आमी बुवा स्काल्पर! भाग १
किप्टो असेल, स्टॉक्स असतील किंवा (सगळ्यांचा लाडके) FnO, इथे ट्रेडिंग तीन प्रकारे करता येते.
१) स्काल्पिंग
२) स्विंग
३) पोझिशनल (FnO मध्ये या प्रकारचे ट्रेडिंग फारसे करता येत नाही)
प्रत्येक ट्रेडिंग प्रकाराची एक खासियत आहे, फायदे आणि तोटे आहेत. खास अशी तंत्रे आहेत आणि प्रत्येक प्रकाराला आवश्यक असणारे टेंपरामेंट देखील वेगळे आहे.
[टेंपरामेंट : विचार करण्याची, भावना व्यक्त करण्याची आणि परिस्थितीला प्रतिसाद देण्याची जन्मजात पद्धत.]
मी ट्रेडिंगचे हे तीनही प्रकार हाताळले आहेत, त्यातल्या सर्व खुब्या मला माहिती आहेत. या वर सांगायचे तर एक प्रदीर्घ सिरीज तयार होईल. त्यातल्या ‘स्काल्प ट्रेडिंग’ वरची ही एक लहानशी टिपणी आपल्या समोर ठेवत आहे. कृपया गोड मानून घ्या.
कोणाला स्काल्प टेडिंग मानवेल तर कोणी पोझिशनल ट्रेडिंग चे गुण गाईल. कोणी मध्यम मार्ग म्हणून स्विंग ट्रेडिंग स्वीकारेल. इथे कोणता ट्रेडिंग प्रकार सरस अथवा नीरस हा मुद्दाच नाही. ज्याला जे जमते/ रुचते ते त्याने करावे इतकेच इथे सांगता येईल. कोणती ट्रेडिंग स्टाईल हे बरेचसे त्या व्यक्तीचे विचारधारणा , मानसशास्त्र, धोका पत्करायची तयारी, ट्रेडिंग साठी उपलब्ध भांडवल या वर जास्त अवलंबून असते.
मुळात हे स्कॅल्प ट्रेडिंग (किंवा स्कॅल्पिंग) आहे तरी काय?
स्कॅल्पिंग ही अत्यंत जलद गतीने केले जाणारे ट्रेडिंग आहे. या मध्ये अत्यंत कमी कालावधीचे ट्रेड्स घेऊन किमतीं (भाव) मधील अगदी लहान सहान हालचालीं मधून छोटा का होईना पण जलद नफा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
सामान्यत: ट्रेडिंग करणारी व्यक्ती, मोठा नफा कमावण्याच्या आशेनेच ट्रेड घेत असते. ट्रेड घेताच किंमत ट्रेड च्या दिशेन धावायला लागेल असे क्वचितच होते, बऱ्याचं वेळा किंमत वाढते, कमी होते पुन्हा वाढते कमी होते अशा अनेक सायकल्स मधून जात असते, आणि बऱ्याच कालावधी नंतर केव्हा तरी किंमत ट्रेडर ने अपेक्षित केलेली पाळी गाठते. या प्रक्रियेला काही तास किंवा दिवसही लागू शकतात. याला आपण दीर्घ काळ चालू असलेला ट्रेड म्हणून शकतो.
किंमती मधली अशी ही मोठी पातळी आणि पर्यायाने मिळणारा मोठा नफा अशा दीर्घ प्रतिक्षे नंतरचा प्राप्त होते असा अनुभव आहे.
स्क्रीन वर तयार होणारी प्रत्येक कॅंडल एका मोठ्या ट्रेड ची सुरवात नसते, मोठा नफा देऊ शकेल असा ट्रेड हेरणे आणि योग्य वेळी ट्रेड मध्ये प्रवेश करणे या साठी ट्रेडर ला फार मोठा अभ्यास करावा लागतो, त्याच्या कडे खूप मोठा अनुभव असावा लागतो एखादा मोठा ट्रेड पकडण्यासाठी तासंतास चार्ट न्याहाळत बसावे लागते आणि एकदा असा ट्रेड घेतला की तो चिकाटीने काही दिवस / आठवडे / महिने धरून ठेवावा लागतो, तेव्हा कोठे मोठा नफा मिळू शकतो.
काही ट्रेडर्सना ही प्रक्रिया फारशी रुचत नाही. मोठे प्रॉफिट देणारे ट्रेड मिळवण्यासाठी अभ्यास करण्याची त्यांची तयारी नसते किंवा ती क्षमता त्यांच्याकडे नसते. ट्रेड मिळाला तरी तो दीर्घकाळ धरून ठेवण्याची चिकाटी किंवा संयम त्यांच्या कडे नसतो. असे ट्रेडर्स फार मगजमारी न करता, कमी वेळात छोटा का होईना नफा मिळवणे जास्त पसंत करतात. पाच पाच दिवस चालणाऱ्या संथगती आणि कमालीच्या निरस अशा कसोटी क्रिकेट पेक्षा अत्यंत जलदगतीने चालणाऱ्या, अवघ्या काही तासांचा टी – 20 क्रिकेटचा थरार त्यांना हवा असतो. अशा ट्रेडर्सना स्काल्पर असे संबोधले जाते.
स्कॅल्पर , एखादा ट्रेड घेतो आणि काही सेकंद ते काही मिनिटांच्या आत जो मिळेल तो लहानसा नफा खिशात घालून ट्रेड मधून बाहेर पडतो. स्काल्पिंग ट्रेड नेहमीच अगदी काही मिनिटांच्या इतका कमी कालावधी साठी असतो.
स्कॅल्पिंग मागील विचार अगदी सोपा आहे: एकाच ट्रेड मध्ये मोठा प्रॉफिट कमावण्या पेक्षा छोटे-छोटे पण जलद गतीने ट्रेड घेऊन प्रत्येक ट्रेड मध्ये मिळणारा छोटा-छोटा नफा एकत्र होऊन मोठा नफा बनू शकतो.
काही रिक्षावाले (खास करून पुण्याचे!) फक्त लांब अंतराचेच भाडे स्वीकारतात, त्यासाठी ते जवळच्या भाड्याला कुजकट हसत,कमालीची तुच्छता दाखवत नकार देतात. तासंतास पिचकाऱ्या मारत, चकाट्या पिटत , पत्ते खेळत, लांबच्या भाड्याची प्रतीक्षा करत राहतात. त्यांना कदाचित लांबची भाडी मिळतही असतील पण अगदी तुरळक. त्याच वेळी एखादा उत्तरप्रदेशी भय्या रिक्षा वाला, “आईये बहेनजी , चलो चलते है “ असे हसतमुखाने आणि अदबीने बोलत जवळ जवळच्या अंतराची डझनावारी भाडी मारून लांबच्या भाडे वाल्या रिक्षा वाल्याच्या दिवसातल्या एकमेव भाड्या पेक्षा जास्त भरघोस कमाई करताना दिसतो.
मोठ्या ट्रेड मिळण्यास साठी बरीच मगजमारी करावी लागते, बेक आऊट कधी मिळणार? तो फेक ब्रेक आऊट तर नसेल ना? फिब रिट्रसमेंट काय सांगते, ऑर्डर ब्लॉक तयार होतो आहे का? फेअर व्हॅल्यू गैप चे काय? अशा सारख्या प्रश्नांची उत्तरे हुडकत बसण्या पेक्षा फारशी मगजमारी न करता किमतीं मधील छोट्या हालचालींचा चटकन अंदाज लावून पटकन एखादा ट्रेड घेणे खूप सोपे असते.
स्कॅल्पर लोकांचे एकच ध्येय असते, चटकन ट्रेड मध्ये घुसा , कमितकमी वेळ ट्रेड मध्ये रहा, जे मिळेल ते ताब्यात घ्या आणि चक्क पलून जा. त्यामुळे स्कॅल्पर लोक अगदी लहान नफ्या वर समाधान मानतात, उदा. प्रति शेअर 10 – 20 रुपये , किंवा क्रिप्टो मध्ये 150-200 पॉईंट्स.
स्काल्प असले तरी शेवटी हे एक ट्रेडिंगच आहे, ट्रेडिंग मधले सर्व घोके इथे ही आहेतच, ‘घी देखा लेकिन बडगा नही देखा’ इथे ही आहेच ना. मी तर म्हणतो, स्काल्प, स्विंग, पोझिशनल या ट्रेडिंगच्या तीन प्रकारात ‘स्काल्पिग’ हे सगळ्यात अवघड आणि अत्यंत धोकादायक ट्रेडिंग प्रकार आहे!
स्काल्पिंग हे एखाद्या रॉड रोलरच्या समोर पडलेले चार आण्याचे नाणे उचलण्या सारखे आहे, मिळाले तर फक्त चार आणे पण जरासा जरी अंदाज चुकला तर तो रोड रोलर रोलर तुमच्या हाताचा चक्काचूर करु शकतो!
धोका दिसत असुनही अनेक ट्रेडर्स स्काल्प ट्रेड करत असतात, या मध्ये स्ट्रॅटेजी चा भाग कमी, उलट लहान सहान का होईना जलद गतीने प्रॉफिट मिळवल्याचा आनंद, पैसे कमावल्याची जबरदस्त ‘किक’ , डोपामाईन मधली क्षणिक वाढ , विजयाचा कैफ हा भाग जास्त असतो.
रोलर कोस्टर राईड मधला तो थरार, अफाट वेग, वरुन खाली येताना पोटात पडलेला खड्डा अनेकांना आवडतो, स्काल्प ट्रेडिंग मध्ये हा अनुभव वारंवार मिळतो आणि मग त्याचे व्यसन लागते अगदी एखाद्या व्हिडिओ गेम सारखे.
थोडक्यात स्काल्पिंग हा अगदी कमी कालावधी साठी म्हणजे अवघ्या काही मिनिटां साठी घेतलेला ट्रेड आहे, असा ट्रेड घेण्यासाठी फार मोठा अभ्यास करावा लागत नाही, कोणत्याही स्ट्रॅटेजी अथवा ‘एज’ ची फारशी गरज नसते. वरकरणी तरी हा प्रकार हाताळायला सोपा वाटतो त्यामुळेच असेलं कदाचित पण असंख्य ट्रेडर्स खास करून नवोदित ट्रेडर्स या स्कालिंग कडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होताना दिसतात.
ह्या लेखमालेच्या च्या दुसऱ्या भागात या ‘स्कालिंग’ बाबत अधिक माहिती घेऊ. तेव्हा या पुढचा भाग वाचायला विसरू नका.
