इसापनीती आणि शेअर बाजार – २

ससा कासवाला खिजवतो,— “तु काय माझ्याशी स्पर्धा करणार? मी हा हा म्हणता चार छलांग मारून केव्हाच स्पर्धा जिंकेन, माझी गती बघ आणि तुझी बघ, इतके हल्लू हल्लू चालत तू कधी शर्यत जिंकणार?”

कासव काही बोलत नाही. ते फक्त आपल्या संथ गतीने चालत राहते . इंच इंच का होईना, सातत्याने आपल्या लक्ष कडे पुढे सरकत राहते.

शेअर बाजारातही ससा – कासव प्रकारचे ट्रेडर्स असतात.

ससा ट्रेडर ला फक्त ट्रेडस हवे असतात, काहीही करून, कसेही करून ट्रेड्स घेतलेच पाहिजेत, जितके जास्त ट्रेड घेऊ तितका आपला नफा किंवा नफा मिळण्याची शक्यता वाढते असा त्याचा ठाम विश्वास असतो. त्यासाठी त्याला फक्त आणि फक्त ट्रेड हवा असतो.

मार्केट उघडले रे उघडले – घे ट्रेड

पाच मिनिटांनी— आणखी एक ट्रेड !

दुपारी— पुन्हा एक ट्रेड !

एका ट्रेड मधला लॉस भरून काढायला आणखी एक ट्रेड

आजचे टार्गेट गाठायचे म्हणून म्हणून ट्रेड

पुन्हा पुन्हा ट्रेडस

“आज बाजाराने काहीच दिले नाही!” म्हणत आणखी एक ट्रेड

‘हा आजचा शेवटचा’ म्हणत आणखी एक ट्रेड….

कासव ट्रेडर मात्र शांत बसतो.

त्याला ट्रेड ची घाई नसते, त्याच्याकडे ‘सेट अप’ नसेल तर तो ट्रेड करत नाही. कारण त्याला माहीत असते—

“ट्रेड न घेणे हा देखील एक ट्रेड आहे! No Trade is also a Trade.”

कासव वेडे वाकडे, बेताल, नुकसान देणारे ट्रेड्स घेतच नाही. त्याचे ध्यान ‘क्वालिटी’ कडे असते ‘क्वांटिटी’ कडे नसते.

तो दिवसभर चार्ट वर लक्ष ठेवून बसतो, कोणत्याही FOMO च्या सापळ्यात तो अडकत नाही. फेक ब्रेक आउटस त्याला विचलित करत नाहीत. त्याने लार्जर टाइम फ्रेम वर मार्केटचा अभ्यास केलेला असतो, मार्केटचा ट्रेंड काय आहे हे तो पक्के जाणून असतो , ट्रेड घेतलाच तर त्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो काय राहील याचे गणित त्याने आधीच केलेले असते.

योग्य सेट अप मिळे पर्यंत तो वाट पहात, दिवसात एकच क्वचित दुसरा ट्रेड घेतो. हा ट्रेड बहुतांश वेळा यशस्वी ठरतो,

उत्तम रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग केल्याने त्याचे लॉसेस मर्यादित असतात आणि तुलनेत प्रॉफिट मोठा असतो.

असे संयमाने खेळत तो आपले भांडवल शाबूत तर राखतोच पण रोज त्यात थोडी थोडी वाढ करत राहतो,

ससा ट्रेडर ओव्हर ट्रेडिंग करत राहतो त्यात रिव्हेंज ट्रेडिंगची भर घालतो, परिणाम स्वरूप लहान प्रॉफिट – मोठा लॉस या दुष्टचक्रात तो अडकून पडतो.

तसा तो एक दोन मोठ्या छलांग मारतो देखील, पण त्यामुळे त्याला ओव्हर कॉन्फिडन्स येतो, ‘मार्केट मेरी मुठ्ठी में ‘; ‘मै च भगवान हू ‘ असे स्वतःला समजत तो आणखी बडा हात मारण्या साठी मोठे लिव्हरेज वापरून भली मोठी पोझिशन घेतो आणि डोळ्याचे पाते लवते ना लवते तो लिक्वोडेट होतो.

इतकी हातघाई करून देखील शेवटी त्याचे अकाउंट वाढत नाही, तो जिथून सुरवात केली तिथेच घुटमळत राहतो आणि काही काही वेळा तर अकाउंट साफ झाल्याने मार्केट मधून बाहेर पडायची नामुष्की येते.

पैसा कमावणारा ट्रेडर सर्वात जास्त ट्रेड करणारा नसतो. तो असतो— सर्वात शिस्तबद्ध ट्रेडर.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *