एका यशस्वी ट्रेडर चे मनोगत

५ वर्षे सातत्याने लॉस झेलत आज एक नफा कमावणाऱ्या ट्रेडर चे मनोगत…

(मूळ मसुदा इंग्रजीत आहे, मी त्याचे माय मराठीत सरळ भाषांतर केले आहे)

तो ट्रेडर म्हणतो….

मी जेव्हा ट्रेडिंगला सुरुवात केली, तेव्हा मला मनापासून वाटलं होतं की… हाच तो मार्ग आहे जो माझं आयुष्य बदलून टाकणार आहे. मी आता अंबानींच्या मांडीला मांडी लावूनच बसणार आहे! 

मला अजूनही आठवतं… इंटरनेटवर काही लोक ट्रेडिंग करून सहज पैसे कमावताना दिसायचे. मोठमोठे नफा दाखवणारे स्क्रीनशॉट, विविध ट्रेडिंग स्ट्रॅटेजींवर चर्चा, आणि “आम्ही मार्केटचं रहस्य उलगडलं आहे” अशा आत्मविश्वासपूर्ण घोषणा.

तेव्हा हे सगळं इतकं सोपं वाटायचं.

आणि पुन्हा तेच करा.

माझ्या आणि त्या यशस्वी ट्रेडर्सच्या मध्ये फक्त ज्ञानाचाच फरक आहे, अशी माझी ठाम समजूत झाली होती.

मग मी स्वतःला शिकण्यात झोकून दिलं.

तासनतास  व्हिडिओ पाहिले. रात्री उशिरापर्यंत चार्ट्सचा अभ्यास केला. असंख्य इंडिकेटर्स समजून घेतले. अनेक स्ट्रॅटेजी तपासून पाहिल्या. आणि प्रत्येक वेळी स्वतःला पटवत राहिलो—

“आता जे नवीन शिकतोय… हाच तो या जिग सॉ पझल चा शेवटचा हरवलेला तुकडा असेल.”

परंतु ट्रेडिंगच्या सुरुवातीला एक गोष्ट कोणीच स्पष्टपणे सांगत नाही—

मार्केट समजून घेणं ही लढाईची केवळ अर्धी बाजू आहे.

सर्वात कठीण काम म्हणजे स्वतःला समजून घेणं.

सुरुवातीची काही वर्षे अक्षरशः खडतर होती.

एखादा आठवडा उत्तम गेला की मला वाटायचं—झाल,  मार्केटचं गणित मला पूर्णपणे समजलं आहे. अब मै च भगवान हू! 

पण त्यानंतर एक चुकीचा ट्रेड…

त्यातून दुसरा…

आणि क्षणात मी पुन्हा तिथेच उभा असायचो—स्वतःला विचारत…

“मी इतक्या मेहनतीने कमावलेला पैसा एका क्षणात कसा गमावला ?”

पण मनाच्या कुठेतरी मला सत्य माहीत होतं.

समस्या स्ट्रॅटेजीमध्ये नव्हती.

समस्या माझ्या मानसिकतेमध्ये होती.

मी अधीर होतो.

मला परिणाम लगेच हवेत होते.

मी ट्रेडिंगकडे एक दीर्घकालीन कौशल्य म्हणून न पाहता, आयुष्य बदलून टाकणारा शॉर्टकट म्हणून पाहत होतो.

आपण मागे राहता कामा नये (Fear of Missing Out (FOMO) ) या अधीरतेत मी सारासार विचार ना करताचा कोणत्याही ट्रेड मध्ये, कधीही बेधडक घुसायचो, 

चूक मान्य करण्याची तयारी नसल्यामुळे स्टॉप लॉस पुढे  पुढे ढकलायचो.

आणि तोटा झाला की, तो लवकर भरून काढण्यासाठी आणखी मोठ्या पोझिशन्स घ्यायचो.

आज मागे वळून पाहताना वाटतं…

मार्केट मला तोच धडा पुन्हा पुन्हा शिकवत होतं.

पण ऐकण्याची तयारी माझी नव्हती.

प्रत्येक तोटा मला वैयक्तिक अपयश वाटायचा.

प्रत्येक चुकलेली संधी म्हणजे मी इतरांपेक्षा मागे पडतोय, अशी भावना मनात घर करायची.

सोशल मीडियावर इतर ट्रेडर्सचे फक्त यशाचे क्षण दिसायचे…

आणि मी मात्र माझ्या प्रत्येक चुकीचा साक्षीदार होतो.

एक काळ असा आला की मला स्वतःलाच प्रश्न पडला—

“ट्रेडिंग खरंच माझ्यासाठी आहे का?”

मी प्रचंड मेहनत घेत होतो.

सतत शिकत होतो.

पण अपेक्षित परिणाम मिळत नव्हते.

कष्ट होत होते…

पण काहीतरी जुळून येत नव्हतं.

आणि मग…

हळूहळू काहीतरी बदललं.

मी “परिपूर्ण स्ट्रॅटेजी” शोधणं थांबवलं.

एका ट्रेडमुळे आयुष्य बदलणार आहे, हा भ्रम सोडून दिला.

आणि मी त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली…

ज्या आधी मला कंटाळवाण्या वाटायच्या.

  • रिस्क मॅनेजमेंट.
  • संयम.
  • कमी पण दर्जेदार ट्रेड्स घेणं.
  • तोटा शांतपणे स्वीकारणं.
  • योग्य सेटअपची वाट पाहणं—मार्केटवर जबरदस्ती न करणं.

गमतीची गोष्ट म्हणजे…

मला एखादं गुप्त रहस्य समजलं म्हणून मी चांगला ट्रेडर झालो नाही.

मी चांगला ट्रेडर झालो…

कारण मला आधीपासून माहीत असलेल्या गोष्टींचा आदर करायला मी शिकलो.

मला समजलं—

तुम्ही स्ट्रॅटेजी बनवू शकता… पण तिचं प्रामाणिकपणे पालन करू शकत नसाल, तर त्या स्ट्रॅटेजीला काहीच अर्थ उरत नाही.

तुमच्याकडे जगातील सर्वोत्तम चार्ट अॅनालिसिस असू शकतं.

पण तोटा झाला की तुम्ही घाबरत असाल…

वाईट दिवसानंतर सूडबुद्धीने ट्रेड करत असाल…

मोठा नफा झाला की भावनांवर ताबा राहत नसेल…

तर त्या विश्लेषणाचा काहीही उपयोग नाही.

माझ्या प्रवासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे…

ट्रेडिंग म्हणजे प्रत्येक ट्रेड जिंकण्याचा प्रयत्न नव्हे.

ट्रेडिंग म्हणजे स्वतःला इतकं सातत्यपूर्ण बनवणं की तुमच्या Statistical Edge ला काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

ही गोष्ट समजल्यावर…

सगळं स्पष्ट होत गेलं.

मी प्रत्येक हालचालीच्या मागे धावणं थांबवलं.

सतत मार्केटमध्ये असण्याची गरज वाटेनाशी झाली.

योग्य संधी येईपर्यंत शांतपणे वाट पाहणं मला जमू लागलं.

आणि खरं सांगायचं तर…

हीच शिकण्यासारखी सर्वात कठीण गोष्ट होती.

कारण सुरुवातीला काहीच न करणं म्हणजे चूक करत आहोत, असंच वाटतं.

आपण सतत पैसे कमावले पाहिजेत, अशी घाई असते.

परंतु अनेक वेळा…

तुम्ही घेतलेला सर्वोत्तम निर्णय म्हणजे कोणताही ट्रेड न घेणं.

आज पाच वर्षांनंतरही…

मी असं म्हणणार नाही की मला सगळं समजलं आहे.

आजही माझे तोट्याचे ट्रेड होतात.

आजही चुका होतात.

फरक फक्त एवढाच आहे—

आज मी ट्रेडिंगकडे वेगळ्या नजरेने पाहतो.

पूर्वी मला वाटायचं—

यशस्वी ट्रेडर्स म्हणजे जे मार्केटचं भविष्य अचूक सांगू शकतात.

आज मला वाटतं—

यशस्वी ट्रेडर्स म्हणजे जे स्वतःची चूक शांतपणे स्वीकारू शकतात.

ट्रेडिंगने मला पैशांबद्दल खूप काही शिकवलं.

पण त्याहूनही अधिक…

त्याने मला माझ्याबद्दल शिकवलं.

त्याने मला संयम शिकवला.

शिस्त शिकवली.

आणि हेही शिकवलं की…

ज्या काळात आपल्याला काहीच घडत नाही असं वाटत असतं, त्या काळातच खरी प्रगती होत असते.

जर आज तुम्ही संघर्ष करत असाल…

तर स्वतःला एकटे समजू नका.

जवळजवळ प्रत्येक ट्रेडर त्या टप्प्यातून जातो…

जिथे काहीच काम करत नाही…

आणि स्वतःवरच शंका घ्यायला सुरुवात होते.

या संपूर्ण प्रवासातून मी एक गोष्ट शिकलो—

तुम्हाला एखादी जादुई स्ट्रॅटेजी शोधण्याची गरज नाही.

तुम्हाला अशा व्यक्तीमध्ये रूपांतरित होण्याची गरज आहे, जी कोणतीही चांगली स्ट्रॅटेजी सातत्याने आणि शिस्तीने पाळू शकते.

बास याहून जास्त काहीही नाही, सच्चाई इसी मे है | 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *