मनसुख आणि शेळ्यांची गोष्ट

एका छोट्या गावात मनसुख नावाचा एक अतिशय हुशार व्यापारी आला. त्याने पाहिले, गावकऱ्यांकडे भरपूर शेळ्या होत्या.

मनसुख ने जाहिर केले —

“मला शेळ्या विकत घ्यायच्या आहेत! मी प्रत्येकाला एका शेळीचे १,००० रुपये देईन.”

गावकऱ्यांना वाटले, काय भन्नाट ऑफर आहे! नेहमी ५००-६०० रुपयांना विकली जाणारी शेळी चक्क हजार रुपयांना विकली जात आहे! गावकऱ्यांनी घाईघाईने आपापल्या शेळ्या मनसुखला विकल्या. मनसुख ने सर्व शेळ्या एका मोठ्या गोठ्यात बांधून ठेवल्या.

काही दिवसांनी मनसुख ने पुन्हा घोषणा केली—

“मला अजून शेळ्या हव्या आहेत! आता मी एका शेळीचे २,००० रुपये देईन.”

ज्या गावकऱ्यांनी आधी शेळ्या विकल्या नव्हत्या, त्यांनीही आता धावत जाऊन आपल्या शेळ्या मनसुख ला विकल्या. गावातल्या जवळ जवळ सर्व शेळ्या आता मनसुख च्या गोठ्यात होत्या, गावात आता शेळ्यांचा तुटवडा निर्माण झाला.

काही दिवसांनी मनसुखने पुन्हा भाव वाढवला—

“मी आता एका शेळीचे ५,००० रुपये देईन!”

आता गावात कोणाकडेच विकण्या साठी शेळी शिल्लक नव्हती. गावकऱ्यांना वाईट वाटू लागले की, “अरेरे! आपण ५,००० रुपयांचा भाव येण्या आधीच १,००० आणि २,००० रुपयांना म्हणजे कमी किंमतीत आपल्या शेळ्या विकून टाकल्या!”

मग मनसुखने जाहीर केले—

“मला तातडीने शहरात एका कामासाठी जावे लागत आहे. मी महिनाभराने परत येईन. मला अजून शेळ्या हव्या आहेत, मी परत येईन तेव्हा एका शेळीचे थेट १०,००० रुपये देईन!”

मनसुख शहरात निघून गेला , जाताना त्याने आपल्या धाकट्या भावाला जिग्नेसला आपल्या गोठ्याची काळजी घ्यायला मागे सोडले.

मनसुख गेल्यावर जिग्नेसने हळूच गावकऱ्यांना एकत्र बोलावले आणि गुपचूप सांगितले—

“बघा, मनसुख महिनाभराने येऊन १०,००० रुपयांना एक प्रमाणे शेळी घेणार आहे. एक काम करूया? मी तुम्हाला या गोठ्यातील शेळ्या मागच्या दाराने ७,००० रुपयांना एक याप्रमाणे चोरून विकतो. मनसुख आला की त्याला सांगतो आपल्या शेळ्या साथीच्या आजाराने मेल्या, येडे आहे ते, त्याला हे लगेच पटेल. मनसुख ला काहीही करून शेळ्या हव्याच आहेत आता तर तो १०,००० ऐवजी १२,००० देऊन शेळ्या घेईल,न देऊन करतो काय? मग तुम्ही माझ्या कडून ७,००० भावाने घेतलेली शेळी १२,००० ला विकून एका शेळीमागे ५,००० रुपयांचा निव्वळ नफा कमवा!”

गावकऱ्यांचे डोळे चमकले! प्रत्येकाला हा ‘जॅकपॉट’ वाटला.

लोकांनी आपल्या घरची ठेवलेली पुंजी काढली, काहींनी दागिने गहाण ठेवले, तर काहींनी व्याजाने पैसे काढले आणि जिग्नेस कडून ७,००० रुपये देऊन त्या शेळ्या परत विकत घेतल्या!

दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी पाहिले…

तर जिग्नेस गायब आणि तो मनसुख ? तो शहरातून कधी परत आलाच नाही!

शेवटी गावकऱ्यांकडे काय उरले?

त्याच त्यांच्या जुन्या शेळ्या… ज्या त्यांनी आधी १,००० रुपयांना विकल्या होत्या त्या त्यांनी ७,००० रुपयांना परत विकत घेतल्या! चक्क ६००० चे नुकसान! 

या गोष्टीतून काय शिकायला मिळते?

१. FOMO (Fear Of Missing Out – संधी हुकण्याची भीती): शेअर बाजारात जेव्हा किंमत विनाकारण खूप वेगाने वाढते, तेव्हा लोक ‘संधी हुकेल’ या भीतीपोटी जास्त भावात खरेदी करतात.

२. फुगा (Bubble) ओळखता आला पाहिजे: भाव  अचानक अनैसर्गिकपणे वाढटी असेल तर तिथे मोठी फसवणूक किंवा  तो एक बुडबुडा ‘बबल’ असण्याची शक्यता असते.

३. रातोरात श्रीमंत होण्याच्या मोहात पडू नका: दुसऱ्यांच्या सांगण्यावर म्हणजेच ‘कॉल टिप’ घेऊन किंवा अति-नफ्याच्या लालसेने विचार न करता गुंतवणूक केली, तर शेवटी पदरी नुकसानच येते!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *