मी सांगलीचा, जन्म, शिक्षण सारे सांगलीत. शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरी साठी सांगली सोडली त्याला आता ४० वर्षे झाली पण सांगलची आठवण आली नाही असा दिवस जात नाही, पुण्यात/ नाशकात कधी रस्त्यावर MH 10- वाली गाडी दिसली की माहेरचा माणूस भेटल्याचा आनंद होतो.
सांगलीत दुसरीत असताना XXX आमच्या वर्गात दाखल झाला, तेव्हाची आमची मैत्री पुढे ५० वर्षे टिकून होती , दुर्दवाने कॅनसर सारख्या दुर्धर आजाराने हा माझा मित्रा कायमचा पारखा झाला, त्याच्या आठवणी वर एक लहानसा लेख मी “आठवणीतली सांगली’ या फेसबुक ग्रुप वर प्रकाशित केला होता, तिचा इथे पुन्हा प्रसिद्ध करत आहे. माझ्या त्या परममित्राच्या आदरांजली म्हणून..
****
“मी xxxxx , आमचे ‘मार्ती रोड ‘वर दुकान आहे ….”
अशी ओळख सांगणारा माझा वर्गमित्र, शाळा अर्थातच डॉ बापट बाल आणि ईयत्ता दुसरी ‘ब’ .
हा वर्गमित्र आणि मी, दहावी पर्यंत एकत्र होतो, पुढे वाटा वेगळ्या झाल्या, मी विलिंग्डन आणि वालचंद असे टप्पे पार पाडत पुण्याची वाट पकडली, हा माझा वर्गमित्र कॉलेजची पायरी बहुदा चढलाच नाही, कारण आपल्या वडिलांच्या दुकानातच दिसायचा.
सांगली जी तेव्हा सुटली ती सुटलीच त्यानंतर सांगलीच्या भेटी व्हायच्या नाही असे नाही पण त्या अगदी उभ्या उभ्या म्हणतात तशा, आई वडीलांच्या आजारपणाचा काळ वगळता, सांगलीत सलग दोन दिवसांचा म्हणावा असा मुक्काम झालाच नाही, पण काहीही झाले तरी त्या धावत्या भेटीत देखील अगदी वेळात वेळ काढून ‘मार्ती रोड’ वरच्या आमच्या दुकानात चक्कर मारली नाही असे मात्र कधीच झालेच नाही,
सांगलीला आलो की , मित्राला दुकानात जावून भेटणे , मनसोक्त गप्पा मारणे (आणि सांगलीच्या बित्तंबातम्या) हा तर प्रघातच होता. तोच वर्गमित्र, तेच प्रसन्न दिलखुलास हास्य, तोच चहाचा कप , तीच आत्मियता, मला काही घ्यायचे नसले तरी सुद्धा काही बाही वस्तू खरेदी करायचोच आणि तेच नेहमी सारखे न मागता मिळणारे छोटेसे डिस्काऊंट ! पण त्या पेक्षा बहुमोल असा तो अर्धा तास जुन्या आठवणीचा असायचा, त्याला बकुळीच्या फुलांचा सुगंध असायचा तो मला पुढच्या सांगलीच्या भेटी पर्यंत पुरायचा किंबहुना मी तो पुरवून पुरवून जपून जपून वापरायचो.
प्रत्येक भेटीत हा माझा वर्गमित्र बदललेला दिसायचा, तसा माझ्यातही बराच फरक पडलेला असायचा , त्याचे लग्न झाले होते , दोन मुलें. आता टक्कल पडले होते, पोट प्रमाणा बाहेर वाढले होते , दिवसभर गल्ल्यावर बसत असल्याने कॉन्स्टिपेशन ची तक्रार ही बोलून दाखवायचा, दुकानात मात्र फारसा बदल दिसत नव्हता, दुकानही तसे रुटूखूटूच चाललेले वाटायचे,पण हा नेहमी सारखाचा आनंदी आणि मिस्कील! .
काळ धावतच राहीला, त्याला कोण थांबवणार? माझ्या आई वडीलांचे निधन झाले आणि सांगलीचा संबंध जवळजवळ संपलाच, पुढे सांगलीचा आमचा वाडा विकला आणि त्या सोबत सांगलीचा उरला सुरला पाश ही तुटून गेला. सांगलीला येण्याचे आता काही प्रयोजनच उरले नव्हते. शेवटची सांगली भेट कधी झाली होती हे आठवायला स्मरण शक्ती ला बराच ताण द्यायला लागायला लागला.
गेल्या आठवड्यात सांगलीचा आणखी एक ओळखीचा भेटला , बर्याच गप्पा झाल्या तेव्हा त्याच्या कडून कळले , हा माझा ‘मार्ती रोड’ वरचा दुकानवाला वर्गमित्र अत्यवस्थ आहे , अगदी काही दिवसांचा सोबती अशा अवस्थेत आहे हे कळत्ताच डोळ्यात अश्रू तरळले, सगळी कामे बाजूला ठेवली आणि कालच्या रवीवारी (17 डिसेंबर) सकाळी पुण्यातून निघालो, आणि तडक सांगली गाठली,
वखारभागातले मित्राचे घर गाठले ,बिछान्यावरचा आसन्नमरण मित्र दिसलाच नाही इतका तोळामासा झाला होता!
“XXXX लेका मी आलोय, बरा हाईसा ना?”
“कोण सुहास, तू ?”
मित्राला पुढचे काही बोलायचे त्राणच नव्हते , उरलेले बोलणे डोळ्याला लागलेल्या अश्रुधारांनी केले. त्याचा हात हातात घेऊन बसलो, काही बोलता आलेच नाही, उण्यापुर्या 50 वर्षांचा आमचा स्नेह पण आता तो व्यक्त करायला या माझ्या मित्राच्या शरीरात कणभर ही त्राण उरले नव्हते आणि माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते, पण त्याच्या डोळ्यातली ती अनोखी चमक ! जणू त्याची सारी शक्ती आता त्याच्या डोळ्यातच एकवटली होती.
त्याची बायको म्हणाली,
“भावजी , तुम्ही आलात बरे वाटले, गेल्या तीन महिन्यांत पहील्यांदा दोन शब्द बोलले,
नाहीतर हातवारे करुनच सगळे चालले होते”
त्याचा मोठा मुलगा आणि सून माझ्या पाया पडले,
“बाबा तुमच्या बद्दल नेहमी बोलत असतात..”
मित्राची तब्बेत इतकी अशक्त होती की डोळे उघडून बघणे ही कदाचित फार कठीण जात असावे.
पुन्हा त्याचा हात हातात धरुन , कसबसा म्हणालो,
“बरा होशील रे , अजून बर्याच गप्पा मारायच्या आहेत, आता चांगले चार – पाच दिवसां साठी येणार आहे सांगलीला”
मित्र केवीलवाणा हसला कारण माझे हे असे आश्वासन त्याचे शंभर वेळा ऐकलेले असते आणि मी येणार नाही हे ही त्याला पक्के माहित होते,
कोठून शक्ती गोळा केलीन कोण जाणे , पण बोलला मात्र..
“नक्की?”
मी खजील झालो, कसाबसा आवंढा गिळत उसने अवसान आणत म्हणालो,
“नक्की रे , तू बरा होणार आहेस ना, मग मला यायलाच पाहीजे , प्रॉमिस’
मी हा प्रॉमिस शब्द उच्चारताच मित्राचे हाताची दोन बोटे जुळवत खूण केली जी मी आणि तो शाळत असताना रोज दहा वेळ करत असू..
मी फक्त हसलो…
वहिनींचा जेवणाचा आग्रह कसाबसा चुकवला. चहा मात्र घेतला. पाय निघत नव्हता, मित्राला एकदा डोळे भरुन पाहीले, मला एव्हाना कल्पना आली होतीच की ही आमची शेवटचीच !
सांगली ला अगणित वेळा ये जा झाली आहे पण ही माझी ही भेट सगळ्यात लहान म्हणजे फक्त तीन तासांची होती.
माझा हा मित्र आज ‘मंगळवार 19 डिसेंबर’ सकाळी 7 च्या सुमारास गेला. त्याच्या मोठ्या मुलाने कळवले.
सांगलीचा आणखी एक पाश तुटला ….
(मित्राचा खासगीपणा जपण्या साठी नाव आणि ओळख पटेल असा भाग वगळला / बदलला आहे, समजून घ्यावे)
