प्रसंगावधान
माझ्या एका फोटोग्राफर मित्राने सांगितलेला हा १९८० साली घडलेला एक खराखुरा किस्सा.
माझा हा मित्र व्यावसायिक फोटोग्राफर. त्या काळात लग्न सोहळ्यांचे फोटो काढण्याची कंत्राटे तो घ्यायचा. असंच एका लग्नाचं कंत्राट त्याला मिळालं होतं. कॅमेरा, वेगवेगळे लेन्सेस, फ्लॅश, जादाचे फिल्म रोल्स आणि बॅटरीज असं आपलं सगळं ‘साहित्य’ घेऊन तो वेळेत विवाह स्थळी पोहोचला.
काम सुरू करण्यापूर्वी त्याने वधू-पित्याला विचारलं,
“काका, माझी ही सामानाची बॅग सुरक्षित ठेवायला कुठे जागा मिळेल का?”
वधू-पित्याने समोरच्या खोलीकडे बोट दाखवत म्हटलं,
“ती उजव्या हाताची खोली दिसतेय ना, तिथे ठेवा. तिथे आमचे इतर किंमती, महत्त्वाचे सामान पण आहे आणि आमची आज्जी तिथेच बसून राखण करतेय. तिला सांगून ठेवा म्हणजे झालं!”
फोटोग्राफर खोलीत गेला. खुंटीला बॅग अडकवली आणि आजींना म्हणाला,
“आज्जी, माझी सामानाची बॅग इथे टांगून ठेवतोय, जरा लक्ष ठेवा हं!”
आज्जी हसत म्हणाल्या,
“बाळा, तू निर्धास्त राहा! मी इथे भक्कम बसलेय, कोणाची बिशाद आहे तुझ्या बॅगेला हात लावायची?”
लग्नाचा सोहळा उत्साहात सुरू झाला. अंतरपाट, मंगलाष्टके, अक्षता… माझा मित्र कॅमेऱ्याच्या क्लिक-क्लिक आवाजात फोटो टिपण्यात दंग झाला. काही वेळाने त्याच्या लक्षात आलं की कॅमेऱ्यातील फिल्मचा रोल संपत आलाय, आता नवा रोल भरणं गरजेचं होतं.
तो घाईघाईने त्या खोलीकडे गेला, पण तिथे पोहोचताच तो थबकला—त्या खोलीच्या दरवाजाला चक्क मोठं कुलूप ठोकलेलं होतं!
त्याने आसपास चौकशी केली, पण कोणालाच काही माहिती नव्हती. शेवटी नाईलाजाने तो धावतच वधू-पित्याकडे गेला आणि म्हणाला,
“काका, अहो मला माझी सामानाची बॅग हवीय, पण तुम्ही तर त्या खोलीला कुलूप लावलेले दिसते! जरा किल्ली देता का?”
वधू-पिता ठाम आवाजात म्हणाला
“तुम्हाला काय हवंय ते सांगा, मी आत्ता कोणाला तरी बाजारात धाडून आणून देतो, आपले ते ‘जप्तीवाले’ फोटोग्राफर आहेत ना, त्यांना ही फोन करून ठेवलाय ते करतील सगळी मदत, पण ती खोली आत्ता उघडणार नाही!”
“पण काका, माझी स्वतःची बॅग तिथे—”
“पण-बीण काही नाही! काय हवंय ते बोला, मी बाजारातून नवीन मागवून देतो, पण खोलीची किल्ली मिळणार नाही!”
फोटोग्राफर अचंबित झाला. पण वेळेचं महत्त्व ओळखून त्याने बाजारातून नवीन फिल्म रोल्स आणि बॅटरीज मागवून घेतल्या आणि कशीबशी वेळ मारून नेली.
दिवसभर लग्नसोहळा पार पडला. पंगत झाली, वधूची भावूक बिदाईही झाली. हळूहळू पाहुणे मंडळी पांगली. फोटोग्राफरचं काम संपलं होतं, पण सामानाची बॅग तिथेच अडकलेली. तो पुन्हा वधू-पित्याकडे गेला आणि त्यांना जरा बाजूला नेऊन हळूच विचारलं,
“काका, आता तरी मला माझी बॅग मिळेल का?”
वधू-पित्याने खिशातून किल्ली काढली आणि म्हणाला,
“थांबा, आता खोली उघडून तुमची बॅग आणून देतो.”
बॅग हातात आल्यावर फोटोग्राफरला राहावलं नाही. त्याने विचारलंच,
“काका, आत्ता लगेच खोली उघडलीत मग सकाळी तुम्ही खोली उघडायला इतका विरोध का करत होता?”
वधू-पित्याने एक मोठा निश्वास सोडला. त्यांचे डोळे पाणावले होते. अत्यंत धीरगंभीर आवाजात म्हणाला ,
“बाळा, त्या खोलीत आज्जी होत्या ना… त्या सकाळीच बसल्या जागी शांत झाल्या. त्यांचं निधन झालं ! हे जर सकाळीच बाहेर कळलं असतं, तर चालता लग्नसोहळा थांबला असता. कार्यात विघ्न आलं असतं. अपशकुन झाला म्हणून कदाचित लग्न मोडलंही असतं! म्हणून आज्जी गेल्याचं कोणालाही कळू नये यासाठी मीच छाती वर दगड ठेवून त्या खोलीला कुलूप ठोकलं होतं.
आता लग्न पार पडलंय… मुलीची बिदाई झालीय…
आता माझी आज्जी गेली तरी चालेल!”
वधू-पित्याचं ते उत्तर ऐकून फोटोग्राफर सुन्नच झाला. एका बाजूला अतीव दुःखाचा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला मुलीच्या भविष्यासाठी दाखवलेलं ते कठोर प्रसंगावधान… !
“आता लग्न पार पडले आहे, आता आज्जी गेल्या तरी चालेल”
हे वाक्य वरकरणी निर्दयी वाटले, तरी त्या क्षणी संपूर्ण कुटुंबाची अब्रू आणि मुलीचे भविष्य वाचवण्यासाठी त्यांनी स्वीकारलेले ते एक भयंकर पण व्यावहारिक सत्य होते
कठीण प्रसंगांत देखील भावनांना आवर घालून परिस्थिती कशी सावरून येते याचा हा किस्सा जितका रंजक आहे, तितकाच माणसाच्या मनोधैर्याची परीक्षा पाहणारा आहे!
