परवा एका जातकाशी बोलत असताना अचानक ही ‘उक्ती’ आठवली आणि हसायला आले.
खूप वर्षापूर्वी मी ही ‘उक्ती’ एका कडून ऐकली होती , आज आपल्यासमोर एका वेगळ्या संदर्भात सादर करत आहे.
गोष्ट तशी जुनी , एक सरकारी अधिकारी, गावोगावी , खेड्यापाड्यात जाऊन सरकारी योजनांची माहीती देणे, सर्व्हे करणे अशी त्याची कामे. अशाच कामासाठी त्याला एका आडवळणाच्या , दुर्गम अशा खेड्यात जावे लागले. सकाळच्या यस्टीने , खड्ड्यांच्या रस्त्यातल्या खड्ड्यांनी हाडे खिळखिळीं करुन घेत , सर्वांग धुळीने माखून घेत तो अधिकारी त्या गावात पोचला , काम संपे तोपर्यंत संध्याकाळ झाली. आता परत जायचे , पण कसे?
“सायेब , आज आसे कसे काय झाले कोन जाने पन सांजच्याला येनारी यस्टी आजून आलीच नाय बगा, आता ईतका लेट झाला म्हनजे आज दांडी मारली बगा यस्टीने .. हुतयं काय काय टायमाला आसं ”
“मग आता मी कसे परत जाणार”
“यानंतर दुसरी यस्टी नाय बा , ही येनार हुती तीच लास्ट , आता यकदम उद्याच्याला सकाळच्यान हाय बगा “
“मग आता?”
“नाय , आता तुम्ही म्हणतासा तर बैलगाडी जूपून पार सडकेवर सोडतो , थितून भ्येटेल तालुक्याची यस्टी , पण तेचा बी काय भरुसा नसतोय , लै येळ वाट बघाया लागल , लै टायम लागल..”
“बापरे !”
“सायेब, त्यापरिस आज रातच्याला हिथेच मुक्काम का करत नाय , सम्दी सोय करतु तुमची, यकदम बिनघोर र्हावा आन उद्याच्याला पयल्या यस्टिनं जावा की कसं.. आन नायतर तुमच्या सारकं लोक आमा गरीबाच्या वस्तीव कदीच्यान येनार? ”
तो अधिकारी दिवसभराच्या कामाने, धुळीने,उकाड्याने पकला होता, आता परत बैलगाडीने धक्के खात सडके पर्यंत जावून , तिथून परत बस ने तालुका गाठायचे त्राण पण त्याच्यात राहीले नव्हते . तेव्हा गावकर्यांच्या आग्रहाला मान देत त्याने गावातच मुक्काम करायचे ठरवले.
गावच्या पाटला कडे जेवण झाले , पानसुपारी फिरली, तसे पाटील म्हणाले “पाव्हणं , रातच्याला आमच रोज भजन असतया मारतीच्या द्येवळात , चला दोन घटका , तेवडाच टायमपास तुमाला“
देवळात भजन रंगात आले , अधिकारी तसा धार्मिक वृत्तीचा त्याचे मन नाही म्हणले तरी त्या भजनात रंगलेच. रात्र चढत चालली तसे भजनी मंडळाचा आवाज तापला , आणि मग त्यांचे एक खास भजन चालू झाले ” हरीण कासवा पोटी परळ्यात बाळ जलमला.. हरीण कासवा पोटी परळ्यात बाळ जलमला..” अधिकारी चमकला .. नेहमीचा ‘इट्ट्ला पांड्रंगा ..’ असला ट्रॅक सोडून हे एकदम नविन काय सुरु झाले , त्याला त्या भजनाच्या ओळींचा अर्थच समजला नाही. हे काय असावे बरे? कासवाच्या पोटी हरीण कसे काय आणि परळ म्हणजे मातीचे पसरट भांडे त्यात कोणता बाळ जन्मला.. काही केल्या त्याला त्याचा अर्थ समजला नाही.. कदाचित हे ‘नाथ संप्रदाया’ बद्दल असेल कारण त्यांच्यात असे विचित्र जन्म झालेले आहेत किंवा काही तरी गूढ , सांकेतीक वाणी असावी, नक्की काय असावे?
पाटला ने पाव्हण्याची चुळबूळ ओळखली
“काय पाव्हनं मन लागना का भजनात?”
“नाही तसे काही नाही, चांगले चालले आहे”
“तरी पन काय तर गडबड दिसतीया जनू”
“पाटील, एक गोष्ट लक्षात येत नाही.. हे ‘हरीण कासवा पोटी परळ्यात बाळ जलमला’ काय आहे ? नाही, माझा तसा थोडा भजनाचा . अभंगांचा अभ्यास आहे पण हे असले काही मी यापूर्वी ऐकले नाही बुवा..”
“आमास्नी तरी काय म्ह्यायती, अवो आमचे बापजादे ह्ये असेच म्हणायचे , तेंचे ऐकूनशान आमीबी त्येच म्हनतू झाले .. काय तर असल द्येवाचे .. आपल्याला काय ठावं नाय बा”
दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो अधिकारी सकाळच्या पहिल्या यस्टीने आपल्या गावी रवाना झाला पण हे ‘हरीण कासवा पोटी परळ्यात बाळ जलमला’ त्याच्या डोक्यातून जायला तयार नव्हते. बरेच दिवस झाले पण हे ‘हरीण..’ काही त्याचा पिच्छा सोडत नव्हते. एके दिवशी त्याच्या मित्राला त्याने हे सर्व सांगीतले , ते ऐकताच तो मित्र खदाखदा हसायला लागला!
“अरे एव्हढे हसायला काय झाले? तुला माहीती आहे हे काय ते ?
”तर , म्हणून तर हसायला येते आहे”
“प्लिज सांग ना मला याचा अर्थ काय”
“अरे सोपे आहे , बघ ह्यात गूढ , सांकेतीक असे काही नाही.. हरीणकासव म्हणजे आपला पुराणातला असूर राजा हिरण्यकश्यपू .. परळ्यात म्हणजे ह्या हिरण्यकश्यपू चा पुत्र ‘प्रल्हाद’ .. म्हणजेच ते लोक “हिरण्यकश्यपू च्या पोटी प्रल्हाद बाळ जन्मला’ असे म्हणताहेत पण पिढ्यांपिढ्या त्याचा अपभ्रंश होत होत त्याचे हे ‘हरीण कासवा पोटी परळ्यात बाळ जलमला” असे झाले आहे. “
हे कळल्यावर त्या अघिकार्याने एक मोठा नि:श्वास टाकला, एक मोठे कोडे सुटल्याचा आनंद त्याला झाला.
आता ही इस्टूरी अचानक आठवायचे कारण? सांगतो..
मुळात ज्योतिषशास्त्र जेव्हा निर्माण झाले तेव्हा छपाईचा शोध लागला नव्हता , जे काही ज्ञान होते ते मौखिक परंपरेने जतन करुन ठेवले जात होते. सगळे मुखोद्गत करुन ठेवायचे असल्याने स्वाभावीकच सर्व सुत्रे, नियम लयबद्ध अशा काव्यातून श्लोकांतून रचले गेले, साहजीकच हे करताना ते काव्यशास्त्राच्या नियमात ही बसावावे लागत होते , म्हणजेच छंद, यमक , ताल ई. त्यामुळे शव्ब्दांची कसरत करावी लागली. त्यातही हे सर्व संस्कृत भाषेत जिथे उच्चारागणीक अर्थ बदलत जातो. संधी , समास, प्रत्यय याचे काटेकोर नियम आहेत. या सार्याचा परिपाक असा झाला की श्लोक पाठ आहे पण त्याच्या दुर्बोध , काहीश्या सांकेतीक रचनेचा अर्थ लावताना चूका होऊन भलताच , चुकीचा अर्थ लागण्याची खूप मोठी शक्यता होती , एखादा गुरु जेव्हा आपल्या शिष्याला हे श्लोक शिकवत असे तेव्हा तो त्यामागचे व्याकरण समजाऊन सांगून त्या श्लोकाचा नेमका अर्थ सांगत असे , पण पुढे पुढे त्यात सरमिसळ व्हायला लागली, सातत्य राहीले नाही, परकिय आक्रमणांमूळे गुरु शिष्य परंपरा खंडीत होऊ लागल्या , श्लोक पाठ आहेत पण त्या श्लोकांचा योग्य तो अर्थ सांगू शकतील अशा अधिकारी व्यक्ती मिळणे दुर्लभ होत गेले. शेवती शेवटी तर चुकीचाच अर्थ प्रमाण मानला जाऊ लागला … आणि मग ‘‘हरीण कासवा पोटी परळ्यात बाळ जलमला” चा जन्म झाला!
आज ज्योतिषशास्त्रा वरील उपलब्ध ग्रंथ भांडार या अशा अनेक ‘‘हरीण कासव” छाप नियमांनी , सुत्रांनी बरबटले आहे. जो तो म्हणतोय “मला तरी काय माहीती, पराशरी मध्ये असेच लिहले आहे ना , के.पी. रिडर्स मध्ये असेच आहे ना , काही तरी विचार असेल त्या मागे. आपण कशाला डोके चालवायचे .. आपली पात्रता तरी आहे का तेव्हढी?” .
खरोखर हे नियम , सुत्रे काय असावीत , त्यामागचा कार्यकारण भाव काय असावा , आजच्या आधुनिक काळात त्यांचा कसा अन्वयार्थ लावायचा, कालानुरुप त्यात कोणते बदल करावे लागतील, कोणते नियम आजच्या काळात गैर लागू आहेत. कोणते भाकड आहेत , काही काही बघायला नको, कोणतीही मेहेनत करायला नको, पडताळणी करायला नको. बाबा वाक्यं प्रमाणं ..
मी माझ्या मर्यादीत क्षमतेत अशी काही “ हरीण कासवं’ हुडकून त्यांचा ‘हिरण्यकश्यपू’ करत आहे (चांगल्या अर्थाने) पण बाकीच्यांचे काय ?
आपल्याला फक्त घोकायचेय…
‘‘हरीण कासवा पोटी परळ्यात बाळ जलमला”
शुभं भवतु
he hhe…. mastach.. aavadla ha pan lekh. 🙂
आवडला लेख आधी ही गोष्ट वाचली होती
धन्यवाद श्री. अविनाशजी
सुहास गोखले