एकदा एक गरीब पण प्रामाणिक लाकूडतोड्या विहिरीच्या काठावर असलेल्या झाडाची लाकडे तोडत होता. काम करता करता अचानक त्याच्या हातातील लोखंडी कुऱ्हाड निसटली आणि विहिरीत खोल पाण्यात जाऊन पडली.
कुऱ्हाड हेच त्याच्या उपजीविकेचे एकमेव साधन होते. आता कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा, या चिंतेने तो ढसाढसा रडू लागला.
त्याचा प्रामाणिकपणा आणि आक्रोश पाहून पाण्यातील जलदेवता प्रकट झाली. तिने लाकूडतोड्याला रडण्याचे कारण विचारले. लाकूडतोड्याने आपली कुऱ्हाड पाण्यात पडल्याचे सांगितले.
जलदेवतेने पाण्यात डुबकी मारली आणि एक सोन्याची कुऱ्हाड काढली.
जलदेवतेने विचारले, “ही तुझी कुऱ्हाड आहे का?”
लाकूडतोड्या म्हणाला, “नाही, ही माझी कुऱ्हाड नाही.”
जलदेवतेने पुन्हा पाण्यात डुबकी मारली आणि यावेळी चांदीची कुऱ्हाड बाहेर काढली.
लाकूडतोड्याने पुन्हा प्रामाणिकपणे सांगितले, “नाही, ही सुद्धा माझी कुऱ्हाड नाही.”
जलदेवतेने तिसऱ्यांदा डुबकी मारली आणि शेवटी त्याचीच लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली.
ती पाहताच लाकूडतोड्या आनंदाने ओरडला, “हो! हीच माझी कुऱ्हाड आहे!”
लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा पाहून जलदेवता खूप प्रसन्न झाली. तिने लोखंडी कुऱ्हाडी सोबतच सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड ही त्याला भेट देऊन टाकली !
संग्राम’ ने ही कथा त्याच्या लहानपणी ऐकली होती, एके दिवशी त्याच्या मनात आले आपण ही लोखंडाची एक कुऱ्हाड घेऊन जंगलात जाऊ, लाकूड तोडल्याचे नाटक करून स्वतः च ती कुऱ्हाड विहिरीत टाकून देऊ, मग जलदेवता येईल, सोन्याची कुऱ्हाड बाहेर काढेल आपण लगेच “हो! हीच माझी कुऱ्हाड आहे!” असे म्हणायचे
मग जलदेवता आपल्याला ती सोन्याची कुऱ्हाड देऊन टाकेल! हाय काय आन नाय काय!
संग्राम ने अगदी तसेच केले, कुऱ्हाड जाणून बुजून विहिरीत टाकली आणि रोना-धोना सुरू केले, अपेक्षा केल्या प्रमाणे जलदेवता आली, तिला संग्रामची दया आली, पाण्यात डुबकी मारून तिने एक कुऱ्हाड बाहेर काढली आणि संग्राम च्या हातात देत म्हणाली…
“ही घे तुझी कुऱ्हाड”
संग्रामने त्या कुऱ्हाडी कडे पाहिले, त्याला धक्का बसला कारण ही कुऱ्हाड चक्क प्लास्टिक ची होती!
संग्राम च्या चेहऱ्यावरचे भाव पाहून जलदेवता हसली आणि म्हणाली..
“बेटा, त्या प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट आता साऱ्या गावाला माहिती झाली आहे, जो तो येतो आणि ठरवून कुऱ्हाड पाण्यात टाकतोय, इतक्या सगळ्यांना सोन्याच्या कुऱ्हाडी द्यायला मी काय येडी आहे का? आता मी सगळ्यांना फक्त प्लास्टिक ची कुऱ्हाड देते”
संग्राम ने कपाळावर हात मारून घेतला, सोन्याची कुऱ्हाड तर मिळाली नाहीच उलट 500 रुपये खर्चून आणलेली लोखंडाची कुऱ्हाड जाऊन हातात 20 रुपयांची प्लास्टिक ची कुऱ्हाड पडली!!
भाऊ , ही स्टूरी आमी पण लई येला ऐकली आहे, पण याच आपल्या क्रीप्टो मार्केटशी कसा काय संबंध जोडतासा ?
“गण्या, लेका जरा पेशन्स ठेवा ना लेका, सांगतो, सगळे बैजवार सांगतो ”त्याचे काय आहे. …………………………
त्याचे असे आहे, मार्केट हे कमालीचे बेभरवशाचे, अनियंत्रित, फसवे असले तरी त्या अनिश्चितते मध्ये ही एक निश्चितता आहे. त्या बेभरवशातही एक भरवसा आहे, त्या फसवाफसवीत देखील प्रामाणिकतेची एक किनार आहे!
म्हणजे, मार्केटचा ची एक लय असते, एका तालबध्दता असते, मार्केटच्या मुव्हमेंट मध्ये काही सुनिश्चित आकृतीबंध (पॅटर्न) असतात , आणि हे आकृतीबंध ठरावीक अंतराने पुन्हा पुन्हा दिसत राहतात.
क्यानडलस्टिक पॅटर्न, ट्रेंड लाइन्स, चार्ट पॅटर्न, फिबोनाची संख्यांची श्रेणी (Fibonacci Sequence) अशा अनेक माध्यमांच्या साह्याने मार्केटचे हे काही सुनिश्चित आकृतीबंध (पॅटर्न) हेरता येतात.
त्याच बरोबर मार्केट शेवटी खरेदी – विक्रीच्या आधारावर उभे असते, खरेदी करणारा – विक्री करणारा दोघेही शेवटी मनुष्य प्राणीच आहेत त्यामुळे त्यांच्या मानवी भाव भावनांचा म्हणजेच मानसिकतेचा (सायकॉलॉजी) मार्केट वर परिणाम होत राहणार. एकाने केले म्हणून दुसऱ्याने, दुसऱ्याने केले म्हणून तिसऱ्याने केले जाते यालाच हर्ड मेंट्यालिटी म्हणतात, याचाही मार्केट वर मोठा प्रभाव असतो
या साऱ्याच्या अभ्यासातून मार्केटच्या आगामी हालचालीचा काहीसा सुगावा लागू शकतो. याचा वापर करून एक रणनीती ‘स्ट्रॅटेजी’ आखता येते.
अनेक ट्रेडर्स अथक परिश्रममातून अशा ‘स्ट्रॅटेजी’ निर्माण करतात आणि चांगले यश मिळवतात देखील . पण ही फलदायी ‘स्ट्रॅटेजी’ जो पर्यंत सीक्रेट असते, अगदी कमी लोकांनाचा माहिती असते तो पर्यंतचा फलदायी ठरते, एकदा का ‘स्ट्रॅटेजी’ सर्वादूर होत अगदी गल्ली बोळातल्या ‘संग्राम’ पर्यंत पोहोचते तेव्हा त्या ‘स्ट्रॅटेजी’ मधली धार केव्हाच निघून गेलेली असते, अति वापराने त्यातली परिणाम कारकता संपलेली असते, आता ती ‘स्ट्रॅटेजी’ पूर्वी सारखी प्रॉफिट वाली न राहता हमखास लॉस देणारी ‘स्ट्रॅटेजी’ बनते..
आणि म्हणूनच ‘संग्रामच्या हातात सोन्याच्या ऐवजी प्लास्टिकची कुऱ्हाड पडते’
याचा अर्थ हा घ्यायचा की..
कोणतीही ‘यशस्वी’ मानली गेलेली ‘स्ट्रॅटेजी’ कधीच सदासर्वकाळ यशस्वी नसते / रहात नाही. त्यात वेळोवेळी स्थळ – काळ – परिस्थिती – व्यक्ती सापेक्ष बदल करणे आवश्यक असते, हे काम करायला भरपूर अभ्यास, सराव असावा लागतो, दिसेल त्या प्रत्येक ग्रूप चा मेंबर होऊन ‘कॉल्स द्या , कॉल्स द्या’ अशी याचना करत फिरणाऱ्या ‘संग्राम’ भाऊंचे हे काम नव्हे!
स्वतःचा अभ्यास करून एक स्ट्रॅटेजी बनवणे, त्यात वेळोवेळी बदल करणे हे ज्याला जमते तो ‘श्रीमंत लाकूड तोड्या बनतो’ आणि बाकी ‘संग्राम’ लोक्स च्या हातात फक्त प्लास्टिक ची कुऱ्हाड पडते!
