इंडिकेटर्स चा फंडा:

इंडिकेटर्स चा फंडा:

बहुतांश ट्रेडर्स त्यातही नव्याने सुरवात केलेले ट्रेडर्स एखाद्या मॅजिक फॉर्म्युलाच्या/ स्ट्रॅटेजीच्या/ नव्या अद्भुत इंडिकेटर च्या शोधात असतात.

त्यांना वाटत असते की एकदा का असा फॉर्म्युल / स्ट्रॅटेजी / इंडिकेटर सापडला की बास… अगला अंबानी मईच!

ज्योतिषाशात्र शिकवताना देखील हाच अनुभव वारंवार यायचा, प्रत्येकाला एखाद्या जुन्या, दुर्मिळ पोथीचा शोध असायचा, अशी एखादी पोथी हाताला लागली झाले, स्वर्ग जिंकला! या पोथीत बघून फाडफाड 100% अचूक भविष्य सांगायचे, पुढच्या वर्षी मर्सिडीज बेंझ दारात उभी राहील!.

मी जीव तोडून सांगत होतो — बाबांनो अशी कोणतीही पोथी अस्तित्वात नाही, अशी पोथी लिहायचे म्हणले तरी लिहता येणार नाही. त्या अस्तित्वात नसलेया पोथीचा नाद सोडा आणि किमान 12 वर्षे मान खाली घालून कठोर परिश्रम करा, तेव्हा कोठे हे शास्त्र जरासे कळायला लागेल, आणि अचूक भाकिताचे म्हणाल तर ‘दिल्ली बहोत दूर है ! हे ऐकताच समोरचे 90% विद्यार्थी पळून गेले!

ट्रेडिंग शिकवताना देखील हाच अनुभव आला, कोणालाच परिश्रम घ्यायचे नाहीत, सगळे आयते हवे असते, आम्ही तोंडाचा ‘आ’ करून बसतो, ओता ट्रेडिंग चे फंडे आमच्या घशात! तीन दिवसांच्या सेमिनार मध्ये ‘फाड फाड ट्रेडिंग” ! हाय काय आन नाय काय!

“सर एखादा इंडिकेटर सांगा, जो चार्ट वर लावला की ट्रेड दिसायला लागतील, Buy – Sell चे हिरवे-लाल सिग्नल्स प्लॉट होतील, त्या प्रमाणे डोळे झाकून Buy/ Sell केले को झाले, पैसाच पैसा! ईस एकर जिमीन आणि महिंद्रा ‘थार’ !

मुळात हे असे काही करू शकेल असा कोणताही इंडिकेटर अस्तित्वात नाही, आणि समजा असा इंडिकेटर कोणी तयार केला असेलच तर तो थोडाच आपल्या सारख्या फुकट्या लल्लू पंजुला सांगत बसेल? (फुकट्या या शब्दाला अंडर लाईन करून घ्या!)

स्ट्रॅटेजीच्या बाबतीत देखील हेच म्हणता येईल, असे निरीक्षण आहे की एके काळी चांगले यश देणाऱ्या स्ट्रॅटेजीज आता निरुपयोगी/ लॉस देणाऱ्या ठरत आहेत , ORB सारखी सुंदर स्ट्रॅटेजी अलीकडच्या काही महिन्यात सातत्याने फेल होताना दिसते आहे. त्यामागे अनेक कारणे असली तरी एक कारण ‘स्ट्रॅटेजी चा अतिवापर म्हणजेच अतिपरिचयात अवज्ञा’ हे आहे.

खरे सांगायचे तर ‘पुढची कॅंडल’ कशी असेल हे फक्त ब्रह्मदेवालाच सांगता येईल. इंडिकेटर मग तो कोणताही असेल तो आगामी कॅंडल कशी असेल ते तुमच्या कानोमे सांगेंगा नाही.

इंडिकेटर आधीच उपलब्ध असलेली माहिती एका वेगळ्या प्रकारे म्हणजे ग्राफिक्स च्या माध्यमातून आपल्या समोर चितारतो बाकी काहीही नवे तो देऊ शकत नाही.

तेव्हा कोणी कितीही सांगत असेल तरी कोणत्याही फसव्या इंडिकेटर च्या मागे धावू नका, त्या साठी अव्वाच्या सव्वा पैसे तर अजिबात मोजू नका.

बरेच इंडिकेटर विकणारे जुन्या डेटावर तो इंडिकेटर वापरून बघा हा इडिकेटर कसा अचूक ट्रेड देतो याचे प्रात्यक्षिक देतात , पण प्रत्यक्षात तो इंडिकेटर लाईव्ह ट्रेडिंग करून वापरून दाखवत नाहीत. कारण लाईव्ह मध्ये त्यांचे हे इंडिकेटर्स हमखास आपटतात! याचे एक कारण म्हणजे —

अनेक इंडिकेटर हे ‘रि पेंटिंग’ करणार असतात, ते Buy / Sell’ करा असा सिग्नल चार्ट वर देतात देखील पण हा अंदाज चुकला तर तो आधी दिलेला सिग्नल (आरो, ट्रँगल, डॉट चे चिन्ह) नंतर पुसून टाकतात / चक्क गायब करतात! लाईव्ह ट्रेडिंगचे चे स्क्रीन रेकॉर्डिंग केले आणि नंतर तोच चार्ट ब्याक टेस्ट मध्ये बघितला तर ही चलाखी चटकन दिसते, सारे पितळ उघडे पडते!

त्यामुळे हे ‘रि पेंटिंग ‘ वाले इंडिकेटर आपण जेव्हा ब्याक टेस्ट करत असतो तेव्हा कमालीच्या अचूकतेने काम करताना दिसतात! प्रत्यक्षात लाईव्ह मार्केट मध्ये ह्या इंडिकेटर्सनी दिलेल्या चुकीच्या सिग्नस मुळे मोठा लॉस होण्याची शक्यता जास्त असते. सांभाळा!

आत्ता पर्यंत मी अनेक इंडिकेटर्स वापरून पाहिले पण पु ल देशपांड्यांच्या रावसाहेबांच्या भाषेत बोलायचे तर “ जोर नाही एकाच्याही xxx ! “

शेकडो इंडिकेटर्सच्या गर्दीत , ‘EMA’ हा एक इंडिकेटर त्यातल्या त्यात काही कामाचा आहे.

या EMA बद्दल एकदा सवडीने लेख लिहतो.

सध्या इतकेच बास!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *