माझा ट्रेडिंगचा प्रवास! भाग २
यथावकाश माझे शिक्षण पूर्ण झाले, मी विंजिनेर झालो आणि नोकरी साठी पुण्यात दाखल झालो.
माझ्या सुदैवाने मला माझ्या एका नातेवाईंकांचा तेव्हा रिकामा असलेला अपार्टमेंट रहावयास मिळाला. तिथे राहायला आल्या आल्या वर ज्या ओळखी झाल्या त्यात होते श्री सत्यनारायण, ते सरकारी नोकरीत होते. एकदम भला माणूस.
त्यांच्या कडे ‘टाईम्स ऑफ इंडिया’ येत असे, तो पाहताच माझे डोळे लकाकले. मला काहीही करून ‘टाईम्स’ हवा होता, सांगलीला शिकत असताना हे शक्य नव्हते. नोकरीला लागले की स्वतः विकत घेऊन ‘टाईम्स’ वाचायचा हे अगदी ठरवलेच होते.
मला ‘टाईम्स’ वाचायचा होता ते बातम्या साठी नाही की माझे इंग्रजी सुधारण्या साठी नाही, माझा इंटरेस्ट होता ते त्याच्या आतल्या पानावर छापलेल्या शेअर्सच्या भावां मध्ये!
तेव्हा ‘टाईम्स’ एक पूर्ण पान शेअर्सचे रोजचे भाव छापत असे. प्रत्येक कंपनीच्या शेअर साठी चार एंट्रीज असायचा, ‘खुलता’ . ‘वाढून’ , ‘घटून’ आणि ‘बंद’ म्हणजे आजच्या भाषेत OHLC!
या शेअर लिस्ट मध्ये एक वर्णभेद होता, ग्रुप ‘ए’ – वायद्याचे शेअर आणि ग्रुप ‘ब’ – रोखीचे शेअर.
वायद्याच्या शेअर्सना T-15 चे सेटलमेंट असायचे म्हणजे आज जरी खरेदी/ विक्री केली तरी त्याची फक्त कागदोपत्री नोंद केली जायची, ना शेअरची डिलिव्हरी ना पैशाची देवाण घेवाण, सारा हिशेब आणि प्रत्यक्ष शेअरची डिलिव्हरी सेटलमेंट च्या दिवशी उरकली जायची. महिन्यात असे दोन सेटलमेंट दिवस निश्चित केले होते , म्हणूनच याला T-15 म्हणायचे.
तर रोखीच्या शेअर्स मध्ये मात्र व्यवहार ताबडतोब पूर्ण करावा लागत असे.
हा असा भेदभाव करायचे कारण म्हणजे ‘वायद्याचे’ म्हणून मानल्या जाणाऱ्या शेअर्स मध्ये रोजची प्रचंड उलाढाल होत असायाची हे व्यवहार रोजच्या रोज पूर्ण करणे खूप जिकिरीचे ठरले असते म्हणून १५ दिवसांचा सेटलमेंट ची कल्पना आली, त्यामुळे हे इतके सारे व्यवहार वेळ न गमावता झटपट होऊ शकतील. रोखीच्या शेअर्स मध्ये फारशी उलाढाल होत नसल्याने त्यांची सेटलमेंट रोजच्या रोज करणे सोपे असायचे.
हा वर्ण भेद कामकाजाच्या सोयी साठी केला असला तरी बाजारात त्याला वेगळाच अर्थ होता, प्रत्येक कंपनीला आपला शेअर ‘ए’ गटात यावा असे वाटायचे, शेअर ’ए ’ गटात असणे प्रतिष्ठेचे मानले जायचे!
असो, माझा तेव्हाचा पगार (पगार नव्हता तो, स्टायपेंड म्हणायचे त्याला) रोजचा ‘टाईम्स’ विकत घेऊन वाचण्याची मुभा देत नव्हता. मी सत्यनारायणांना विनंती केली मला त्यांच्या कडे रोज येणाऱ्या ‘टाईम्स’ मधले फक्त एक पान काटून द्या (बाकीचा पेपर तुमच्या कडेच ठेवा, रद्दीच्या इनकम साठी!) अर्थात ते पान म्हणजेच हे शेअर चे भाव असलेले पान!
सत्यनारायण हसत हसत तयार झाले, त्यांना माझे कौतुक वाटले, काल इंजीनियर होऊन बाहेर पडलेला एक ‘मराठी’ युवक शेअर बाजारात रुची दाखवतो ! ते मला म्हणाले सुद्धा की “एक मराठी तरुण शेअर बाजारात इतका इंटरेस्ट दाखवताना पहिल्यांदा पाहतोय!” ‘टाईम्स’ चे ‘ते’ पान काटून देताना ते मला सावधगिरीचा सल्ला ही द्यायचे, म्हणायचे, “सुहास, हे जरा रिस्की असते, जपून , अनेक लोक यात बरबाद झाले आहेत.”
अर्थात हा सल्ला मला या ना त्या स्वरूपात आजही दिला जातो!
‘टाईम्स’ मधले रोजच्या रोजचे ताजे भाव (फुकटात) हातात पडायला लागल्या वर मला संचारले.
तसा मी जात्याच हुशार (असे मी समजतो !) त्यात इंजिनियरींचे शिस्तबद्ध, लॉजिकल, प्रॅक्टिकल शिक्षण घेतलेला. मी एक सिस्टीम उभी करायचे ठरवले.
सर्व प्रथम मी भारतातल्या त्या साऱ्या कंपन्यांचे वर्गीकरण केले. जसे :
- FMCG
- फार्मासुटिकल
- सिमेंट
- स्टील
- केमिकल
- हेवी मशिनरी
- टेक्स्टाइल
- कन्स्ट्रकशन
- वाहन उद्योग
- टायर आणि आटो पार्ट्स
- चहा – साखर
- खते
या प्रत्येक गटातील २-३ टॉप च्या कंपन्या मी निवडल्या, आता माझ्या समोर सुमारे ५० कंपन्यांची यादी तयार झाली. इथे एक काळजी घेतली होती ती म्हणजे या साऱ्या कंपन्या ‘ए ’ गटातल्या असतील. या अशा कंपन्यांना ‘ब्लू चिप’ कंपन्या म्हणतात हे मला तेव्हा माहिती नव्हते आणि Nifty 50 तेव्हा अस्तित्वातच नव्हती!
अर्थात आज च्या अनेक लीडिंग कंपन्या तेव्हाच्या माझ्या यादीत नव्हत्या कारण तेव्हा ‘IT’ इंडस्ट्री सुरू सुद्धा झाली नव्हती, खाजगी बँका सुरू व्हायचा होत्या आणि सरकारी बँका पब्लिकली ट्रेडेड नव्हत्या , इन्फ्रा, पेट्रोकेमिकल , इंटरटेनमेंट, टेलिकॉम , पॉवर , शिपिंग हे सेक्टर हलू हलू आकार घेत होते.
माझी यादी तयार झाल्या नंतर मी बाजारातून पाच -सहा फुल स्केप वह्या आणल्या आणि त्यात या ५० कंपम्याचे सोमवार ते शुक्रवार या प्रत्येक आठवड्याचा (weekly) OHLC नोंद करायला सुरवात केली, आजच्या भाषेत बोलायचे तर मी कळत नकळत ‘Weekly Time Frame’ वापरायला लागलो होतो.
त्या दरम्यान 1987 मध्ये मी माझा जॉब बदलला! नव्या नोकरीत मला ‘मार्केटिंग’ करायचे होते ते सुद्धा त्या काळी अगदी नव्या असलेल्या एका उत्पादनाचे ते म्हणजे ‘कॉम्प्यूटर’ !
नोकरीस सुरवात केल्या वर मला एक महिन्याचे ट्रेनिंग बंगळुरू ला (तेव्हा ते ‘बेंगलोर’ होते) मिळाले आणि ‘जा आता माल विका..” अशी तंबी देऊन पुण्याला परत पाठवले गेले.
मी आपला रोज कडक इस्त्रीचे कपडे, नेक टाय, पॉलिश केलेले बुट आणि हातात तेव्हा बरीच कुप्रसिद्ध असलेली ट्रेडमार्क ब्याग, अशा अवतारात शिकार करायला बाहेर पडायचो.
आणि पहिल्याच महिन्यात मी चक्क ‘वाघ’ मारला. मी एक खूप मोठी ऑर्डर मिळवली! तेव्हा माझा कंपनीत याची मोठी चर्चा झाली होती, इतकेच नव्हे तर मला त्या परफॉर्मन्स बद्दल एक प्रशस्ती पत्रक पण मिळाले होते.
आणि आश्चर्य म्हणजे ही ऑर्डर मिळण्या मागे ज्याचा फार मोठा हातभार होता तो होता “शेअर बाजार” !
त्याचे असे झाले…..
क्रमश:

पुढचा भाग टाका की राव … उत्सुकता ताणली गेलीये 🙂
नक्की