माझा ट्रेडिंगचा प्रवास! भाग १

होय मी ट्रेडिंग करतो, अरे नाही नाही ट्रेडिंग कसले, मी चक्क ‘सट्टा’ खेळतो ,

मी सट्टेबाज आहे! आपले आधीच स्पष्ट केलेले बरे. ठीक आहे, आता पुढे वाचा…

माझ्या लहानपणी म्हणजे बारावी पर्यंत तरी शेअर बाजार, ट्रेडिंग ची माहिती मला असण्याची सुतराम शक्यता नव्हती.

पुढे १९८३ मध्ये मी इंजिनियरीगला शिकत होतो, त्याच वर्षी माझ्या मावसभावाची सोलापूर हून सांगलीला (माझ्या गावात) बदली झाली, माझा मावसभाऊ बँकेत कामाला होता. तो शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असे, मी त्याच्या कडे अधून मधून चक्कर मारत असे तेव्हा त्याच्या टेबलावर अनेक कंपन्यांचे एन्युअल रिपोर्ट्स, IPO फॉर्मस चे गठ्ठे पडलेले पाहायचो. मावसभाऊ ते रिपोर्ट्स अगदी बारकाईने वाचत असे, अनेक पानांवर पेन ने अंडर लाईन करत असे, मी ते सारे उसुकतेने पहात असे.

मावसभावाने मला त्यातल्या काही गोष्टी (P/E Ratio!) समजावून सांगितल्या देखील. पण तेव्हा ते सारे माझ्या डोक्यावरून गेले, हे स्वाभाविकच होते, मी पडलो इंजिनियरिंग चा विद्यार्थी आणि हे सारे ज्ञान कॉमर्स / अर्थशास्त्र विषयातले. ते काहीही असले तरी ते सर्व पाहून माझी उत्सुकता चाळवली गेली होती हे मात्र खर.

‘शेअर सर्टिफिकेट’ नामक कागद मी त्याच्या कडेच पहिल्यांदा बघितला. तेव्हा आजच्या सारखे Demat नव्हते, सारा व्यवहार कागदोपत्रीच असायचा, शेअर विकत घेतले की त्या बदल्यात एक शेअर सर्टिफिकेट मिळायचे तोच तुमच्या मालकी हक्काचा पुरावा! त्यामुळे शेअर सर्टिफिकेटस बँकेच्या लॉकर मध्ये अगदी जपून ठेवली जायची !

शेअर सर्टिफिकेटच्या मागच्या बाजूला हे शेअर कोणा कडून कोणाकडे हस्तांतरित होते गेले याच्या क्रमवार नोंदी असायच्या, आधीच्या सर्व मालकांची नावे आणि सह्या असायच्या!

मला आठवते, मावसभावा कडे असलेले एक शेअर सर्टिफिकेट त्या वेळेच्या एका नामवंत क्रिकेट खेळाडू कडून आले होते, तर दुसऱ्या एका शेअर सर्टिफिकेट च्या मागच्या बाजूला तेव्हाच्या हिंदी सिनेमात खलनायकाची भूमिका करणाऱ्या एका नामवंत अभिनेत्याचे नाव आणि सही होते, ते पाहून मला मोठी मजा वाटली होती.

या सगळ्याला खऱ्या अर्थाने गती (पुश!) मिळाली ते साप्ताहिक लोकप्रभा मधल्या एका लेखमालेतून, एक टोपण नाव घेतलेली व्यक्ती शेअर बाजारावर अत्यंत खुमासदार शैली मध्ये अगदी सुबक असे लेख दर आठवड्याला लिहीत असे, सुमारे २०-२५ भागांची ती लेखमाला होती. त्यातून मला शेअरबाजाराची कार्यपद्धती , ब्रोकर नामक प्राणी काय असतो, एक्सचेंज म्हणजे नेमके काय, बाजारात व्यवहार कसे होतात, सेटलमेंट कसे चालते (तेव्हा 15 दिवसांचा सेटलमेंट पीरियड असायचा T-15!) ,या सेटलमेंट च्या अवधीचा वापर करून नसलेले शेअर विकून किंवा उधारीत शेअर खरेदी करून देखील कसे पैसे कमावले जातात, शेअर भाड्याने देऊन ट्रांनज्याकशन टॅक्स कसा वाचवला जायचा या सारखे अद्भुत किस्से, शेअर बाजारातल्या अनेक सुरस गमती जमती, ट्रिक्स हा भाग चांगला समजला, माझ्या कडे त्या लेखांची कात्रणे कित्येक वर्षे होती पुढे काळाच्या ओघात कधीतरी गायब झाली.

इंजिनियरिंग च्या शेवटच्या वर्षाला आम्हाला मॅनेजमेंट चा एक विषय होता, माझ्या सर्व सहाध्यायांना तो अत्यंत कंटाळवाणा विषय वाटत होता पण मला मात्र तो अत्यंत आवडत असे. या विषयाच्या संदर्भात कंपनी, शेअर्स इ बाबत काही शिकवले होते तेव्हा सरांनी ‘शेअर ट्रेडिंग म्हणजे सट्टा नाही’ हे छान पणे समजाऊन सांगितले होते. (हे सर्व शिकवणाऱ्या प्रा. तिलवल्ली सरांचा मी आजन्म ऋणी आहे)

त्या काळातच माझ्या ज्ञानात फार मोठी भर घालणारी एक गोष्ट झाली. तेव्हा माझ्या मावसभावाकडे एक गुंतवणूक विषयावर असलेले एक इंग्रजी दैनिक बुक-पोष्ट ने (डाक एडिशन) येत असे, आख्ख्या सांगलीत एकटा माझा मावसभाऊ त्याचा ग्राहक होता. त्या दैनिकात एका प्रख्यात अमेरिकन ट्रेडर ने लिहलेले पुस्तक क्रमश: प्रकाशित होत होते, मी त्याची कात्रणे पण जमा केली होती, त्या ट्रेडर ने लिहलेले फारसे काही समजले नाही पण त्या ट्रेडर च्या ट्रेडिंग मधल्या प्रवासाची कहाणी वाचून मी खूप प्रभावित झालो होतो हे नक्की.

मी तेव्हा म्हणत असे, ‘साला आपून को भी ऐसाच कुछ करना है “

त्या लेखकाचे नाव आहे:

आणि ते पुस्तक आहे:

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *