मलई कुल्फी !

साहीत्य

  1. मलईदार दूध ( एका कुल्फी साठी २५० मि.ली.)
  2. साखर ( एका कुल्फी साठी ४-५ मोठे चमचे)
  3. खवा ( एका कुल्फी साठी ३० ग्रॅम )
  4. अगदी कणभर मीठ
  5. तांदळाचे किंवा मक्याचे पीठ ( एका कुल्फी साठी एक चमचा )
  6. वेलदोड्याची पावडर (जायफळ दुधात उगाळून पण चालेल )
  7. काजू, बदाम , पिस्ते असा जमेल तेव्हढा / परवडेल तेव्हढा सुकामेवा
  8. सजावटी साठी केशर

कृती

  1. जाड बुडाच्या पातेल्यात दुध घेऊन उकळी आणा, उकळी आल्यावर गॅस बारीक करुन दूध आटवा , दूध आकारमानाने निम्मे झाले पाहीजे.
  2. अधून मधून सतत ढवळत राहावे. पावणं , ढवळत राहा ढवळत राहा ढवळत राहा …
    नै तर दुध करपणार बघा , आणि मग कस्ली कुल्फी अन कसले काय !
  3. दूध गॅस वर मंद आचे वर असतानाच , त्यात साखर घाला, जेव्हढे गोड पाहीजे तेव्हढी साखर घ्या , हयगय करु नका.
    जेव्ह्ढी साखर घालाल तितकी तुमची कुल्फी मुलायम सिंग बनेल !
  4. गॅस चालू , ढवळणे चालू असतानाच अगदी किंचीत मीठ घाला , अगदी किंचित हं , बघा नै तर घोट्टाळा करुन बसाल , कारण बाजारात सहज मिळणारे पिस्ते खारवलेलेल असतात ,
    म्हणजे आधीच बरेच मीठ आहे.
  5. मजबूत ढवळा , साखर पूर्ण विरघळली पाहीजे.
  6. गॅस चालू , ढवळणे चालू असतानाच दोन चमचे तांदळाचे / मक्याचे पीठ थोड्या दूधात कालवून (गाठी राहता कामा नयेत)
    ह्या मिश्रणात घाला. ४-५ मिनीटें ढवळत राहा.
  7. गॅस चालू , ढवळणे चालू असतानाच, खवा आणला असेल तर तो पण घाला (माझे काय जातेय , खाणार तुम्ही !)
  8. गॅस चालू , ढवळणे चालू असतानाच, काजू , बदाम , पिस्ते इ. बारीक तुकडे घाला.
  9. आता हे मिश्रण पुन्हा मध्यम आचे वर भरपूर ढवळा , डेली सोपचा एक आख्खा इपीसोड संपे पर्यंत ढवळत राहा.
  10. हे मिश्रण मुळ जेव्हढे दूध घेतले होते त्याच्या एक त्रितियांश झाले पाहीजे.
  11. गॅस बंद करुन. मिश्रण गार होऊ द्याअसे गार झालेले मिश्रण , फ्रिज मध्ये तीन – चार तास ठेऊन द्या. पण बर्फाच्या कप्प्यात ठेऊ नका , घोटाळा होईल !
    ही पायरी महत्वाची आहे , ह्यामुळे कुल्फीत बर्फाची कचकच (क्रिस्टल्स) होणार नाही!
  12. आता हे अगदी गारेगार झालेले मिश्रण ‘कुल्फी च्या साच्यात भरा. साच्यांची टोपणे गच्च बंद करा. कुल्फी प्रसरण पावते म्हणून मिश्रण साच्यात भरताना अगदी काठोकाठ भरु नका , थोडी जागा ठेवा , क्या बच्चे की जान लोगे क्या?
  13. आता हे  कुल्फी चे साचे फ्रीज मधल्या बर्फाच्या कप्प्यात ठेवा. आणि विसरुन जा, आठा – दहा तास तरी लागतील तेव्हा निवांत झोप काढा.पळा आता , उद्या बघू !
  14. सात- आठ तास झाले असतील नै , आता दबकत दबकत फ्रिज पाशी जा, देवाचे नाव घ्या, एक दीर्घ खोल श्वास घ्या , फ्रिजच्या बर्फाचा कप्पा ऊघडा, कुल्फी तयार असेल.
  15. कुल्फी चे साचे कोमट पाण्यात काही सेकंद बुचकळून घ्या. असे केल्याने साच्यातून कुल्फी बाहेर काढायला सोपे जाईल.
  16. कुल्फी अल्लाद पणे साच्यातून बाहेर काढा , सुरीने चकत्या पाडा किंवा बांबूची काडी कुल्फीच्या बुडात !
  17. जर काही काजू , पिस्ते , बदाम ,  उरले असेल ( शक्यता कमीच !)  वर पसरा.
  18. केशर थोड्याशा गरम दूधात दोन मिनिटें भिजवून मग कुल्फी वर उधळावे!

आता वाट काय बघताय ? खावा की … ह्ग्ळे हांगावे हाय ह्या हाणसांना !

काही शंका कुशंका

  • दुध जितके भारी मलाईदार तितकी कुल्फी जोमदार!कुल्फीचे साचे नै काय करायचे ?  जुगाड ! स्टेनलेस  स्टील चे गिलास , वाट्या जे काही मिळेल त्यात भरा की राव , कुल्फी ची काय पन तक्रार नसते !
  • आणि त्ये मटका कुल्फी का काय म्हंतात त्ये? काई नाय , हेच सगळे , कुल्फीच्या साच्या ऐवजी छोट्या मातीच्या बोळक्यात भरा , हाय काय आन नाय काय !

हौ जौ दे गारेगार !

शुभं भवतु

Similar Posts

9 Comments

  1. श्री. सुहासजी,

    रेसेपी एकदम भारी.
    तुम्ही सांगितलेली बर्फाची कचकच टाळण्याची युक्ती हे सिद्ध करते की तुम्ही एक अनुभवी शेफ आहात.
    एवढे सुंदर फोटो बघून उगाच तोंडाला पाणी सुटते ना.

    लेखन नेहमीप्रमाणे उत्तम.

    धन्यवाद,

    अनंत

    1. श्री. अनंतजी,
      अभिप्राया बद्दल धन्यवाद.
      अहो हे माझे डोके नाही, बायकू करत असते असले काही. मी फक्त तिला विचारुन लिहून काढतो.

      सुहास गोखले

  2. सुहास जी हे पाहूनच तोंडाला पाणी सुटले आता एवढं सगळं करायला धीर कुठेय , पटकन बाहेरून पार्सल कुल्फी आणतोच .

Leave a Reply to स्वप्नील Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *