लेवरेज चा फंडा! भाग 2

बाजारातून म्हणजेच एक्सचेंज कडून बीटीशी विकत घ्यायचा म्हणजे पैसा हा मोजावाचा लागणार, मग सगळा पैसा ट्रेडरचा असेल किंवा थोडा ट्रेडरचा आणि बराचसा ब्रोकरचा (लिव्हरेज). एक्सचेंज म्हणणार तुम्हाला १ बीटीशी पाहिजे असेल तर बिटीशीच्या सध्याचा बाजारभावा प्रमाणे खण खण वाजवून पैसे मोजा, पैसे कोणाचे याचे मला काय काही देणे घेणे नाही (ते तुमचे तुम्ही बघा).

आधीच्या उदाहरणात आपण पाहिले होते की एकट्या विकीला १ बीटीशी मिळवून देण्या साठी ब्रोकर ला स्वतःच्या खिशातून ५४ लाखाच्या आसपास पैसे भरावे लागतील. ही काही लहान सहान रक्कम नाही. इथे एकटा विकी नाही , ब्रोकर कडे असे लाखो विकी हात पसरून उभे असतील ज्यांना लिव्हरेज सुविधा हवी आहे. या सगळ्यांना पैसे उधार द्यायचे तर साक्षात कुबेराचा खजिना रिता होईल! ब्रोकर किती ही पैसेवाला असला तरी हे अशक्य आहे.

मग ब्रोकर तर तिजोरी उघडून मागेल त्याला खिरापती सारखे अब्जावधी रुपयांचे लिव्हरेज देत बसलाय, मग इतका सारा पैसा तो आणतो कोठून?

भारतीय शेअर बाजारात ब्रोकर आणि एक्सचेंज या स्वतंत्र संस्था आहेत, भारतात बॉम्ब स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ही दोनच स्टॉक एक्सचेंजिस आहेत पण झिरोधा, धन, ग्रो, कोटक निओ असे 100 एक ब्रोकर आहेत. भारतातली स्टॉक एक्सचेंजिस ब्रोकिंग चे काम करत नाहीत, ट्रेडर ला आपले सौदे एखाद्या ब्रोकर मार्फतच करावे लागतात, ट्रेडर कडून ब्रोकर – ब्रोकर कडून एक्सचेंज किंवा उलट असा प्रवास असतो.

क्रिप्टो मार्केट मध्ये मात्र असे नाही बहुतेक सर्व क्रिप्टो ब्रोकर्स हे स्वत:च एक एक्सचेंज असते, Delta, Binance , Coin DCX, Exness हे सर्व ब्रोकर पण आहेत आणि स्वतः एक एक्सचेंज पण आहेत. आता ब्रोकर आणि एक्सचेंज एकाच असल्याने पैशाचे साटेलोटे करणे सहज शक्य आहे.

ब्रोकर लिव्हरेज देत म्हणाला की बघ इतके सारे पैसे मी माझ्या खिशातून देत आहे तरी प्रत्यक्षात असा पैसा दिला जात नाहीच. ब्रोकर आणि एक्सचेज एकच असल्याने तुमच्या व्यवहाराचा (सौद्याची) फक्त कागदोपत्री नोंद होते, प्रत्यक्षात पैसा जमा होतच नाही. इकडे ब्रोकर तुमचा मात्र हिस्सा इमाने इतबारे तुमच्या अकाउंट मधून काढून घेत असतो.

त्यामुळेच कितीही विकी आले, अब्जावधी रुपयाचे लिव्हरेज दिले गेले तरी प्रत्यक्षात बाजारात फक्त आणि फक्त तुमचाच पैसा फिरत असतो, ना ब्रोकरचा ना एक्सचेंजचा! लिव्हरेज हे फक्त बोलाची कढी आणि बोलाचाच भात! हे काहीसे ‘हवाला’ रॅकेट सारखे काम करते.

जरी ब्रोकर स्वतंत्र असला तरी तो अनेक मार्गाने पैसे फिरवू शकतो. उदाहरण द्यायचे तर ब्रोकर कडे लाखो अकाउंट असतात, त्यात अब्जावधी रुपये पडून असतात, कारण, बहुतेक ट्रेडर अकाउंट बॅलन्स च्या लहान हिस्साच प्रत्यक्षात ट्रेडिंगला वापरतात बाकी सारा पैसा त्याच्या अकाउंटला पडून असतो, 1,00,000 अकाउंट बॅलन्स वाला ट्रेडर फक्त 20-25 हजाराचे ट्रेड घेत असतो, उरलेले 75,000 असेच पडून असतात. ब्रोकर याचा फायदा उठवतो आणि हे असे निष्क्रिय पैसे तुमच्या नकळत लिव्हरेज वा अन्य कामासाठी वळवले जातात.

पूर्वी भारतातले ब्रोकर देखील असा गैर व्यवहार मोठ्या प्रमाणात करत होते म्हणून SEBI ने आता नियम बनवून दर तीन महिन्यांनी ब्रोकरला ट्रेडरच्या अकाउंट मधले सर्व पैसे ट्रेडरच्या पर्सनल बँक अकाउंटला वापस जमा करायची सक्ती केली आहे!

ब्रोकर ‘लिक्विडिटी’ खरेदी विक्री करून देखील पैसा वळवू शकतो. त्या साठी त्याला त्याचा ऑर्डर बुकात खूप सौदे पडून राहिलेले दाखवता आले पाहिजेत, या साठी मोठ्या प्रमाणात सौदे आकर्षित करून घेण्यासाठी ब्रोकर आटापिटा करत असते, लिव्हरेज हे या यातायातीचा एक भाग आहे. आता हे लिक्विडीटी प्रकरण खूप कॉम्प्लिकेटेड असल्याने त्याचा जास्त ऊहापोह इथे करता येणार नाही.

आपण मुख्यत्वे करून डे ट्रेडिग ची बात करत आहोत पण अशा लाखो व्यक्ती बाजारात आहेत ते ट्रेडर नाहीत तर इन्व्हेस्टर्स आहेत. हे लोक पोझिनल / स्विंग ट्रेडिंग करतात. ह्यांचे ट्रेड्स दीर्घ कालीन असतात, स्विंग ट्रेड वाले आठवडा, महिना भर ट्रेड चालू ठेवतात तर पोझिशन ट्रेड वाले सहा महिने ते वर्ष दोन वर्षे. त्यामुळे त्यांनी गुंतवलेले पैसे बराच काळ ‘लॉक’ होतात, ब्रोकर ला हे माहिती असते त्यामुळे असे ट्रेड्स हे नेहमी कागदोपत्री नोंद करून ठेवले जातात आणि इन्व्हेस्टर्स ने अशा ट्रेड्स साठी भरलेले पैसे बिनधास्त दुसऱ्या कामासाठी वापरले जातात.

आणि शेवटी, ब्रोकर / एक्सचेंज ला हे माहिती असते की 95% ट्रेडर्स हे लॉस करणार आहेत, अवघ्या 5% ट्रेडर्स च्या बाबतीत ट्रेडर ला नफा स्वरूप पैसे परत द्यावे लागणार आहेत. त्यामुळे कितीही रकमेचा ट्रेड मारला तरी तो सुरवातीला कागदोपत्रीच ठेवला जातो, ट्रेडर प्रॉफिट मध्ये येईल तेव्हा बघू!

ब्रोकर तुमचा ट्रेड फक्त एक कागदोपत्री नोंद म्हणून करत असला तरी तुमचा पैसा तुमच्या अकाउंट मधून केव्हाच ब्रोकर कडे गेलेला असतो आणि ब्रोकर त्याचा योग्य (?) तोच वापर करणार असतो.

थोडक्यात तुम्हाला लिव्हरेज देण्या साठी ब्रोकर कडे कुबेराचा खजिना असायलाच हवा असे नाही!

हे कळले, पण ब्रोकर हा लिव्हरेज चा झमेला का करत बसतो? इतके सारे लिव्हरेज (पैसा) बिन व्याजी द्यायचे ते सुद्धा विना तारण, कोणतेही डॉक्युमेंटेशन न करता? त्यात ब्रोकरचा काय फायदा?

फायदा आहे ना, जरूर आहे, ब्रोकिंग हा व्यवसाय आहे भंडारा नाही, प्रॉफिट नसेल तर कोणता ब्रोकर ही असली आर्थिक हातचलाखी (जगलरी) करत बसेल (आणि नंतर गोत्यात येईल!) ?

तो फायदा नेमका काय हे आपण पुढच्या भागात पाहू….

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *