसरा भाग बगायचा … हिथेच  खालच्या अंगाला हाय , लगीच  घावल  बगा.  पन पाव्हनं,  त्ये वाचल्या नंतर  कामेंटी  टाकायला ईसरु  नकासा  म्हनजे जालं !

शुभं भवतु

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *