शेअर बाजारातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा
“भाऊजी , तुम्ही तरी सांगा यांना , किती घाणेरडा, कळकट शर्ट घालून बसतात, गेल्या सहा महिन्यात ह्या शर्ट ला पाणी लागलेले नाही, किती घाण वास मारतोय तरी हट्टीपणा करून हाच शर्ट रोज घालून बसतात, शी… “
वहिनींचे म्हणणे बरोबरच होते, त्याच्या शर्टला असह्य घाण वास मारत होता पण मला हे पण माहिती होते की तो शर्ट त्याचा लक्की शर्ट होता, केव्हातरी म्हणजे सहा महिन्या पूर्वी एकदा तो शर्ट घालून ट्रेडिंग करताना त्याला मोठ्ठा प्रॉफिट झाला होता, तेव्हा पासून त्याची त्या शर्टावर श्रद्धा बसली होती, हा शर्ट अंगात असेल तेव्हा प्रॉफिट होतो, हे त्याच्या सबकॉन्शन वर जणू कोरले गेले होतो, त्यामुळे रोज ट्रेडिंगला बसताना तो हाच शर्ट घालायला लागला, तो शर्ट धुवायची देखील त्याला भीती वाटायला लागली, शर्ट धुतला तर त्यातली मॅजिक पॉवर निघून जाईल, म्हणून असह्य, कुबट घाण वास येत असला तरीही तोच शर्ट घालायचा.
अर्थात तो शर्ट अंगात असताना त्याचे लॉस देखील झाले होते पण तेव्हा त्याने त्या शर्ट ला दोष दिला नाही उलट मार्केट च्या नावाने शंख करून म्हणायचा, बघा, हा शर्ट अंगात होता म्हणून मोठ्या लॉस मधून वाचलो, हा शर्ट नसता तर एव्हाना माझे अकाऊट साफ झाले असते “— आता बोला! मार्केट मध्ये काहीही होउदे, तरी त्याची त्या शर्टावरची श्रद्धा अविचल होती.
शेअर बाजार हा आकडे, अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि संभाव्यतेचा खेळ आहे. पण गंमत म्हणजे, इतक्या वैज्ञानिक आणि विश्लेषणाधारित क्षेत्रातही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांना मोठे स्थान आहे.
काही जण ट्रेड सुरू करण्यापूर्वी देवाचे दर्शन घेतात. टेबलावरही देवदेवतांची आरास मांडलेली असते.
काही जण ट्रेडिंग करताना समोर नोटांचे बंडल ठेवतात. अनेकांच्या टेबल वर ‘कुबेर यंत्र’ दिसते .. आता काय पैसाच पैसा!
एकाने पार आफ्रिकेतून आणलेला भेसूर, विद्रूप नजरबट्टू टांगला होता.
कोणी विशिष्ट वासाचीच उदबत्ती लावतात , एकाने टेबलावर एक शंख ठेवलेला पाहिलाय, ट्रेड घेतला रे घेतला की शंखनाद करायचा!
काही विशिष्ट रंगाचा शर्ट घालूनच ट्रेड करतात.
‘घुबडाचे ‘ मोठे आकर्षण, आमेझोन वर धातूचे घुबड अव्वाच्या सव्वा किमातीला लिस्ट केले आहे. एकाच्या टेबलावर घुबडाचे पिस ठेवलेले पाहिले आहे (हे घुबडाचे पीस त्याला कोठे मिळाले कोणास ठाऊक !)
काही जण “आज मंगळवार आहे / अमावस्या आहे, आज ट्रेड करायचा नाही” असा नियम पाळतात.”
तर काहींचा ठाम विश्वास असतो की, ज्या खुर्चीवर बसून त्यांनी पहिला मोठा नफा कमावला, ती खुर्ची बदलली तर नशिबही बदलेल म्हणून अट्टाहासाने त्या एव्हाना मोडक्या झालेल्या खुर्चीत बसूनच ट्रेड घेतात.
एकजण लक्की असते म्हणून हिरव्या रंगाचे माऊस पॅड वापरतो
ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी मुस्लीम धर्मीय नमाजाच्या वेळी करतात तसे कोरड्या हाताने तोंड पुसणारे ही बघितले आहेत.
ही श्रद्धा की अंधश्रद्धा?
श्रद्धा माणसाला मानसिक स्थैर्य देते. यामुळे निर्णय अधिक संतुलित होऊ शकतात असे काहींचे म्हणणे आहे.
पण…
स्टॉप-लॉस न लावता ट्रेड घेणे आणि लॉस सुरू झाला की म्हणणे,
“देव आहे ना… तो वाचवेल!” ही अंधश्रद्धा आहे.
ट्रेडरच्या काही प्रसिद्ध अंधश्रद्धा
सलग तीन नफा झाले, म्हणजे चौथा ट्रेड नक्की तोट्यात जाणार.
आज सकाळपासून सगळं वाईट घडतंय, त्यामुळे बाजारही माझ्याविरुद्धच जाईल.
काल ज्या इंडिकेटरने नफा दिला, तो आजही नक्की काम करेल.
हा शेअर खूप पडला आहे, आता तो पडूच शकत नाही.
ही कंपनी खूप मोठी आहे, त्यामुळे यात तोटा होणारच नाही.
या सर्व गोष्टींचा बाजाराशी फारसा संबंध नसतो. त्या आपल्या मनाने तयार केलेल्या गोष्टी असतात.
बाजार श्रद्धेवर नाही, संभाव्यतेवर चालतो
बाजाराला तुमचा धर्म माहिती नसतो.
तुमची राशी माहिती नसते.
तुमचा शुभ रंग किंवा शुभ दिवसही माहिती नसतो.
बाजाराला फक्त एकच गोष्ट माहिती असते—
खरेदी आणि विक्री.
तुमच्या भावनांपेक्षा बाजाराची दिशा महत्त्वाची असते.
शेअर बाजारातील सर्वात मोठी अंधश्रद्धा कोणती?
“हा ट्रेड माझ्या मनासारखाच जाईल.”
यालाच इंग्रजीत Hope Trading म्हणतात.
स्टॉप-लॉस काढून टाकणे…
तोटा वाढत असतानाही “थोडा वेळ थांबू” म्हणणे…तोटा होतोय हे दिसत असताना DCA म्हणजेच डॉलर कॉस्ट एव्हरेजिंग करून तोटा आणखी वाढवणे आणि शेवटी मोठा तोटा सहन करणे…
ही अंधश्रद्धा आहे—श्रद्धा नाही.
यशस्वी ट्रेडरची श्रद्धा वेगळी असते.
त्याचा विश्वास असतो—
त्याच्या ट्रेडिंग प्लॅनवर.
त्याच्या रिस्क मॅनेजमेंटवर.
त्याच्या स्टॉप-लॉसवर.
आणि दीर्घकालीन शिस्तीवर.
त्याला माहिती असतं—
एक ट्रेड नफा देणार नाही… पण शंभर शिस्तबद्ध ट्रेड नक्कीच फरक घडवतील.
श्रद्धा मनाला शांत करते. अंधश्रद्धा निर्णय बिघडवते.
शेअर बाजारात नशीब कधीतरी मदत करू शकतं…पण सातत्याने यश मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी —
ज्ञान, शिस्त, संयम आणि योग्य जोखीम व्यवस्थापन.
कारण शेवटी…
बाजार देवावर नाही, डेटावर चालतो.
आणि…
आफ्रिकेतून आणलेला भेसूर, विद्रूप नजरबट्टू काम करतो का हे माहिती नाही पण मला एक पक्के ठावे आहे ते म्हणजे ट्रेडिंगमध्ये सर्वात जालीम प्रभावशाली “नजरबट्टू” म्हणजे तुमचा स्टॉप-लॉस!
