“मी लहान मुलांचे कपडे शिवतच नाही”
माझ्या लहानपणीची गोष्ट आहे, मी त्यावेळी आठवीत असेन. माझ्या आत्तेभावाचा विवाह ठरला, विवाह साठी म्हणून त्याने त्यावेळी खूप प्रसिद्ध असलेल्या ‘विमल’ ची सूट लेंग्थ खरेदी केली, सूट शिवायला तो शिंप्या कडे गेला. तेव्हा त्याने भावाचे माप घेऊन सांगितले..
“साहेब, कापड जरा जास्त आहे, आपला सूट शिऊन सुद्धा थोडे कापड शिल्लक राहील, ते काटून तुम्हाला परत देतो”
“अरे मग या उरलेल्या कापड्याच्या तुकड्याचे करायचे काय?”
“यात एखाद्या लहान मुलाची प्यांट नक्कीच होईल”
आत्तेभावाला मी आठवलो, त्याने ते उरलेले कापड मला देऊन टाकले. झाले, आम्ही (मी आणि माझे वडील) सांगलीतल्या एका बड्या शिंप्याकडे गेलो, कापड भारीतले होते तेव्हा त्याला न्याय द्यायला शिंपी पण चांगला हवा हा विचार! पण त्या शिंप्याने माझी प्यांट शिवायला साफ नकार दिला!
मजा म्हणजे त्या वेळी सांगलीतल्या बहुतेक मोठ्या शिंप्या कडे आम्ही गेलो पण एकही शिंपी त्या कापडाची माझ्या साठी प्यांट शिवायला तयार झाला नाही!
“पण का? आम्ही योग्य ती शिलाई देऊ ना”
“नाही साहेब, प्रश्न शिलाईचा नाही, आम्ही लहान मुलांचे कपडे शिवतच नाही”
आम्हाला आश्चर्य वाटले पण असे झाले खरे, शेवटी आम्ही एका लहान, गरजू शिंप्याला विचारले आणि तो तयार झाला!
असाच अनुभव पुढे , 1986 मधे आला, तेव्हा मला शास्त्रीय संगीत शिकायचे होते, चौथी -पाचवीत असताना मी गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या दोन परीक्षा (अगदी काठावर) पास झालो होतो पण त्यापुढे काही केले नव्हते. 1986 मध्ये पुण्यातल्या अनेक नामांकित (नावे घेणे टाळतो!) संगीत शिक्षकांना “मला गाणे शिकवाल का”” अशी विचारणा केली पण एक ही गुरु तयार झाला नाही. माझी संगीत क्षेत्रातली पूर्व पीठिका ऐकताच साऱ्यांनी साफ नकार दिला. काही ठरावीक पूर्व तयारी असल्या शिवाय ते शिकवायला तयारच नव्हते!
त्यांचे ही असेच म्हणणे होते…
“आम्ही लहान मुलांचे कपडे शिवतच नाही”
फास्ट फॉरवर्ड, वर्ष 2026, शेअर मार्केट खास करून क्रिप्टो फ्युचर्स मध्ये जम बसवल्या नंतर मी विचार केला की मी जे ज्ञान मोठ्या कष्टाने मिळवले, जो अनुभव माझ्या कडे आहे त्याचा इतरांना लाभ करून द्यावा. यासाठी मी एक ‘इंट्रोडक्टरी सेमिनार’ अनाउंस केला , फुकट सांगितले तर त्याची किंमत रहात नाही म्हणून या सेमिनार साठी रू 10,000 फी घ्यायचे ठरवले , वाटले होते बरेच जण येतील पण अक्षरश: काळे कुत्रे फिरकले नाही.
मोठी निराशा झाली. मी कोर्स मध्ये काही सुधारणा केल्या, जास्त सुटसुटीत केला आणि पुन्हा एक ऑन लाईन कोर्स जाहीर केला मागच्या अनुभवा मुळे या वेळी फी निम्मी म्हणजे फक्त रु 5000 ठेवली पण दुर्दैवाने पुन्हा तोच अनुभव आला, अवघे 5-6 जण तयार झाले, ही संख्या पुरेशी नव्हती , एखादा कोर्स घेण्या साठी जी मेहनत घ्यावी लागते, कमिटमेंट द्यावी लागती, त्या तुलनेत ही संख्या फार कमी होती, साधा ब्रेक ईव्हन सुद्धा होत नव्हता, म्हणून कोर्स रद्द केला.
नंतर मी तिसरा प्रयत्न केला या वेळेला फी रु 2500 ठेवली, आता मात्र ‘मी येतो, मी येतो’ म्हणत तब्बल 50 जणांनी नाव नोंदवले , त्या पैकी 35 जण प्रत्यक्षात फी भरून कोर्स ला आले.
कोर्स चांगला झाला, नाही असे नाही, पण माझे समाधान झाले नाही , मला जे शिकवायचे होते ते मी शिकवूच शकलो नाही. कारण माझ्या समोर 35 विद्यार्थी असले तरी सगळ्यांची पाटी कोरी होती. अगदी ‘शेअर’ म्हणजे काय इथून सुरवात करावी लागली आता अशा ऑडीयन्स ला 3-4 दिवसांच्या सेमिनार मध्ये ‘क्रिप्टो फ्युचर्स’ काय शिकवणार? ज्यांना कैंडल स्टिक्स काय ते माहिती नाही त्यांना टेकनिकल अनालायसिस काय शिकवणार? ज्यांना ABCD सुद्धा येत नाही त्यांना शेक्सपियर काय समजावणार?
माझा सारा उत्साह क्षणार्धात मावळला, अशी पत्थर फोड करण्या पेक्षा क्लास न घेतलेला बरा असे वाटले. तरीही मी चिकाटीने तो कोर्स पूर्ण केला, चार लेक्चर्स जास्तच घेतली. विद्यार्थांनी भरलेल्या पैशाचा जास्तीतजास्त मोबदला द्यायचा मी आटोकाट प्रयत्न केला हे मात्र नक्की.
माझ्या लक्षात आले की माझ्या कडे अत्यंत आधुनिक तंत्रे आहेत, सिक्रेट्स आहेत, प्रायव्हेट सर्कल मधल्या स्ट्रॅटेजीज आहेत, हे सारे आत्मसात करायला विद्यार्थी पण त्या तयारीचा हवा.
गुरु द्रोणाचार्यांनी ‘ब्रह्मास्त्रा ’सारखे घातक हत्यार फक्त ‘अर्जुना’ ला शिकवले कारण ते धारण करण्याची आणि त्याचा योग्य उपयोग करण्याची क्षमता फक्त अर्जुना कडेच होती. उरलेल्या 104 कौरव – पांडव राजपुत्रांना ते शिकवण्यात त्यांनी आपला वेळ, शक्ती खर्च केली नाही.
आज ‘मला ट्रेडिंग शिकवा’ अशी विचारणा झाली नाही असा दिवस जात नाही, चौकशी केली तर कळते की साहेबांना शेअर बाजाराचा ‘श ’ सुद्धा माहिती नाही, फक्त कोणीतरी सांगितले असावे की ट्रेडिंग करून घरबसल्या लाखो रुपये कमावता येतात, मग पकडा गोखले गुरुजींना!
पण खरेच, याला माझा गर्व म्हणा किंवा माज म्हणा, मला या अशा अगदी नवशिक्या साठी क्लास घेण्यात कसलाही इंटरेस्ट राहिलेला नाही. मी फुकट शिकवेन पण विद्यार्थी ‘अर्जुन’ क्वालिटीचा हवा, आणि पैसे घेऊन शिकवायचे असेल तर १ लाख रुपये फी देण्याची तयारी वाला कोणी हवा, इथे शिकवण्याचे समाधान कदाचित मिळणार नाही पण निदान चांगली कमाई तरी होईल.
कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून खुलासा करतो. नवशिके असणे हा काही गुन्हा नाही, मी ही एकेकाळी असाच नवशिका होतो, पण माझ्या कडे जी तळमळ होती, निष्ठा होती, रात्र रात्र जागून मेहनत करायची तयारी होती तशी फार फार थोड्या लोकां कडे असते असा माझा अनुभव आहे. बहुतेकांना, असा चार – पाच दिवसांचा क्लास करून ‘एका रात्रीत अंबानी’ व्हायचे असते, पाच पाच वर्षे मान मोडून अभ्यास करण्याची तयारी आणि संयम कुठून येणार?
मागच्या क्लास चा एक विद्यार्थी तर स्पष्ट म्हणाला होता “सर इतकी मगजमारी कोण करत बसणार? त्या पेक्षा तुम्ही टेलेग्राम वर ट्रेड द्या आम्ही फक्त ट्रेड मारतो”
कोविड काळात मी ज्योतिष शास्त्राचे क्लासेस घेत होतो तेव्हाही हाच अनुभव आला आहे, माझे शेवटचे काही ज्योतिष अभ्यास वर्ग मी मध्यावरच बंद करून विद्यार्थांना त्यांनी भरलेली संपूर्ण फी परत केली आहे.
असे क्लास घेऊन चार पैसे मिळतीलही पण विद्यार्थी घडवल्याचे, शिष्य तयार केल्याचे समाधान मिळणार नाही.
तेव्हा मी ठरवले आहे की एकाच शिष्याला शिकवेन जो ‘अर्जुन’ असेल!
म्हणून त्या सांगलीच्या टेलर सारखे मी ही म्हणतो…
‘मी लहान मुलांचे कपडे शिवतच नाही”
