“लॉस लॉस लॉस !
साला हा लॉस कधी थांबतच नाही, भाऊ बघा ना जरा नेमके काय चुकते आहे ते”
असा गळा काढत कोणी आला नाही असा आठवडा जात नाही.
या साऱ्यांना मी एकच सांगतो, उद्या पासून प्रत्येक ट्रेड जर्नल मध्ये लिहा, एंट्री आणि एक्सीट चा स्क्रीन शॉट काढून ठेवा आणि दोन महिन्यांनी माझ्याकडे या, आपण एकत्र बसून अनालायसिस करू, बघूया त्यातून काही दिशा मिळते का!
बरेच गळा काढू हे ऐकताच ( xx ला पाय लावून) पलून जातात, यांना फक्त अंबानी सारखा पैसा हवा आहे पण काडीचीही मेहनत घ्यायची तयारी नाय. यांना फक्त जादुई नुस्का हवा असतो, एखादा लक्ष्मी मंत्र हवा असतो! पाव्हणं असा जर लक्ष्मी मंत्र असलाच तर मी तो (फुकट) कोणाला का सांगेन?
पण मी आत्ता मी जे सांगणार आहे ते लक्ष्मी मंत्रा पेक्षा काही कमी नाही!
नुकताच एक गळा काढू भेटला, ह्या पठ्ठ्याने मात्र मी म्हणतो तसे सर्व ट्रेडस जर्नल केले होते आणि ती चोपडी घेऊनच माझ्या समोर हुभा होता!
त्याने जून – जुलै 2026 मध्ये घेतलेल्या सुमारे 125 ट्रेडस चे जर्नल माझ्या समोर ठेवले.
मी हे सारे 125 ट्रेडस तपासून पाहिले. या माणसाची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी नक्की काय होती, मुळात अशी काही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी होती का? एखादा ट्रेड घेण्याचा निर्णय नेमका का घेतला गेला हे समजून घेतले, आता उत्तर सोप्पे होते.
मला वाटलं होतं की चुकीचे एंट्री पॉइंटस, हुकलेले सेटअप्स दिसतील. पण आश्चर्य म्हणजे, त्याच्या बहुतांश चुका टेक्निकल अनालिसिसशी संबंधित नव्हत्याच!
त्याच्या ट्रेडस मध्ये काही ठराविक पॅटर्न पुन्हा पुन्हा समोर येत राहिले.
1) त्याचे मोठे तोटे जवळजवळ नेहमीच लहान आणि सहज स्वीकारता येण्याजोग्या तोट्यांपासून सुरू झाले, पण तोटा लहान असतानाच आपली चूक ओळखून / स्वीकारून तोट्यातला ट्रेड न काटता याने ट्रेड चालू ठेवला आणि तोटा वाढू दिला.
2) प्रॉफिट दिलेले थोडे फार ट्रेडस असे होते की जे ट्रेड घेताच, अगदी सुरुवातीपासूनच नफ्याच्या दिशेने वेगाने चालू लागले होते, पण बऱ्याच ट्रेडस च्या बाबतीत ट्रेटेड तोट्याकडे वाटचाल करू लागला तरी तो स्वतःला समजावत होता की, “थोडासा तर खाली आला आहे, बस्स अजून काही क्यांडलस जाऊ देत, मग बघा कसा वर उसळतो ते!” —- दुर्दैवाने ते बहुतेक वेळा महागडे म्हणजे मोठा लॉस देणारे ट्रेड ठरले.
3) तोटा होतोय हे दिसत असताना देखील स्टॉप लॉस खाली खाली सरकवत नेत राहिला, आणि उलट चांगला नफ्यातला ट्रेड असताना टेक-प्रॉफिट लेव्हल वर खेचण्या ऐवजी त्याने घाबरून ट्रेड अगदी कमी प्रॉफिट मध्ये क्लोज केले होते. तो त्याच्या भांडवलापेक्षा त्याच्या अहंकाराच (Ego) जास्त संरक्षण करत होता.
4) सलग काही ट्रेडस मध्ये नफा झाल्यावर त्याची शिस्त कमी होत गेली. तो कमी दर्जाचे सेटअप्स घेऊ लागला होता , कारण कोठे तरी त्याच्यात अति आत्मविश्वास निर्माण झाला की ‘माझ्या कडून आता चूक होणारच नाही, मैच भगवान हू ‘. गंमत म्हणजे, भीतीपेक्षा अति आत्मविश्वासामुळेच त्याचे जास्त नुकसान झाले होते.
5) पण मजा म्हणजे, त्याचे सगळ्यात वाईट ट्रेडस आत्मविश्वासामुळे नव्हे, तर कंटाळ्यामुळे घेतले गेले होते! कोणताही कंटाळा ना करता, बुडाला रग लागे पर्यंत टर्मिनल समोर शांत बसून मार्केट वर लक्ष ठेवणे त्याला जमले नाही, त्यातून काय व्हायचे चांगला ट्रेड घेण्या ऐवजी कसलाही का असेना पण एक ट्रेड घेऊन फक्त मार्केटमध्ये घुसायचे असे करत राहिला , परिणाम दुसरा काय? लॉस!
6) आपण ट्रेडिंग प्लॅन मोडतोय हे त्याला कळात होते पण प्रत्येक वेळी तो स्वतःलाच समजावत होता , “यावेळी परिस्थिती वेगळी आहे.” पण प्रत्यक्षात ती जवळजवळ कधीच वेगळी नव्हती. आपल्याला काय करायला हवं हे त्याला आधीपासूनच माहीत होतं…पण तो ते सातत्याने करत मात्र नव्हता.
7) त्याने महिनोनमहिने एखादा नवीन इंडिकेटर, नवी स्ट्रॅटेजी किंवा एखादा “सीक्रेट एज” शोधण्यात वेळ घालवला, ह्यात चूक अशी नव्हतीच त्याची ‘एज’ बरोबरच होती, चुकली होती त्या ‘एज’ ची अंमलबजावणी (Execution).
मी जेव्हा असा त्या १२५+ ट्रेड्सचा आढावा घेतला तेव्हा त्याला जे शिकायला मिळालं, ते मागील १०० YouTube व्हिडिओ किंवा Twitter (X) वरील थ्रेड्स पाहूनही कधी मिळालं नव्हतं.
तुम्ही कधी तुमच्या स्वतःच्या ट्रेडिंग इतिहासाचा आढावा घेतला आहे का?
