आता काही जणांना हे ‘मटिरियल’ म्हणजे काय हे ठावे नसेल म्हणून पैल्या झूठ त्याचाच खुलासा.
‘मटेरियल’ म्हणजे ‘मसाला पाना’ मध्ये जे काही घालत असत ते सगळे . म्हणजे बघा, सुप्पारी, बडिशेप, गुंजेचा पाला, वर्खाचा कात, अस्मानतारा, खजुर, खोबरे , टुटीफ्रुटी, तुकडा काजू , इलायची, लौंग आणि भक्कम चमचा – दोन चमचा गुलकंद . हे सग्ळे पानात घालण्या ऐवजी कागदाच्या चिटोर्यावर घालून , मिक्स करून द्येत. चार आण्याला !
तेव्हा आम्ही त्या वेळा पाचवी (का सहावीत आता लक्षात नाय) , आम्हाला शिनियर असलेल्या (आणि पोहोचलेल्या) स्टूडंट्स कडून या मट्रीयल बद्दल बरेच ऐकले होते तेव्हा येकदा काही ही करुन हे मटेरियल ख्यायचे असे आम्ही ठरवले, आम्ही म्हणजे मी , गोसाव्या, भाट्या, आळत्या ,परांजप्या , रत्नपारख्या आणि दोघे तिघे जण.
तसे मार्ती चौकात मट्रीयल मिळू शकले असते पण ते सेफ नव्हते, नक्की कोणीतरी बघितले असते , मटेरियल झाले म्हणून काय ‘स्यूडंट लोस्क’ नी पानपट्टीवर जौन असले काही खाणे म्हणजे तौबा तौबा !
शाळे पासून (सिटी हाय स्कूल) हाकेच्या अंतरावरचे ‘तृप्ती’ हाटील अगदी नुकतेच नव्वे कोरे होते त्याच्या दारातच एक पानवाला होता, तृप्ती तसे इझी आणि सेफ वाटले. कोणी पाहणार नाही, मधल्या सुट्टीत हलूच जाऊन मट्रीयल खाऊन साळसूदा सारखे वर्गात येऊन बसले तरी या काणाचा त्या काणाला पत्त्या लागणार नाय.
ठरले !
प्लॅनिंग सुरु झाले , मास्टर माईंड अर्थातच मी ! तेव्हा ‘चार आणे’ देखील मोठ्ठी रक्कम गड्यांनो, सगळ्यांनी जसे जमेल तसे हल्लू हल्लू , आज दोन पैसे , उद्या येक पैसा ( हसू नका , तेव्हा ही नाणी होती, चालत पण होती!) असे करत करत चार आणे जमवायचे होते. मी ‘कॅशर आणि अकौटटंट’ !
मी जमलेलेल पैसे पत्र्याच्या डब्बीत ठेवायचो , वहीत मागच्या पाणावर कोणाचे किती पैसे आले याची बैजवार नोंद करुन टोटल ओढायचो , यकदम शिस्तीत काम !
पैसे जमत आले तसे येकदा स्गळ्यांनी मिलून ड्राय रन घेतला, त्ये आजकालच्या जमान्यात ‘रेकी’ का काय म्हणतात त्ये क्येले , वेळेत कसे बसवायचे , पळापळ झालीच तर (म्हणजे कोणी हटकले तर) कोणी कोठे लपायचे इ सर्व अभ्यास झाला !
शेवटी यकदाचे सगळ्यांचे पैसे जमा झाले ….
मी रुबाबात चिठ्ठी लिहली “ पैसे जमले, आज मधल्या सुट्टीत, आपण सगळ्यांनी तृप्ती हॉटेलच्या पानपट्टी वर मटीरियल खायला जायचे आहे” वर खाली ‘सुहास गोखले’ अशी लफ्फेदार सही पण ठोकली ..
मी तेव्हा पयला बाका वर बसत होतो आणि बाकी मंडली अशीच विखुरलेली , मी चिठ्ठी मागच्या बाकावरच्या ‘अरुण गणेश’ ला दिली , हा पण आमच्याच गँग मधला, आणि सांगीतले चीठ्ठी वाच आणि वाचून झाली की मागे भाट्या कडे पोचीव. भाट्या ने चिठ्ठी वाचून परांजप्या कडे , परांजप्या कडून रत्नपारख्या कडे असे चांगले चालले होते पण घात झाला !
तो ऑफ तास होता आणि डी एस कुलकर्णी सर आले होते ते कसले तरी पुस्तक वाचून दाखवत होते. त्यांच्या नजरेतून हा ‘चिठ्ठीचा’ प्रवास सूटला नाही.
“इकडे आणारे तो ‘खलिता’ “
खलिता सरांच्या हातात पडला , त्यांनी तो वाचला , …
“आम्ही पण येणार मट्रीयल खायला’ …
असे म्हणत खलीता लिहणार म्हणून माझी आणि खलित्यात णावे असलेल्या सार्या वर्गबंधूं ची यथेच्च धुलाई झाली,
सगळ्यांना बखोटीला धरुन , वरात काढत मुख्याध्यपकां ( भ रा नाईक) समोर हुभे केले , त्यांनी ही रितसर पूजा बांधली, मास्टर माईंड म्हणून मला स्पेशल ‘अभिषेक’ !
खजिना जप्त केला केला तो वेगळाच !
यथासांग सगळ्यांच्या घरी पण कळवण्यात आले, मग काय घरोघरी उत्तर पूजा !
