एक लहानसे गाव, संध्याकाळची वेळ होती, गावातल्या एकमेव रस्त्यावर काहीशी वर्दळ होती, तिथेच एक वडाचा पार होता, काही गावकरी तिथे बसून गप्पा मारत होते. इतक्यात एकाचे लक्ष गेले, दूर वरन एक व्यक्ती खांद्या वरती एक मोठे ओझे घेऊन चालत येत होती. व्यक्ती अनोळखी दिसत होती, गावातली वाटत नव्हती. गावकरी कुजबुजू लागले…

‘कोण आहे ही व्यक्ती?’ , ‘आपल्या गावातली तर नक्कीच नाही, बाहेरची व्यक्ती दिसते’, ‘आपल्या गावात कशाला आली आहे?’ …

ती व्यक्ती हळूहळू चालत चालत आता त्या वडाच्या पारा जवळ आली, मध्यम उंचीची, तरतरीत अशी ती व्यक्ती खांद्यावर एक गोणी घेऊन हळूहळू चालत होती,

गावकऱ्यांची कुजबुज वाढली, “हा कोणी व्यापारी दिसतो आहे, गावात काही माल विकायला आला असेल, पण त्या गोणीत काय असावे?

त्या गावकऱ्यांत एक जरा त्यातल्या त्यात हुशार असा माणूस होता, काही काळ शहरात राहून आल्यामुळे इतर गावकऱ्यांच्या तुलनेत जरा ‘स्मार्ट’ होता!

त्याने ओळखले, तो म्हणाला..

“असे ही व्यक्ती ट्रेडर आहे!”

“ट्रेडर? ते कशा वरून?”

“ते काय त्याच्या गोणीतून लाल, हिरव्या रंगाच्या कॅंडल डोकावत आहेत!”

“ट्रेडर! बा भौ, आज पहिल्यांदा आपण एका ट्रेडरला पाहतोय नाही का ?”

“तर काय, इतके दिवस आपण नुसते ऐकून होतो या ट्रेडर लोकां बद्दल , आज प्रत्यक्ष एक जिता जागता ट्रेडर पहायला मिळाला”

“हे ट्रेडर लोक्स खूप पैसा छापतात म्हणे!”

“असेल पण काही ट्रेडर्स बरबाद पण झाले आहेत असे म्हणतात, ते पैठणकर का कोण आहेत ना त्यांनी तर पोष्ट करून भीती घातलीय की ट्रेडिंग पायी काही लोक्स नी आत्महत्या पण केलीय !’

“तसे असेल ही पण हा ट्रेडर मला पैसे छापणाऱ्यातलाच वाटतो, बघा ना त्याची ऐट, कशा शानदारपणे चालत आहे”

“हो रे, हा ट्रेडर नक्कीच ‘प्रॉफिटेबल ट्रेडर’ असणार ! “

“आपण त्याला विचारूया का, की त्याचे यू ट्यूब चॅनेल. टेलिग्राम चॅनेल , व्हॉट्स अप ग्रुप वगैरे काही आहे का ? त्याच्या कडून काही कॉल्स मिळतील का?

एकाने धाडस करून त्या ओझे वहात चालणाऱ्या व्यक्तीला थांबवले,

“महाराज, आम्ही ओळखले, आपण एक बडा ट्रेडर आहात ना?”

ती व्यक्ती काहीच बोलली नाही, आपले ओझे वहात चालतच राहिली.

गावकरी त्याचे मागोमाग धावले..

“महाराज, आमच्या गावात आलाच आहात तर काही ट्रेडिंग बद्दल सांगा ना, आम्हाला सगळ्यांना ट्रेडिंग शिकायचे आहे”

ती व्यक्ती काहीच बोलली नाही, आपली मार्गक्रमणा करीत राहिली.

“महाराज , निदान हे तरी सांगा, हे ट्रेडिंग म्हणजे नेमक काय असते?”

त्या व्यक्तीने काहीही न बोलता आपल्या खांद्यावरचे ओझे खाली ठेवले आणि स्तब्ध उभा राहिला.

गावकऱ्यांना वाटले, कदाचित हीच काहीतरी गुढ ट्रेडिंग ट्रिक असेल!

त्यांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला,

“पण महाराज, हे ट्रेडिंग करतात तरी कसे?”

ती व्यक्ती काहीही बोलली नाही, खाली वाकून ओझे उचलून खांद्यावर घेतले आणि शांतपणे पुढे चालत राहिली …

———————————

“भाऊ, हे सगळे डोक्यावरून गेले जी, जरा विस्कटून सांगताल का?”

“गण्या लेका तुझ्या कडे मॅनर्स नाहीत, शंका विचारायच्या आधी ‘गाय छाप’ ची पुडी इकडे सरकवायची असते हे सुद्धा विसरलास का काय गड्या”

“अच्छा म्हणजे ‘लाईक्स’, ‘कॉमेंटा’ आणि शेअर ‘ म्हणतायसा का? “

“गण्या आता कसा आला लायनीत…”

———————————

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *