****. लेवरेज. चा फंडा! भाग 1 ****
त्याचे असे झाले….
विकी ला ट्रेडिंग चा नाद लागला! झाले, विकी सट्टा खेळतो असा बोभाटा साऱ्या गावात झाला, गावात त्याची कुचेष्टा सुरू झाली. ‘सट्टेबाज’ अशी पदवी ही त्याला मिळाली!
विकी डगमगला नाही, तो ट्रेडिंग करतच राहिला , हाथी चले अपनी चाल, कुत्ते भौंकते रहे हजार |
ट्रेडिंग करता करता विकीच्या लक्षात आले की छोट्या क्वांटिटी ने ट्रेड मारून कायच हाताला लागत नाही, उगाच खणखण कुदळी मणमण माती अशी अवस्था होते!
विकी ने ठरवले आता एक मोठठी पोझीशन घ्यायची, चक्क एक फुल्ल बीटीशी उचलायचा, काय व्हायचे ते हौदे, आर या पार!
आता १ फूल बीटीशी म्हणजे चेष्टा नाय! बीटीशी चा भाव चाललाय $65000 म्हणजे रु 55,25,000 , चक्क 55 लाख रुपये !
55 लाख रुपये? विकीचे डोळे पांढरे झाले.
विकी ब्रोकरला म्हणाला:
“साहेब, एक आख्खे बिट कॉईन पायजेलाय पण तितका पैका नाय खिशात…”
“विकी भाऊ पैसा नाय तर कशाला इतकी उंच उडी मारतायसा”
“मै ईस वक्त 55 लाख का सौदा करणे आया हू और मेरी जेब में पाच फुटी कौडी भी नहीं “
“ओ बच्चन, ते शिनुमात असतया, इथे फुल रोकडाच मोजावा लागतो”
“बघा काय जुळणी होतोय का? मला जोराचे, अर्जंट ‘ट्रेडिंग’ आलेय!”
“पचत नाही तर खाता कशाला रे”
“क्या करू साब, मजबुरी हय “
“हे बघ विकी, ब्रोकिंग हा आमचा व्यवसाय आहे, भंडारा नाय, पैका नसेल तर कसे काय जमणार रे, तू असे कर, जेवढा पैका आसल त्यात बसतील एव्हढीच बीटीशी उचल ना , मी अगदी 0.001 इतका लहान तुकडा कापुनशान देतो की, म्हणजे बघ 0.001 बीटीशी ला फक्त साडे पाच हजार रुपये ! बोल देऊ का कापून?”
“0.001 बीटीशी ? काय राव चेष्टा करताय काय? इतक्या कमी बीटीशी वर काय कमावणार मी ? दिवसभर XX आपटून शंभर रुपये तरी सुटत्याल का? त्या परिस बांधकामावर विटा उचलतो की, ४०० रु रोज देत्यात”
“मग जास्त घे बीटीशी, 0.1 चे तुकडे कापूनच ठेवलेत, रनिंग आयटम, यकदम पॉप्युलर , देऊ का? रु 5 लाख 52 हजारात देतो”
“बा भौ, माझ्या कडे 5 लाख ? क्या बच्चे की जान लोगे क्या?”
“वा रे पंछी, घरात नाय दाणा आणि मला बाजीराव म्हणा!”
“सायब , असे बोलू नका, काही तरी करा राव, मला खरेच जोराचे ‘ट्रेडिंग’ आलेय!”
शेवटी ब्रोकरला विकी ची दया आली, बच्चा ट्रेडिंग करणा चाहता है, कोशिश कर रहा है, आज उसे दाना-पानी खिलाया तो आगे चलकर बडा ट्रेडर बनेगा, ढेड सारा बिझनेस देगा असा विचार करून ब्रोकर म्हणाला :
“विकी बेटा तेरी ये जिद देखके हम बहुत प्रसन्न हुए, ऐसे होनहार बच्चे की सहायता न करे तो हमारे ब्रोकर होणे का क्या मतलब?”
“तर काय करता सायबानू “
“हे बघ विकी मी तुला 10X लिव्हरेज देतो”
“आता हे काय नवीन? हे लिव्हरेज काय असतया?”
“काय नाय रे, तुला मोठा ट्रेड घ्यायचाय पण तुझ्या खिशात पैका नाय, त्या साठी मी तुला माझ्या खिशातून पैसे देतो त्यालाच लिव्हरेज म्हणतात”
“कर्ज, नाय रे सायबा, आधीच डोक्या वर इतकी कर्ज हायेत, बाईक, फोन सगळ्यांचे आयमाय म्हणजे ई यम आय चालू हैत त्यात आता तुझा पण ई यम आय ? मला झ्येपल का? “
“अरे लेका, कर्ज नाय देत तुला, असेच देतो, हातउसने , कागुद नाय, कॉट्रक्ट नाय , आधार नाय, ओटीपी नाय , व्याज नाय, ई यम आय नाय, काय सुदिक नाय!”
“हॅ, काय ढाका लावताय का काय? असे कुटे असतया का? धा हजाराच्या कर्जाला खंडीभर कागूद जोडायला लावत्यात.. ”
“नाय रे विकी, सच्ची में, असाच पैसा देतो बघ तुला खेळायला, मग तर झाले?”
“तरी पण…”
“विकी बोला ना तेरे लिए कुछ भी!”
“माझा अजून विश्वास नाय बसून रायला, पैसे देत्याल हे मानले , पण हे 10X काय असते म्हणायचे?”
“10X म्हणजे तू जितका पैका तुझा स्व:ताचा घालशील ना त्याचा 10 पट पैसा मी तुला देणार हात उसने म्हणून”
“जरा विस्कटून सांगशीला का?”
“म्हणजे बघा, तूज्या कडे 1 रुपया असेल तर 10 रुपयाचा ट्रेड तुला घेता येईल”
“काही कळेना”
“सोपे आहे, आता तुला 1 बीटीशी पायजेल, किंमत रु 55,25,000, आता तू जर माझ्या कडून 10X लिव्हरेज घेतलास तर काय होईल, तुला फक्त रु 5,52,500 इतकेच द्यायला लागतील “
“आणि बाकीचे पैके?”
“ ते मी घालणार म्हणजे बघ तुझे 5,52,500 आणि माझे 49,72,500 माझे टोटल होते 55,25,000 म्हणजे 1 बीटीशी तुझा, म्हणजे फक्त 5.5 लाखात चक्क 55 लाखाचा माल तुझा, हाय काय आण नाय काय “
“असे होतेय?”
“तर काय, मी म्हणाली नव्हतो तेरे लिए कुछ भी!”
“चांगलो ऑफर दिली तुम्ही पण प्रॉब्लेम हा की माझ्या कडे 5,52,500 नाहीती हो”
“बेटा अभी तू मेरी जान लेगा, पण तू आपला दोस्त, असे कर, मी तुला आता 25X लिव्हरेज देतो मग तर खुश?” “
त्याने काय होणार?”
“१ रुपयात २५ चा ट्रेड, तुला 1 बीटीशी पायजेल, किंमत आहे रु 55,25,000, आता तू जर माझ्या कडून 25X लिव्हरेज घेतलास तर काय होईल, तुला फक्त रु 2,21,000 इतकेच द्यायला लागतील, बाकी सारे माझे पैसे “
“बा भौ, महंजे फक्त २ लाखात ५५ लाखाचा सौदा?”
“येस माय चाइल्ड, आता कसे आवाक्यात आले की नाय?”
“नाय सायबा, २ लाख तरी कुठं आपल्या कडे, आपला खिसा पार फाटल्याला आहे”
“नरसाळ्या, ट्रेडिंग करायचे म्हणतोस आणि खिशात दमडी नाय, कसे काय जमणार रे ?”
“तुम्हीच आता बघा काय होतेय का ते”
“विकी, देख यार, तू आपुन का दोस्त हय, तेव्हा तुला 50X लिव्हरेज देतो, आता सगळे बजेटात बसेल”
“म्हणजे मला फक्त १ लाख इतकेच टाकायचे बाकी ५४ लाख तुमचे?”
“हंगाश्शी, गणित जमायला लागले की तुला!”
“ हे पण जादा होतेय , इतके पैके नाहीत राव
“१ लाख पण नाय म्हणतोस, कसे होणार रे तुझे? हे बघा आता जास्त ताणू नको, शेवटचे म्हणून 100X लिव्हरेज देतो, आता पण नाय बिण नाय, फायनल!”
“म्हणजे ५० हजारात ५० लाखाचा सौदा?’
“मग काय, तुझ्यासाठी काय पण ”
“अजून जास्त लिव्हरेज मिळेल का?”
“साल्या अजून किती पिळतोस रे मला, ब्रोकर आहे मी जिल्हा सहकारी बँक नाय!”
“तरी पण बघा काय हुते का”
“जरा कुठे प्रेमाने खांद्यावर घेतले तर तू कानात xxxx लागलास की रे, आता यकदम फायनल म्हणजे फायनल, लास्ट ऑफर, 200X लिव्हरेज देतो, आता या पेक्षा जास्त लिव्हरेज देता येत नाही , देतोय ते घे नायतर दुसरा ब्रोकर बघ बाबा!”
“200X म्हणजे २७ हजारात ५५ लाखाचा सौदा!”
“ठीक सुना आपने”
………..
म्हणजे अवघ्या २७ हजारात विकीला आता चक्क ५५ लाखाचे बीटीशी घेता येणार आहेत! विकीच्या खिशातून अवघे २७ हजार जाणार तर ब्रोकर चक्क ५४ लाख ७५ हजार ओतणारा!
हे असे कसे? इतकी मोठी रक्कम एका क्षुल्लक , फटीचंद विकी वर उधळायला ब्रोकर काय ”XXबाग’ हून आलाय का? 54 लाख इतकी मोठी रक्कम ती देखील हातऊसनी? व्याज नाही , कागद नाही, करार नाही, आधार कार्ड नाही, ओटीपी नाही, गारंटर नाही, तारण नाही! अरे काय चाललंय काय हे?
हा ब्रोकर असा कोण राजा हरिशचंदर लागून गेलाय? विकी वर का इतका मेहेरबान झालाय? असे किती विकी या राजा हरिशचंदर ला रोज भेटत असतील सगळ्यांवर अशी खैरात करायची म्हणाले तर ब्रोकर कडे किती पैसा पाहिजे?
असे 27 हजारात 55 लाखाचे सौदे होत राहीले तर सगळेच ‘अंबानी शेठ ‘ बनतील की?
द्येवानू , एखाद्या फडतूस विकी वर इतका मेहेरबान व्हायला ब्रोकर खरेच ‘XXबाग’ हून आलेला नाही. त्याच्या मागे काही गणिते आहेत, एक व्यापारी योजना आहे, ज्ञानबाची मेख आहे,
ती काय, कसे ते आपण पुढच्या भागात पाहू….
